অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रायगड किल्ला

रायगड किल्ला

रायगड

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. रायगड जिल्ह्यात तो महाडच्या उत्तरेस २५ किमी. वर व जंजिऱ्याच्या पूर्वेस ६५ किमी. वर सह्याद्री पर्वतश्रेणींत ५·१२५ चौ. किमी. घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेल्या पठारावर वसला आहे. त्याची सस.पासून उंची ८४६ मी. असून सभोवती सांदोशी, छत्री निजामपूर, वाघेरी, वाडी, पाचाड असे खेड्यांचे गट दिसतात. रायरी हे या टेकडीचे जुने नाव. पाश्चात्त्य लोक त्याचा उल्लेख पूर्वेकडील जिब्राल्टर असा करीत. ईशान्येकडील लिंगाणा, पूर्वेकडील तोरणा, दक्षिणेकडील कांगोरा चांभारगड-सोनगड, वायव्येकडील तळेगड व उत्तरेकडील घोसाळगड या किल्ल्यांची रायगडाभोवती संरक्षणाची फळी उभी राहिली. हे जाणूनच शिवाजी महाराजांनी तेथे राजधानी केली.

रायगडचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. रायगडविषयी अनेक कथा, दंतकथा-वदंता प्रचलित आहेत. छ. शिवाजी-संभाजी यांच्या कारकीर्दीत येथे इंग्रज, डच, पोर्तुगीज इ. वकिलांनी भेट देऊन या किल्ल्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यांत फ्रायर, हेन्री ऑक्सिंडेन, गोन्कालो मर्तिन्स, टॉमस निकल्स आदींचे वृत्तांत इतिहासावर प्रकाश टाकतात. बाराव्या शतकात रायरी हे मराठे पाळेगारांचे निवासस्थान होते. चौदाव्या शतकात या पाळेगारांनी विजयानगरचे मांडिलकत्व पतकरले. इ. स. १४३६ मध्ये दुसऱ्या अलाउद्दीन बहमनीशाहने तो आपल्या ताब्यात घेतला.

इ. स. १७४९ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने रायरी आपल्या ताब्यात घेतली. याकुत इस्तंबोली हा त्यांचा किल्लेदार असतानाच आदिलशाहीच्या वतीने हैबतखानाने रायरीवर हल्ला केला आणि आसपासच्या प्रदेशांसह किल्ला जिंकला. त्याने राजे पतंगराव यास किल्लेदारी दिली. पुढे मलिक जमरून हा हवालदार झाला (१६२१). पुन्हा हा किल्ला निजामशाहीत गेल्याचे दिसते. मोगलांनी निजामशाही नष्ट केल्यानंतर आदिलशाहाशी झालेल्या करारानुसार रायरी आदिलशाहीकडे आली (१६३६). आदिलशाहने १६३६ ते १६४४ दरम्यान जंजिऱ्याच्या सिद्दी घराण्यातील इब्राहीम, सय्यद कब्बरी व शेख अली यांना हवालदारीचे हक्क दिले.

नंतर चंद्रराव मोरे यांच्याकडे रायरी आदिलशाहीतर्फे गेली. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून १६५६ च्या सुमारास चंद्रराव मोऱ्यांकडील सर्व किल्ले काबीज केले. त्यात रायरी १५ एप्रिल ते १४ मे १६५६ दरम्यान त्यांच्या हाती आली असावी. शिवाजींनी रायरीचे रायगड असे नाव ठेवले आणि राजधानी करण्याच्या दृष्टीने कल्याणचा सुभेदार आबाजी सोनदेव यास इमारतींची डागडुजी, नव्या इमारती बांधणे, सुरक्षिततेसाठी तटबंदी उभारणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे इ. कामे सोपविली. या कामी पन्नास हजार होन खर्च करण्यात आला. तिथे तीन-चार वर्षांत लहानमोठ्या तीनशे वास्तू बांधण्यात आल्या. शिवाजी महराजांनी १६६२ मध्ये कायमच्या राजधानीसाठी रायगडची निवड केली; तथापि १६७० पर्यंत येथे राजधानी हलविण्यात आली नव्हती.

१६७४ मध्ये येथेच स्वतःला महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर १६८९ पर्यंत तो छ. संभाजीच्या ताब्यात होता. पुढे मोगलांनी तो घेतला (१६८९) आणि नंतर पुन्हा मराठ्यांनी घेतला (१७३५); परंतु त्याचे वैभव नष्ट झाले. उत्तर पेशवाईत तो राजकीय कैद्यांच्या बंदिवासाचे ठिकाण होते. नाना फडणीस व दुसरा बाजीराव यांनी पडत्या काळात सहकुटुंब त्याचा आश्रय घेतला. नाना फडणीसाने १७९६ मध्ये काही इमारतींची डागडुजी केली. मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने १० मे १८१८ रोजी रायगड जिंकून घेतला. त्यावेळच्या तोफांच्या माऱ्यात अनेक इमारती पडल्या. त्यानंतर शिवजयंती उत्सवानिमित्त १८९७ मध्ये लो. टिळक प्रभृतींनी लोकजागृतीसाठी या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा उजाळा दिला. आता ते पर्यटकांचे एक प्रेक्षणीय स्थान झाले आहे.

गारखाना, मनोरे, बुरूज, मंदिरे इ. काही तुरळक वास्तू वगळता रायगडावरील बहुतेक इमारती आज नष्ट झालेल्या आहेत. त्यांचे भग्न अवशेष इतस्ततः विखुरलेले असून त्यांतून वास्तूंच्या भव्यतेची कल्पना येते. रायगडावर पाचाडकडून वाडीमार्गे जाणारा रस्ता अधिक सोयीचा आहे. किल्ल्यास हिरकणी, टकमक, भवानी आणि श्रीगोंदे अशी चार टोके असून टकमक टोक व हिरकणी यांबद्दल रोमांचकारी दंतकथा प्रसिद्ध आहेत.

