অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रायगड किल्ला

इतिहास

रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. जावळीचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला.छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.

महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला.  महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा."

महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक-खुबलढा बुरुज व दोन-नाणे(नाना)दरवाजा. याशिवाय कठीण अश्या हिरकणी कड्यावरुन उतरणार्या हिरकणीची कथा प्रसिद्ध आहेच. गडावर जाण्यासाठी सध्या रोप वे ची सोय आहे.

दळणवळण सुविधा

पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.

गन्स ऑफ पाचाड

जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.

या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणार्या थंड वार्याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचं आकर्षण येथे भेट देणार्याला पडते.

पर्यटनस्थळ

शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते. पर्यटकांनी अवश्य पाहावी अशी वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा रायगडावर आहे.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate