जेम्स ब्राइस : (१० मे १८३८ - २२ जानेवारी १९२२). ग्रेट ब्रिटनमधील एक प्रसिद्ध कायदेपंडित व इतिहासकार. बेलफास्ट (आयर्लंड) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्यांचे वडील शिक्षक होते. १८४६ मध्ये त्यांचे घराणे ग्लासगो (स्कॉटलंड) येथे आले. तेथेच ब्राइस यांचे शिक्षण झाले. ट्रिनिटी कॉलेजातून (ऑक्सफर्ड) ते बी. ए. झाले. पुढे कायदा या विषयात त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळविली. लंडनमध्ये काही दिवस वकिली केल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात दिवाणी विधी या विषयाचा प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले (१८७०- ९३). या काळात प्रसिद्ध इतिहासकार लॉर्ड ॲक्टनच्या मदतीने त्यांनी इंग्लिश हिस्टॉरिकल रिव्ह्यू हे नियतकालिक सुरू केले (१८८५). विद्यार्थिदशेतच त्यांनी हिस्टरी ऑफ द होली रोमन एम्पायर (१८६४) हे पुस्तक लिहिले. त्यामुळे त्यांची इतिहासकारांत गणना होऊ लागली. तत्कालीन पंतप्रधान विल्यम ग्लॅडस्टन यांचे ते मित्र व सल्लागार होते. त्यामुळेच ते पुढे राजकारणाकडे आकृष्ट झाले आणि उदारमतवादी पक्षातर्फे संसदेवर निवडून आले (१८८०). त्यांनी व्यापार मंडळाचा अध्यक्ष व माध्यमिक शैक्षणिक आयोगाचा अध्यक्ष (१८९४ - ९५), तसेच परराष्ट्रीय उपसचिव, आयर्लंडचा मुख्य सचिव इ. विविध उच्च पदे भूषविली.
१८७० च्या पहिल्या भेटीनंतर त्यांनी अमेरिकेला अनेकदा भेट दिली. या विविध भेटींत त्यांनी तेथील राजकीय घडामोडी व सामाजिक संस्था यांचे निरीक्षण केले आणि लेखक, विचारवंतांशी चर्चा केली. ग्रेट ब्रिटनमध्ये ॲग्लो अमेरिकन सोसायटी स्थापन करून प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत प्रयत्न केले. द अमेरिकन कॉमनवेल्थ (३ खंड - १८८८) हा अभिजात ग्रंथ पुढे त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांची अमेरिकेत ब्रिटनचा राजदूत म्हणून नियुक्ती झाली (१९०७ - १३). या काळात त्यांनी अमेरिका कॅनडामधील राजकीय संबंधांत सहकार्याचे वातावरण निर्माण केले. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना उमरावपद देण्यात आले (१९१४). उर्वरित आयुष्यात द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा सदस्य म्हणून त्यांनी काम केले आणि राष्ट्रसंघाच्या स्थापनेस आपला पाठिंबा दर्शविला. त्याच वेळी मॉडर्न डेमॉक्रसी (१९२१) हा महत्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला. यांशिवाय त्यांनी इम्प्रेशन्स ऑफ साउथ आफ्रिका (१८९७), स्टडीज इन हिस्टरी ॲण्ड जुरिस्प्रूडन्स (१९०१) इ. ग्रंथ लिहिले. त्यांपैकी स्टडीज इन हिस्टरी...... या ग्रंथात त्यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात दिलेली व्याख्याने संग्रहीत केलेली असून रोमन विधीच्या आधुनिक अध्ययनास त्यामुळे चालना मिळाली.
एक प्रभावी संसदपटू म्हणून त्यांचा लौकिक होता. दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धे त्यांस मान्य नव्हती. त्यांचा द अमेरिकन कॉमनवेल्थ हा ग्रंथ एक अभिजात कलाकृती मानला जातो.
संदर्भ : Ions, E. S. James Bryce and American Democracy, 1870 - 1922, New York, 1970.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्रसिद्ध अरब इतिहासकार आणि इतिहासाच्या तत्वज्ञानाच...
नॉर्वेचा मानवतावादी इतिहासकार आणि जागतिक शांततेच्...
खाफीखान : (सु.१७–१८ वे शतक). एक प्रसिद्ध मुसलमान इ...
सु-माचि’ एन (स्स-मा-च्यन) : ( सु. १४५– सु. ८५ इ. स...