অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वसईचा किल्ला

वसईचा किल्ला

मुंबईपासून उत्तरेला 30 मैलांवर असलेले वसई हे ठिकाण खाडीच्या उत्तर तीरावर होते. आज वसई हे नगर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याचे मुख्य ठिकाण असून उपनगरी पश्चिम रेल्वेमार्गावर आहे. रेल्वे स्टेशनपासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बससेवा आहे. तेथे जाण्यासाठी रिक्षाही मिळू शकते.

प्राचीन काळापासून व्यापारी महत्त्व असलेले सोपारा हे बंदर वसईपासून अवघ्या सहा मैलावर असल्यामुळे मध्ययुगीन काळात पोर्तुगीजांचे या भागात बस्तान बसेपर्यंत वसईला महत्त्व येऊ शकले नाही. देवगिरीच्या यादवांच्या आमदानीत वसई एका प्रांताची राजधानी होती असा संदिग्ध उल्लेख एका शिलालेखात आहे.

16 व्या शतकाच्या सुरवातीला हे चित्र बदलले. गुजरातचा सुलतान महंम्मद बेगडा (1459-1513) याने मुंबई व या बेटाचा ताबा घेतला. 1514 साली बार्बोसाने वसईचे वर्णन “गुजरातच्या राजाचे एक उत्तम सागरी बंदर” असे केले आहे. त्याच्या आमदानीत वसईचा व्यापार वाढला, दर्यावर्दी उपक्रमांना उधान आले. भारतीय द्वीपकल्पातून तांबड्या समुद्रात जाण्याच्या मार्गावर वसई हे महत्त्वाचे बंदर बनल्यामुळे मसाल्याचे पदार्थ, कोको आणि पोफळीने भरलेली गलबते मलबारच्या किनाऱ्यावरुन वसईला येऊ लागली. 1526 साली पोर्तुगीजांनी वसईला वखार घातली. तथापि सुलतानाच्या जुलमी अधिकाऱ्यांचा आणि सागरी चाच्यांचा पोर्तुगीजांना बराच उपद्रव झाला असावा असे दिसते. या दुहेरी जाचाचा सूड उगवण्यासाठी इ.स.1529 मध्ये हेक्टर द सिव्हेरियाच्या अधिपत्याखाली 22 गलबतांचा ताफा उत्तरेतील समुद्रातील चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निघाला. या आरमारी ताफ्याने रात्रीच्या वेळी वसईच्या खाडीत प्रवेश करुन वसईवर हल्ला केला.

तेथे अली शाह या गुजरातच्या सुलतानच्या सरदारचा पराभव करुन त्याने वसई लुटली व गावात जाळपोळ केली. अशाच प्रकारची पुनरावृत्ती 1531 सालीही झाली तेव्हा असे प्रकार थांबविण्यासाठी काहीतरी कायमस्वरुपी उपाययोजना केली पाहिजे असे गुजरातच्या सुलतानास वाटू लागले. अशा तऱ्हेने होणाऱ्या हल्ल्यांचा आणि लुटालुटीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी व पोर्तुगीजांचा उत्तर किनाऱ्यावरील साम्राज्यविस्तार रोखण्यासाठी इ.स.1532 मध्ये त्यावेळचा गुजरातचा सुलतान बहाद्दुरशहा याने दीवचा सुभेदार मलिक टोकन यास वसई येथे कोट बांधण्याची आज्ञा दिली. त्यानुसार खाडीच्या आणि समुद्राच्या बाजूला तट व तटांच्या बाहेरच्या बाजूला खाऱ्या पाण्याच्या खंदकांची निर्मिती करण्यात आली. या कोटाच्या रक्षणासाठी घोडदळ व पायदळ मिळून 15,000 सैन्य ठेवण्यात आले. हा वसईचा पहिला कोट होय.

वसईचा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून तो केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीत येतो. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या मुंबई मंडळाने वसई किल्ल्याच्या सर्वांगीण जतन-दुरुस्तीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. आजही किल्ल्यातील बरेचसे अवशेष त्यांचे मूळ स्वरुप काय होते याची कल्पना येऊ शकेल अशा स्थितीत आहेत.

वसई किल्ल्याचा एक जाणवण्याजोगा विशेष म्हणजे नगरपालिका मार्गाच्या उत्तरेकडील मोकळा भाग. हा भाग जाणिवपूर्वक मोकळा ठेवण्यात आला होता. किल्ला बांधताना पोर्तुगीजांना याच दिशेने हल्ला होण्याची भिती वाटत असावी. जर यदाकदाचित शत्रू आत शिरलाच तर त्याला लपायला जागा मिळून नये व संपूर्ण सैन्य गोळीबाराच्या टप्प्यात यावे यासाठी ही मोकळी जागा ठेवण्यात आली होती. मराठ्यांनी जेव्हा तटाला भगदाडे पाडून आत शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही मोकळी जागा अगदी उत्तम तऱ्हेने कामी आली असेच म्हणावे लागेल.

बुरुजांचा बाणाच्या चपट्या पसरट शीर्षासारखा असणारा आकार हे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. अशा तऱ्हेचे बुरुज महाराष्ट्रातील फिरंगाणात फक्त वसईलाच आढळतात. वरळी किल्ल्यात त्याचे अर्धस्फुट स्वरुप आढळते. गुजरात राज्यातील दमण येथे असलेल्या पोर्तुगीज किल्ल्यालाही वसईसारखेच बुरुज आहेत.

पोर्तुगीज आमदानीत अत्यंत नियोजनपूर्ण असलेला आणि राजेशाहीतही अगदी गोऱ्या लोकांपुरती मर्यादित असलेली का असेना पण काहीशी लोकशाही असलेली नगरपालिका असलेला किल्ला हा आपला नक्कीच महान वारसा आहे. त्याचप्रमाणे अशा बलाढ्य परकीय सत्तेवर दुर्दम्य इच्छाशक्तीने व आत्यंतिक चिकाटीने भारतीयांनी मात केल्याची स्मृती म्हणूनही या किल्ल्याचे महत्व अपरंपार आहे.

लेखन - संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate