অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आदिवासी क्षेत्रातील किल्ले

आदिवासी क्षेत्रातील किल्ले

महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील ठाणे, पालघर तसेच उत्तरेकडील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आदिवासीबहुल भाग आहे. अमरावती जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आणि गडचिरोली जिल्ह्यातदेखील आदिवासी वसाहती मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे गडकिल्ले हे या आदिवासीबहुल भागात शिवपूर्व काळापासून वसलेले आहेत.

शिवाजी महाराजांच्या काळात या सर्व जिल्ह्यांपैकी फक्त नाशिक परिसरावर महाराजांची सत्ता होती. ठाणे, पालघर आणि डहाणू परिसरावर गुजरात सुलतान आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी राज्य केले होते. जव्हार या आदिवासीबहुल भागात भूपतगड आणि बळवंतगड असे दोन महत्वाचे डोंगरी किल्ले आहेत. भूपतगडावर आज तटबंदी तुरळक प्रमाणात शिल्लक असून खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत. किल्ल्यावर बांधकामाचे जास्त अवशेष दिसत नाहीत. नाशिक परिसरातून उत्तर कोंकणात उतरणाऱ्या घाट मार्गावर हा किल्ला बांधलेला आहे. बळवंतगड हा देखील कसारा घाट, थळ घाट या परिसरावर नजर ठेवण्यासाठी बांधता होता. शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोन वेळा छापा घातला होता दोनही वेळेला ही लूट घेऊन येताना महाराजांनी जव्हार परिसरातील अशेरी, असावा, काळदुर्ग, गंभीरगड, सेगवा, या किल्ल्यांवर मुक्काम केला होता अशी दंतकथा जवळजवळ प्रत्येक किल्ल्याच्या परिसरात सांगितली जाते. अशेरी हा एकमेव मोठा डोंगरी किल्ला पोर्तुगीजांनी डहाणूजवळ बांधला. खडकवणे किंवा खाड्कोन हे छोट्या वस्तीचे गाव किल्ल्याच्या पायथ्याला आहे गावातून गडाची उंची साधारणत: 350 मीटर आहे. गावात प्रवेश करतानाच गावाच्या वेशीवर लाकडामध्ये कोरुन काढलेला एक खांब दिसतो. या खांबावर वाघाचे आणि चंद्र-सूर्याचे शिल्प कोरलेले आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गावाचे पंचमहाभूतांपासून संरक्षण व्हावे म्हणून असा खांब वेशीवर उभा केला जातो. याच स्वरुपाचा लाकडी स्तंभ जव्हारच्या पूर्वेकडील भागात असलेल्या वाघेरा या किल्ल्याच्या पायथ्याला आहे. खैराई हा एक उंच किल्ला त्रिंबकेश्वर ते सिल्वासा या वाटेवरील ठाणपाडा आणि खैराईपाली या गावाजवळील डोंगरावर आहे. गडावर वेताळाचे मंदिर असून पाण्यासाठी तीन टाकी आहेत. गडाचा दरवाजा पडलेला असूनही त्याचे अवशेष दिसतात.

नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून तो गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे. गडकिल्ले म्हटले की, डोळ्यासमोर पश्चिम महाराष्ट्र, सह्याद्री पठार आणि कोकण हाच प्रदेश डोळ्यासमोर येतो. पण नंदुरबारसारख्या अत्यंत दुर्गम आणि सोयीसुविधा नसलेल्या भागामध्ये देखील एके काळी सुबत्ता होती हे तेथील गडकिल्ले आणि त्यावरील वास्तू पाहून समजते. नंदुरबार जिल्ह्यातून तापी ही एक मोठी नदी वाहते. तापी नदीमुळे या जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झालेले आहेत. उत्तर नंदुरबारच्या सीमेवरुन नर्मदा नदी वाहते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डोंगरी किल्ले फारच कमी आहेत. पण विशेषत: भुईकोट किल्ल्यांची संख्या या भागात जास्त आहे. 14 आणि 15 व्या शतकात हा भाग फारुखी राजसत्तेकडे होता. अहमदनगर, परांडा, औसा यासारखे भुईकोट किल्ले नंदुरबार जिल्ह्यात तुलनेने कमी आहेत. धडगाव हा किल्ला उत्तर नंदुरबार जिल्ह्यात येत असून या किल्ल्यावर तटबंदी, जंग्या, दरवाजे यांसारखे अनेक अवशेष दिसून येतात. चौगाव हा एक छोटा पण डोंगरी किल्ला या आदिवासी बहुल भागात आहे. याची उंची साधारणत: 50 मीटर असून किल्ल्याचे सर्व अवशेष हे पायथ्यापासून ते गडमाथ्यापर्यंत बांधलेले दिसतात. सुलतानपूर, फतेहपूर यासारख्या काही गावांनाच तटबंदी बांधलेली आहे. त्याच्या वेशीवर दरवाजे आहेत. चोपडा, शिरपूर या भागात गढी या प्रकारातील बांधकाम अनेक ठिकाणी दिसते.

गडचिरोली हा जिल्हा आदिवासीबहुल असून या भागातील लोकांची स्वत:ची विशिष्ट अशी संस्कृती आहे. या लोकांची स्थानिक दैवते आहेत. यामध्ये आपल्याला शिव, विष्णू, महिषासुरमर्दिनी यासारख्या देवतांच्या मूर्ती दिसणार नाहीत. ढोलाच्या तालावर येथील लोक विशिष्ट प्रकारचे नृत्य करताना दिसतात. या परिसरात घनदाट जंगल असल्याने आदिवासी जमातीचे वास्तव्य हे जंगलातच दिसून येते. साधारणत: 6-7 व्या शतकात या भूभागावर राष्ट्रकूट राजांचे राज्य होते. 11-12 व्या शतकात देवगिरीचे यादव यांनी या प्रदेशावर सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर येथे गोड राजांनी राज्य केले. बल्लारशाह या राजाने चंद्रपूर ही आपली राजधानी केली. चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासीबहुल भागात मध्ययुगीन कालखंडात साधारणत: 20 किल्ले बांधले गेले. वैरागड, सुरजागड, टिपागड, राजोली, इ. किल्ले घनदाट जंगलात वसलेले असल्यामुळे सध्या तेथपर्यंत पोहोचणे सहज शक्य नाही. यापैकी सूरजागड आणि राजोली हे गिरिदुर्ग प्रकारातील किल्ले आहेत. सुरजागडचा माथा सपाट असून तेथे आजही तटबंदी, दरवाजे, वाडे यांचे अवशेष पाहता येतात. हे सर्व अवशेष आज दाट झाडीमध्ये लपलेले आहेत. सुरजागड किल्ल्यावर स्थानिक लोकांचे ठाकूरदेव हे दैवत आहे. टिपागड हा अजून एक महत्त्वाचा किल्ला गडचिरोली या आदिवासीबहुल भागात येतो. टिपा या शब्दाचा गोंड भाषेत अर्थ द्वीप असा होतो. पूरमशाह नावाचा गोंड राजा येथे राज्य करीत होता आणि त्याने आजच्या छत्तीसगडचा बराच भाग जिंकला होता. विदर्भातील अमरावती या जिल्ह्याच्या उत्तरेला मेळघाट हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. याच परिसरात गाविलगड आणि नरनाळा हे प्रचंड मोठा विस्तार असलेले किल्ले आहेत. मेळघाट या घनदाट जंगलात कोरकू, गोंड, निहल, बालाई अशा विविध आदिवासी वसाहती आहेत. नरनाळा हा विदर्भातील गिरिदुर्ग अकोला जिल्ह्यातील अकोट शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेत स्थित आहे. 15 व्या शतकात हा किल्ला बहामनी राजाच्या ताब्यात होता. किल्ल्याच्या तटबंदीस अनेक बुरुज आणि लहानमोठे दरवाजे होते. परंतु आता मोजकीच बांधकामे सुस्थितीत आहेत आणि ती देखील वेगवेगळ्या काळात बांधली गेली आहेत. दिल्ली दरवाजा, आकोट दरवाजा, शिरपूर दरवाजा, शहानुर दरवाजा ही गडाची मुख्य प्रवेशद्वारे आहेत. औरंगजेबाच्या काळातील तोफसुद्धा आहे हे त्यावरील कोरलेल्या लेखातून कळते. किल्ल्यात तलाव बांधून पिण्याच्या पाण्याची अगदी उत्तम व्यवस्था केलेली दिसते. किल्ल्यात अनेक भग्न इमारती आहेत त्यात राणीचा महल हा भव्य व मजबूत अशी वास्तू आहे.

गावितगड हा अजून एक गिरिदुर्ग अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या घनदाट जंगलात बांधलेला दिसतो. सर्वप्रथम हा दुर्ग गवळी लोकांनी माती आणि दगड याचा वापर करुन बांधला होता व त्याला गवळीतट हे नाव दिले होते असे म्हणतात. या किल्ल्याच्या बांधणीचा काळ निश्चित सांगता येत नाही. किल्ल्यात अनेक बांधकामे केलेली होती. पण ती आता भग्न स्वरुपात आहेत. त्यामध्ये मंदिर, तलाव, राणीमहाल, समाध्या, मशिदी आणि इतर छोटी मोठी बांधकामे होती. यामध्ये दिल्ली दरवाजा हे अतिशय भव्य असे प्रवेशद्वार आहे त्यावर एक लेख कोरलेला आहे. किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर सिंह व हत्ती असलेले शिल्पांकन कोरलेले दिसतात. गडाची तटबंदी आणि बुरुज असूनही चांगल्या स्थितीत आहेत. 

लेखक - डॉ.सचिन जोशी
(लेखक पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात पुरातत्व विभागात संशोधक आहेत.)

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate