( सु. १४५– सु. ८५ इ. स. पू.). चिनी खगोलशास्त्रज्ञ आणि इतिहासकार. जन्म चीनमधील लुंग मेन येथे. सु-मा-तान ह्या थोर चिनी इतिहासकाराचा हा मुलगा. हान राजघराण्याशी त्याचा संबंध होता. शाही इतिहासकार म्हणून तो नेमला गेला होता. चीनमध्ये त्या काळी इतिहासकारावर दोन जबाबदाऱ्या असत. खगोलशास्त्रीय निरीक्षणे करणे आणि राज्यातील दैनंदिन घटनांची व समारंभाची व्यवस्थित नोंद ठेवणे.
सु-माचि’एन हाही यथावकाश हान राजदरबारी सेवेत शिरला. तत्पूर्वी त्याने बराच प्रवास केलेला होता. राजसेवेत त्याला महत्त्व प्राप्त झाले. इ. स. पू. १११ मध्ये चीनच्या नैर्ऋत्य विभागातील एका लष्करी मोहिमेत राहण्याची संधी त्याला मिळाली. त्याचप्रमाणे इ. स. पू. ११० मध्ये माउंट ताई येथे काही महत्त्वाचे विधी करण्यासाठी गेलेल्या सम्राटाच्या लवाजम्याचा तो एक सभासद होता. त्याच वर्षी त्याचे वडील निधन पावले. त्यामुळे रिकाम्या झालेल्या शाही इतिहासकाराच्या पदावर त्याची नेमणूक करण्यात आली. (इ. स. पू.१०८ ).
इ. स. पू. १०५ मध्ये सम्राट वू टि ह्याच्या निर्देशानुसार हान राजेशाहीचा नवा आरंभ करण्यात आला. त्यानुसार चीनच्या संपूर्ण कालदर्शिकेत सुधारणा घडवून आणण्याच्या कामी नेमलेल्या तज्ज्ञांमध्ये सु-माचि’एनचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर त्याने आपल्या दिवंगत वडिलांची परिपूर्ण इतिहास लिहिण्याची अपूर्ण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे ठरविले. भावी पिढीसाठी चीनचा इतिहास त्यांना लिहायचा होता.
सु-माचि’एनने हे काम हाती घेतले. हान सम्राट वू टि ह्याच्या कारकिर्दीत हान राजघराण्याने यशाचे सर्वोच्च शिखर गाठले असून, ह्या घराण्याच्या कर्तृत्वाची नोंद भावी पिढीसाठी इतिहासाने घेतली पाहिजे असाही त्याचा दृष्टिकोण होता. हा इतिहास लिहिला जात असतानाच सम्राट वू टि याची त्याच्यावर नामर्जी झाली. निंदनीय ठरलेल्या एका सेनापतीची त्याने बाजू घेतली, म्हणून त्याला देहान्ताची शिक्षा होऊ शकली असती; पण त्याने केलेल्या विनवणीमुळे ती झाली नाही किंवा कदाचित इतका मोठा विद्वान मनुष्य घालवू नये, असे सम्राटाला वाटले असावे. चीनच्या इतिहासाचे काम पूर्ण करण्यासाठी त्याने सम्राटाकडे दयेची याचना केली. पुढे सम्राटाचा अनुग्रह त्याला पुन्हा प्राप्त होऊन राजप्रासादाच्या व्यवस्थापन यंत्रणेचा सचिव (चुंग-शू-लिंग) करण्यात आले. परंतु उपर्युक्त घटनेमुळे तो इतका खजील झाला होता, की निवृत्तीचे जीवन स्वीकारुन त्याने उर्वरित जीवन फक्त चीनच्या इतिहासलेखनास वाहून घेतले.
सु-माचि’एनच्या इतिहासग्रंथाचे नाव शी ची ( इं. शी. ‘ हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स’) असे आहे. त्याच्या पूर्वी चीनच्या इतिहासावर लिहिले गेले होतेच. शिवाय दरबारी इतिवृत्ते लिहिण्याची परंपरा पूर्वीच्या सम्राटांच्या काळात प्रस्थापित झाली; तथापि त्याने चीनच्या इतिहासातील अनेक गुंतागुंतीच्या घटनांना एका व्यवस्थित कथानिवेदनात शब्दबद्घ केले. हा इतिहास लिहिण्यासाठी त्याला मिळालेल्या आधारग्रंथांत परस्पर विसंगती बरीच होती. कालक्रमातही सुसंगती नव्हती.
