यूरोपीय रशियांतर्गत उद्मुर्त या स्वायत्त प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ४,२२,००० (१९७०). हे ईझकाठी (कामाची उपनदी) स्वर्डलॉफ्स्कच्या पश्चिमेस ४४० किमी. असून उरल भागातील जुन्यापैकी औद्योगिक केंद्र समजले जाते. येथे उत्कृष्ट पोलादाची निर्मिती होत असल्याने यंत्रे, हत्यारे, मोटरसायकली तयार होतात. येथील अठराव्या शतकातील शस्त्रांचा कारखाना प्रसिद्ध आहे. परिसरातील जंगल व शेतमाल यामुळे येथे लाकूडगिरण्या, अन्नप्रक्रिया इ. कारखाने असून फर्निचर, पियानो इ. वस्तूंची निर्मिती होते. हे दळणवळणाचे तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र समजले जाते. उद्मुर्त भाषासाहित्य, वैद्यक, मृदा व कृषिशास्त्र यांच्या विशेष अभ्यासाची येथे सोय आहे.
अंतिम सुधारित : 6/22/2020