सूर्यमालेतील सहावा ग्रह व गुरू नंतरचा सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी. ह्याचा आकार देखिल प्रचंड आहे. याचा व्यास साधारणतः १, २०, ५३७ कि. मी. इतका आहे. परंतु प्रचंड आकारमानापेक्षा तो जास्त प्रसिद्ध आहे त्याच्या भोवती असलेल्या कड्यामूळे.
गुरू ग्रहाप्रमाणेच हा ग्रह देखिल वायूमय बनलेला आहे. स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास या ग्रहास साधारणतः १० तास लागतात व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास २९ वर्ष लागतात. सूर्यापासून हा ग्रह जवळपास १, ४२६, ७२५, ४०० कि. मी. ( 9.53707031 A.U.) अंतरावर आहे.
गुरू ग्रहांच्या चंद्राप्रमाणे शनी या ग्रहाच्या कड्यांचे देखिल सर्वप्रथम दर्शन गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीतून घेतले.
प्रचंड आकाराचा असून देखिल याची घनता पाण्याहून कमी आहे. समजा जर एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू लागेल.
लहान मोठ्या असंख्य खडकांपासून शनी ग्रहाची कडी निर्माण झाली आहेत. कधी एके काळी शनीच्याच एखाद्या चंद्राचा स्फोट होऊन त्यापासून ही कडी निर्माण झाली असावीत. वस्तुतः या कड्यांची संख्या असंख्य असली तरी प्रामुख्याने या कड्यांची सात निरनिराळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
अतिशय कमी तापमानामुळे या कड्यांतील सर्व तुकडे बर्फाच्छादित आहेत. या कड्यांची जाडी जवळपास १० ते १५ कि. मी. आहे. शनी ग्रह त्याच्या अक्षाशी साधारण २८ अंशांनी कललेला असल्यामुळेच पृथ्वीवरून आपणास त्याची कडी व्यवस्थित दिसतात. अन्यवेळी पृथ्वी शनीच्या विषुववृत्त पातळीत येते, तेव्हा त्याची कडा जवळजवळ अदृश्य होते व त्याजागी शनीला छेदणारी एक बरीक रेषा आपणास दिसते.
शनीला एकूण ३० उपग्रह आहेत. त्यामधील टायटन आकाराने बुध ग्रहा एवढा आहे.
शनी हा देखिल एक मोठा चुंबक असल्याचे आढळून आले आहे. परंतु ते गुरू एवढे शक्तिशाली आहे.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 7/26/2023