32 वर्षांच्या काळात प्रथम कुलगुरू स्व. डॉ. का.गो. देशमुख, डॉ. जी.व्ही. पाटील, डॉ. एस.टी. देशमुख, डॉ. सुधीर पाटील, डॉ. कमल सिंह या कुलगुरूंनी आपापल्या कार्यकाळात विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले. विद्यमान कुलगुरू डॉ. मोहन खेडकर सहावे कुलगुरू म्हणून 24 फेबुवारी, 2011 रोजी विद्यापीठात रुजू झालेत. आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळामध्ये विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. इंडिया टुडेच्या सर्व्हेक्षणात भारतामध्ये 27 वा आणि महाराष्ट्रात 5 वे मानांकन अमरावती विद्यापीठाला मिळाले. विद्यापीठाला प्रगतशील यशाचा किनारा सर्वांच्या सहभागातून लाभला आहे.
विद्यापीठामध्ये 22 शैक्षणिक विभाग आहेत. त्यामध्ये गृहविज्ञान, उपयोजित परमाणू, व्यवसाय प्रशासन व प्रबंधन, संगणकशास्त्र, शारीरिक शिक्षण, ग्रंथालय व माहितीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, समाजशास्त्र, सांख्यिकीशास्त्र, गणित, सूक्ष्मजीवशास्त्र, मराठी , हिंदी, शिक्षण, बायो-टेक्नॉलॉजी, केमीकल टेक्नॉलॉजी, विधी, इंग्रजी या विभागांचा समावेश आहे. याशिवाय बुलडाणा येथे मॉडेल डिग्री कॉलेज सुरू करण्यात आले आहे. शैक्षणिक विभागाच्या माध्यमातून पदव्युत्तर विषयांचे विविध विद्याशाखेत शिक्षण दिले जाते. या शिवाय विभागात संशोधनाच्या सोयी उपलब्ध आहेत.
रोजगार मिळावा हा महत्तम उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी विद्यापीठातील करिअर अॅण्ड कौन्सिलींग सेलला अधिक बळकटी दिली. विद्यापीठ शैक्षणिक विभागांमध्ये प्लेसमेन्ट ऑफिसर्सची नियुक्ती केली. याशिवाय रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यामाध्यमातून रोजगार मिळू शकला.
संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठस्तरावर सातत्याने प्रयत्न होत आहेत. विद्यापीठ व त्याच्याशी संलग्नित महाविद्यालयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांचे आयोजन करण्यात आले. त्यामाध्यमातून नाविन्यत्तम संशोधनाचे आदान-प्रदान होण्यास मदत झाली. त्याचा लाभ सहभागी शिक्षक व संशोधक विद्यार्थ्यांना होऊ शकला. विद्यापीठातील अनेक शिक्षकांनी विविध देशांना भेटी देऊन आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. संशोधनपर शोधनिबंध सादर केले. त्या संशोधनाचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकला. विद्यापीठातील अनेक शिक्षकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. संशोधनाला चालना मिळावी यासाठी विविध वित्तीय संस्थांकडून अनेक संशोधन प्रकल्प विद्यापीठातील शिक्षकांना मंजूर झाले आहेत. दर्जेदार संशोधन होण्यास त्या माध्यमातून मदत झाली आहे.
विद्यापीठात भव्यदिव्य ग्रंथालय इमारत असून ती सर्व सुविधांनी युक्त आहे. संदर्भग्रंथ, क्रमिकग्रंथ, शोधप्रबंध, नियतकालिके, अहवाल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासह विविध वाचन साहित्याने ग्रंथालय परिपूर्ण आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाचन कक्ष, डिजीटलायझेशन इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील वाचन साहित्य, ग्रंथालयाच्या स्वतंत्र संकेतस्थळावर 15 हजार पेक्षा अधिक ऑनलाईन जर्नल्स, भाषणे सुद्धा उपलब्ध आहेत. याशिवाय शिक्षकांचे शोधप्रबंध, रिसर्च प्रोजेक्ट्स, तज्ज्ञ लिखीत भाषणे, आचार्य पदवी शोधप्रबंधाचे डिजीटलायझेशन इत्यादी साहित्य वाचकांना घरबसल्या उपलब्ध झाले आहे.
ग्रंथालयाने ‘ओपन कन्सोरटीया फॉर यु.जी. व पी.जी.’ या नावाने सुरू केला आहे. महाविद्यालयांकरीता अशा प्रकारचा ‘कन्सोरटीया’ विकसीत करणारे हे विद्यापीठ प्रथम ठरले आहे. विद्यापीठ परिसरात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी अॅकेडेमिक स्टॉफ कॉलेज आहे. याशिवाय संताच्या कार्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आणि संशोधनासाठी डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र, श्री संत गाडगे बाबा अध्यासन केंद्र, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्र, स्वामी विवेकानंद स्टडीज सेंटर, बुद्धीस्ट स्टडीज सेंटर, विद्यापीठ महानुभाव पंथ केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्र, इत्यादी केंद्र सुरू आहेत.
विद्यार्थ्यांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी विद्यापीठ परिसरात ‘स्टुडन्ट अॅक्सेस सेंटर’, ‘केंद्रीय उपकरणीकरण कक्ष’, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, परीक्षापूर्व प्रशिक्षण केंद्र, इंटरनल क्वॉलिटी अॅश्युरन्स सेल, डायट कौन्सिलिंग सेंटर, वुमेन्स स्टडीज सेंटर, कॅम्पस नेटवर्कीग, रेमेडीअल कोचिंग सेंटर, कॉम्पेंटीटीव्ह एक्झामिनेशन गायडन्स सेंटर, युपीएससी/एमपीएससी प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग सेंटर फॉर शेड्यूल्ड ट्राईब्ज स्टुडन्टस्, नेट, स्टुडंस कॉऊंसलिंग सेल, इक्वल अपॉच्र्युनिटीज सेल, अॅडव्हेंचर स्पोर्टस, कोचिंग क्लास फॉर एन्ट्री इन सर्व्हिसेस फॉर एस.सी./एस.टी. अॅण्ड मायनॉरिटी कम्युनिटीज स्टुडन्टस्, कोचिंग फॉर नेट फॉर एस.सी/एस.टी. मायनॉरिटीज, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, इन्स्ट्यूमेंट मेन्टेनंस फॅसिलिटीज फॉर कॅम्पस, बेसिक फॅसिलीटी फॉर वुमेन, फॅसिलीटी फॉर डिफरन्टली एबल्ड पर्सन्स, विद्यापीठ परिसर अभ्यास केंद्र, शोधगंगा इन्फर्मेशन अॅण्ड लायब्रारी नेटवर्क सेंटर या केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधेत वाढ झाली आहे. तद्वतच विद्यापीठ परिसरात जलतरण तलाव, कॅफेटरिया, झेरॉक्स, बँक, पोस्ट ऑफिस, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, हेल्थ सेंटर, बस सेवा इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
पेटेंटचे प्रमाण वाढावे, विद्यार्थी व शिक्षकांना चालना मिळावी, एवढचं नव्हे तर त्याबाबत सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी विद्यापीठाने पेटेंट सेल सुरू केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पेटेंट विद्यापीठातून सादर होण्यास सुरूवात झाली आहे. याशिवाय विद्यापीठाच्यावतीने शैक्षणिक सुविधांचे आदान प्रदान व्हावे, यासाठी देशांतर्गंत नामांकित संस्था व विदेशातील विद्यापीठांशी सामजंस्य करार केले आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना विदेशातील विद्यापीठात संशोधन करण्याची संधी सुविधा विद्यापीठाच्यावतीने दिल्या जातात.
परीक्षा आवेदनपत्र भरण्याची सुविधा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज महाविद्यालयांना सादर करणे सोयीचे झाले आहे. याशिवाय भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र बँक मध्ये ऑनलाईन परीक्षा विषयक शुल्क भरण्याची सुविधा सुद्धा विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागातून ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाचे परीक्षा विषयक शुल्क विद्यार्थी आता जमा करू शकतात. विद्यापीठाच्या विविध विभागांची व कार्यपद्धतीची, विविध योजनांची, उपक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी फॉर्म्स उपलब्ध व्हावेत, यासाठी जनसंपर्क विभागांतर्गंत चौकशी केंद्र सुरू करण्यात आले आहे, सर्व प्रकारची माहिती त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येते. याशिवाय परीक्षा विषयक माहिती परीक्षा विभागातील विविध कक्षांद्वारे दिली जाते.
कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी विद्यार्थ्यांना साहाय्यभूत असलेली ‘विद्यार्थी सहाय्यक योजना’ सुरू केली आहे. त्याअंतर्गंत विद्यापीठातील प्रमुख अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक विद्यापीठ वेबसाईट www.sgbau.ac.in वर प्रकाशित करण्यात आले. माहिती मिळविण्यासाठी त्याचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांना होत आहे.
470 एकराचा विद्यापीठाचा परिसर निसर्गरम्य म्हणून सर्वत्र ख्याती पावलेला आहे. जलसंवर्धन आणि वृक्षसंवर्धनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी विद्यापीठाला महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार - 1997, स्व. अजय किनखेडे स्मृति वनशेती पुरस्कार - 1998, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र राष्ट्रीय पुरस्कार - 1998, वसंतराव नाईक (सामाईक) पुरस्कार- 1999, इंदिरा गांधी राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार - 2005 हा राष्ट्रीयस्तरावरील पर्यावरण पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
उत्कृष्ट कार्याचा सन्मान विद्यापीठाद्वारे केला जातो.
संत गाडगे बाबांच्या विचार व कार्यानुसार कार्य करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेला दरवर्षी विद्यापीठाद्वारे स्व. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ ‘संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार’; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राचार्य, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांना ‘उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार’, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तीला ‘विद्यापीठ पर्यावरण पुरस्कार’ आणि संशोधनासाठी ‘कल्पना चावला यंग लेडी रिसर्च पुरस्कार’ इत्यादी पुरस्कार विद्यापीठाद्वारे दिल्या जातात.
क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यापीठाच्या कलाकार व क्रीडापटू विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय व पश्चिम विभागीय स्तरावर नेत्रोद्दीपक कामगिरी करून विद्यापीठाचा गौरव देशपातळीवर पोहचविला आहे. राज्यपाल पुरस्कृत अश्वमेध, आविष्कार आणि इंद्रधनुष्य स्पर्धांचे विद्यापीठाने नेत्रोद्दीपक आयोजन केले आहे.
32 वर्षांच्या गौरवशाली कार्यकाळात विद्यापीठाने सुप्रसिद्ध पार्श्व गायिका श्रीमती आशा भोसले, सुप्रसिद्ध समाजसेविका सर्वोदयी नेत्या गांधीवादी विचारवंत स्व. निर्मलाताई देशपांडे, थोर साहित्यिक डॉ. वि. भ. उपाख्य भाऊसाहेब कोलते, माजी राष्ट्रपती स्व.आर.वेंकटरमण् यांना सर्वोच्च वाड्:मय पंडीत (डिलीट) ही उपाधी देऊन तर डॉ. एम.टी.करडे, डॉ. किशोर अढाव यांना डि.एस्सी. देऊन गौरविले आहे.
विद्यापीठाला माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण, थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम आणि प्रथम महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. गेल्या 32 वर्षामध्ये विद्यापीठातून तयार झालेले अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर विविध संस्थांमध्ये कार्यरत आहे, याचा सर्वांना अभिमान आहे.
संपर्क :अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in वर संपर्क केला जाऊ शकतो.
-विलास नांदुरकर जनसंपर्क अधिकारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/3/2020
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.