सीझरच्या कर्तृत्वामुळे त्याची सीनेटने दहा वर्षांकरिता सर्वाधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्या काळात मिलोयाने क्लॉडियस या दंडाधिकाऱ्याचा (प्रेटर) खून केला. मिलो हा कॉन्सलचा एक उमेदवार होता; म्हणून सॅलस्टने मिलोची निंदानालस्ती केली आणि अवैध मार्गांचा अवलंब करून काहूर माजविले. त्याचे मिलोच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. म्हणून त्याची सीनेटमधून हकालपट्टी झाली (इ. स. पू. ५०). यानंतर लवकरच (इ. स. पू. ४९) सीझर व पॉम्पी यांत मतभेद होऊन यादवी युद्घाला तोंड फुटले. तेव्हा सॅलस्टने सीझरची बाजू घेतली. यात अखेर सीझरचा विजय झाला.
सीझरने सॅलस्टची अर्थसचिव म्हणून नियुक्ती केली. शिवाय त्याच्याकडे आफ्रिकेतील पॉम्पीविरुद्घच्या एका तुकडीचे नेतृत्व दिले; पण एकाही युद्घात त्यास यश मिळाले नाही; तथापि सीझरने त्याची न्युमिदिया प्रांतात सुभेदारपदी नियुक्ती केली (इ. स. पू. ४६). तिथे सॅलस्टने खंडणी आणि अन्य अवैध मार्गांनी अमाप संपत्ती जमविली. त्याच्या या कृत्यावर पुढे टीका व चौकशीची मागणी झाली; पण सीझरने चौकशीही केली नाही आणि त्यास दोषमुक्तही केले नाही. त्याने आफ्रिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन (इ. स. पू. ४४) रोम गाठले. तिथे त्याने आलिशान प्रासाद आणि प्रशस्त उद्यान तयार केले. पुढील रोमन सम्राटांचे ते निवासस्थान झाले; कारण सॅलस्टला वारस नव्हता. उर्वरित जीवन त्याने रोममध्ये लेखनवाचनात निवांतपणे व्यतीत केले.
सॅलस्टने कॅटिलिन्स वॉर (इं. भा. इ. स. पू. ४३ –४२), जुगर्थाईन वॉर (इं. भा. इ. स. पू. ४१) आणि द हिस्टरीज (इं. भा. इ. स. पू. ३९) हे तीन ऐतिहासिक ग्रंथ (व्याप्तिलेख) लिहिले. त्यांपैकी द हिस्टरीज हा पाच खंडात्मक ग्रंथ असून त्यात सलाच्या मृत्यूपासून (इ. स. पू. ७८) पॉम्पीच्या सत्तागहणापर्यंतच्या (इ. स. पू. ६७) कालाचे अत्यंत चिकित्सक विवरण केले होते; पण कालौघात तो ग्रंथ नष्ट झाला असून काही पत्रे व चार संभाषणे एवढाच मजकूर अवशिष्ट आहे.
कॅटिलिन्स वॉर या ग्रंथात त्याने रोमन राजकारणातील भष्टाचार,कटकारस्थाने आणि सत्तेसाठी चाललेला संघर्ष यांचे सत्यान्वेषणात्मक विवेचन केले आहे. जुगर्थाईन वॉर या ग्रंथात रोनांच्या आधिपत्याखालील न्युमिदियातील जुगर्था राजा आणि त्याचे सहकारी सत्ताधीश व चुलत भाऊ ॲधर्बल व हैम्पसल यांत वैनस्य आल्यानंतर जेव्हा ॲधर्बलने रोमन सीनेटकडे साहाय्य मागितले, त्यावेळी मेरिअस व सला या सेनापतींनी जुगर्थाचा पराभव केला. त्या युद्घाची (इ. स. पू. १११ –१०६) पार्श्वभूमी, कारणे, हकिकत व परिणाम यांचा परामर्श यात आढळतो. सॅलस्टचे चरित्र व चारित्र्य वादग्रस्त असले, तरी त्याची इतिहासकार म्हणून ख्याती निर्विवाद आहे.
सॅलस्टने इतिहासलेखनपद्घतीत सनवारांऐवजी कथात्मक निवेदनशैलीच्या तंत्राचा वापर केला. त्याचे कथात्मक निवेदन संभाषणांनी उल्हसित करणारे ऐतिहासिक व्यक्तींच्या शब्दचित्रांनी संपन्न झाले असून प्रसंगोपात्त त्यात विषयांतरही आढळते. त्याने जुन्यानव्या शब्दप्रयोगांचा कल्पकतेने चपखल उपयोग केला असून त्याची कथात्मक-संभाषणात्मक लेखनशैली दर्जेदार व प्रमाणभूत आहे; तथापि कालक्रमविपर्यास, अचूकतेचा अभाव,पूर्वग्रहकलुषितता यांसारखे दोषही त्यात आढळतात. ग्रीक इतिहासकार थ्यूसिडिडीझप्रमाणे इतिहासमीमांसेत अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यकारणभावाच्या तत्त्वाचे भान त्याच्या लेखनात काही इतिहासकारांना प्रत्ययास येते.
संदर्भ : 1. Syme, Bonald, Sallust, New York, 1964.
2. Usher, Stephen,The Historians of Greece and Rome, New York, 1970.
देशपांडे, सु. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/25/2020
प्रसिद्ध अरब इतिहासकार आणि इतिहासाच्या तत्वज्ञानाच...
ग्रेट ब्रिटनमधील एक प्रसिद्ध कायदेपंडित व इतिहासका...
खाफीखान : (सु.१७–१८ वे शतक). एक प्रसिद्ध मुसलमान इ...
सु-माचि’ एन (स्स-मा-च्यन) : ( सु. १४५– सु. ८५ इ. स...