सूर्यमालेतील बुध हा सूर्या नंतरचा पहिला ग्रह. हा आकाराने आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. याचा व्यास ४, ८७८ कि. मी. आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे यास आंतर ग्रह देखिल म्हणतात. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. याचा अर्थ तो नेहमीच दिसतो असे नाही. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसतो. तो देखिल सूर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन होत नाही.
या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्कावर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो.
बुध ग्रह साधारणतः ५९ दिवसामध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास ८८ दिवस लागतात. सूर्यापासून अत्यंत जवळ म्हणजे फक्त ५७, ९०९१७५ कि. मी. ( 0.38709893 A. U.) अंतरावर असल्याने या ग्रहाचे सूर्याच्या बाजूकडील असलेल्या भागाचे तापमान ४२० अंश सेल्सिअस एवढे प्रचंड असते तर याउलट सूर्याच्या त्याच्या विरुद्ध बाजूकडील तापमान अत्यंत थंड म्हणजेच -२०० अंश सेल्सिअस असते. या दोन्ही तापमानात कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही.
बुधचा सूर्याभोवतीचा भ्रमणाचा मार्ग हा दीर्घ वर्तुळाकृती आहे. तसेच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भ्रमणावर मोठा परिणाम होतो. बुधाच्या सूर्यप्रदक्षिणा भ्रमणमार्गामध्ये नेहमीच थोडा थोडा बदल होत असतो. म्हणजेच एकदा एका भ्रमणमार्गावरून फिरल्यावर बुध ग्रह त्या मार्गास सोडून दुसर्या मार्गावरून भ्रमण करतो.
काही वेळेस बुधाचे सूर्यावरील अधिक्रमण पाहावयास मिळते. अधिक्रमण म्हणजे सूर्य-पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत ज्यावेळेस बुध ग्रह येतो त्यावेळेस बुध ग्रहाचा छोटासा ठिपका सूर्य बिंबावरून पुढे सरकताना दिसतो. एका शतकामध्ये बुधाची १३ अधिक्रमणे पाहावयास मिळतात. म्हणूनच हे अधिक्रमण अतिशय दुर्मिळ समजले जाते.
बुध ग्रहास एकही चंद्र नाही. याच कारण बहुदा सूर्यापासून त्याचे कमी अंतर असावे. काहीवेळेस पृथ्वीवरून बुधाच्या कलादेखील पाहावयास मिळतात.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 6/8/2020