हे दोष काढण्यासाठी त्याने त्या काळी सर्वात अधिक शक्तिमान असलेल्या राज्यात घडलेल्या घटनांची एक रूपरेषा तयार केली; सर्व घटना तारीखवार नमूद केल्यानंतर विविध स्वतंत्र, सरंजामदारी राज्यांत त्यांच्या इतिहासाविषयी असलेल्या गोंधळाचे वातावरण योग्य स्पष्टीकरणे देऊन नाहीसे केले. येथेही त्याने वेगवेगळ्या काळी, त्या राज्यांत घडलेल्या घटना आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या कालक्रमाचे तक्ते दिले होते. ‘हिरेडिटरी हाउसिस’ (इं. शी.) या प्रकरणात प्रत्येक राज्याविषयी तपशीलवार माहिती त्याने दिली होती.
सरकारच्या महत्त्वाच्या पैलूंविषयी काही व्याप्तिलेख ह्या ग्रंथात आढळतात. सु-माचि’एनच्या काळात काही व्यवहारवादी मुत्सद्दी जेथे सत्तेचे केंद्रीकरण सतत वाढते आहे, अशा राज्यांचा नमुना डोळ्यासमोर ठेवून काही नवी धोरणे आखीत होते. त्याच्या व्याप्तिलेखांवरुन तो ह्या व्यवहारवाद्यांना अनुकूल होता, असे दिसते. ह्या ग्रंथाच्या अखेरीस अशा काही प्रसिद्घ व्यक्तींची चरित्रे दिलेली आहेत, की ज्यांची उदाहरणे वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तनाचे नमुने म्हणून देता येतील. त्याचप्रमाणे वू टि याच्या कारकीर्दीत महत्त्व पावलेल्या काही परदेशी व्यक्तींबद्दलही त्याने लिहिले आहे. स्प्रिंग अँड ऑटम या कन्फ्यूशसच्या अभिजात ग्रंथात नीतिपर अभिप्राय असल्यामुळे त्यास धर्मसम्मत दर्जा प्राप्त झाला होता. त्या ग्रंथाबरोबर आपल्या ग्रंथाची तुलना करु नये असे तो म्हणतो आणि माझ्या ग्रंथात मी केवळ घटनांचा प्रेषक (ट्रान्समिटर) असल्याचे नम्रपणे सांगतो.
शी ची या १३० प्रकरणांमध्ये विभागलेल्या इतिहासग्रंथाने राजघराण्यांचा इतिहास लिहिणाऱ्या ग्रंथकारांपुढे एक नमुनाकृती उभी केली; परंतु इतर इतिहासकारांच्या ग्रंथांहून तो अगदी वेगळा होता. ह्या ग्रंथातील इतिहासाचा कालविस्तार खूप मोठा होता. त्याची आधारसामग्रीही वैविध्यपूर्ण होती. त्याचप्रमाणे आपला हा ग्रंथ राजदरबारकेंद्रित, राजकीय राहावा असे सु-माचि’एनला वाटत नव्हते. वेगवेगळ्या कालखंडांतील, समाजाच्या विविध थरांतील उदा., व्यापारी, नट इ. माणसांचाही त्याने परामर्श घेतला. त्याचा बोधवादी दृष्टिकोण त्याच्या ग्रंथातून वेळोवेळी प्रकट होताना दिसतो.
आपण उभ्या करीत असलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांविषयी तो नैतिक निर्णय देतो. इतिहासापासून तो जे धडे घेतो ते विविध आणि अनेकदा परस्परविरुद्घ असल्याचे दिसतात. सु-माचि’एन हा इतिहासकार म्हणून प्रसिद्घ आहेच; पण जोमदार, लवचिक अशा चिनी गद्यशैलीबद्दलही तो लौकिक पावला आहे. चीनमधील उत्तरकालीन इतिहासावर त्याचा प्रभाव दिसतो. त्याची साहित्यकृती एक उत्कृष्ट इतिहासग्रंथ म्हणूनच नव्हे, तर उत्तम इतिहासलेखनाचा एक मानदंड म्हणूनही चीनमध्ये तिला मान्यता मिळालेली आहे.
संदर्भ : 1.Watson, Burton.Ssu-ma ch’ien, Grand Historian of china, New York, 1958.
2.Waston, Burton, The Records of the Grand Historian of China, 2. Vols., New York, 1961.
कुलकर्णी अ. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/4/2020
प्रसिद्ध अरब इतिहासकार आणि इतिहासाच्या तत्वज्ञानाच...
सॅलस्ट : (इ. स. पू. सु. ८६–३५). रोमन मुत्सद्दी आणि...
खाफीखान : (सु.१७–१८ वे शतक). एक प्रसिद्ध मुसलमान इ...
नॉर्वेचा मानवतावादी इतिहासकार आणि जागतिक शांततेच्...