चोर दरवाज्याशिवाय किल्ल्याला एकच महाद्वार आहे. इतर बाजूंनी कातळ व काही ठिकाणी तटबंदी आहे. नाणे दरवाजा हे रायगडचे सुरुवातीचे प्रवेशद्वार असून त्याच्या आतील बाजूस महादरवाजा लागतो. तेथे बावीस मीटर उंचीचे दोन बुरूज आहेत. पहारेकऱ्यांसाठी दोन देवड्या होत्या. त्यातून आत गेल्यानंतर कोठारे लागतात. शिवाजींनी मुसलमानांसाठी एक मशीद बांधली होती. दक्षिणेस आडवाटेला चोरदरवाजा आहे. पुढे एक किमी.वर रायगडचा सपाट भाग आहे. येथे फरास मदारशाह या मुस्लिम साधूची कबर आहे. त्याजवळ अंडाकृती हत्ती तलाव (३३ X २३ मीटर) आणि पुढे शंभर मीटरवर गंगासागर तलाव (३३ X ३० मीटर) आहे. त्याच्या दक्षिणेस दोन मजली उंच दोन मनोरे आहेत. पूर्वी ते पाच मजली होते.

नोऱ्याच्या पश्चिमेस एकतीस पायऱ्या चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचा पालखी दरवाजा लागतो. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३०० X १५० मीटर असून सभोवती तटबंदी होती. आतील बाजूस जीर्ण झालेल्या इमारतींच्या दोन रांगा लागतात. उजवीकडे राण्यांचे सात महाल असून डावीकडे चाकरांच्या खोल्या होत्या.

त्या सर्वांची संडास-सांडपाण्यासह उत्तम व्यवस्था केलेली होती. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी सिंहासनाचा चौथरा असून तो सुस्थितीत आहे. सिंहासनासमोर कारंजे असून त्यापुढे पूर्वेला १६ मीटर उंचीचा भव्य नगारखाना आणि बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथेच शिवाजीराजांचा दरबार भरत असे. या सभागृहात ध्वनिकीच्या दृष्टीने विचार केलेला दिसतो; कारण नगारखान्यासमोरील व्यक्तीस सिंहासनाजवळ बोललेले स्पष्ट ऐकू येते. त्यासमोर शिवाजींचा वाडा व त्याभोवती कार्यालयीन इमारती होत्या.

गारखान्याच्या पूर्वेस कुशावर्त नावाचा तलाव आहे व जवळच श्रीगोंदे टोक आहे. याच्या दरम्यानच्या जागेत शिवाजींच्या अष्टप्रधानांचे वाडे होते. त्याच्या थोडे पुढे दारूखान्याचे कोठार (२५ X ६ मीटर) आहे. बालेकिल्ल्याच्या वायव्येस पीलखान्याची जीर्णशीर्ण वास्तू आहे. त्याच्या उत्तरेस गडावरील प्रसिद्ध बाजारपेठेचे अवशेष जोत्याच्या रूपाने अवशिष्ट आहेत. दोन्हीकडील मिळून येथे एकूण चव्वेचाळीस दुकाने होती. दोन रांगांत फरसबंदी असून सु. बारा मीटरचा रुंद रस्ता आहे. तेथून ईशान्येस प्राकारात हेमाडपंती पद्धतीने बांधलेले जगदीश्वर महादेवाचे मंदिर असून त्याच्या प्रवेशद्वारापाशी मारुतीची सुरेख पाषाणमूर्ती आहे. मंदिराभोवती नृत्यांगनांच्या राहण्याच्या खोल्या आहेत. मंदिरात एका शिलालेखावर राज्याभिषेकाची मिति-तिथी व शक यांचा उल्लेख आहे. मंदिराच्या पूर्व दरवाज्याच्या पुढे शिवछत्रपतींची समाधी व घुमटाकृती स्मारक आहे. त्याच्या समोर इमानी वाघ्या कुत्र्याचेही स्मारक आहे.

रायगडावरील इमारतींचा कालदृष्ट्या शोध घेणे कठीण आहे. शिवाजी-संभाजीनंतर त्याकडे दुर्लक्ष झाले आणि पेशवाईत तिथे फारसे बांधकाम झाले नाही, हे निश्चित. येथील वास्तुशैलीविषयी तज्ञांत मतैक्य नाही. अवशिष्ट वास्तूंतून सार्सेनिक व इस्लामी वास्तुशिल्पशैलीचे मिश्रण आढळते, प्रसंगोपात्त त्यात काही स्थानिक वास्तुविशेषही मिसळलेले दिसतात.

 

संदर्भ : 1. Kamalapur, J. N. The Deccan Forts, Bombay, 1961.

२. आवळसकर, शां. वि. रायगडची जीवनकथा, पुणे, १९६२.

३. घाणेकर, प्र. के. साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! पुणे, १९८५.

४. जोशी, पु. म. संपा. ऐतिहासिक साधने (इ. स. १५८८-१८२१), मुंबई, १९६४.

४. ठाकरे, प्रबोधनकार, रायगड, मुंबई, १९५१.

५. टिपणीस, गो. गो. रायगडची माहिती, पुणे, १८९६.

६. रामदास, र. वा. रायगड दर्शन, मुंबई, १९५९.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate