गायधनी वाडा झालाय नाशिकचं भांडारकर !
जयंत गायधनींच्या संग्रहात जपलाय तीन हजार हस्तलिखितांचा ठेवा
माळ्यावरच्या अडगळीत पडलेल्या पोथ्यांची बाडं आपल्या संस्कृतीचा ठेवा आहेत. त्यातील लाखमोलाच्या असंख्या पोथ्या, हस्तलिखिते अन् दुर्मीळ ग्रंथांना जयंत गायधनी यांच्या चिकीत्सक अन् संशोधक नजरेने हेरलं अन् या पोथ्यांना हक्काच घर मिळालं. मेनरोडवरील गायधनी वाड्यात नाशिकचं भांडारकर वसलं आहे असं कोणी म्हटलं तर अतिशयोक्ती वाटू नये... या पोथ्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्यावर संशोधन व्हायला हवं या भावनेपोटी गायधनी यांनी आतापर्यंत तीन हजार हस्तलिखितांना आपल्या वाड्यात पोटतिडकीने जपलं आहे.
जयंत गायधनी यांना वडिलोपार्जित ग्रंथसंपदा व हस्तलिखिते जपताना हस्तलिखिते संवर्धनाचा छंद जडला. एकदा काशीचे अनंतशास्त्री फडके, सिन्नरचे मालपाठक, भय्याजी जोशी यांच्या संग्रहातील सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची असंख्य हस्तलिखिते त्यांना मिळाली. त्यानंतरच त्यांनी आपल्या छंदाला हा वारसा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याच्या दृष्टीने वाहून घेतले. सध्या त्यांच्याकडे तीन हजाराहून अधिक हस्तलिखिते आहेत. योग, धर्म, कविता, गणित, स्थापत्य, आयुर्वेद, व्याकरण, युद्धशास्त्र अशा अनेक विषयांवरील हस्तलिखिते मोडी, देवनागरी, संस्कृत, पारशी, उर्दू, बंगाली, नेपाळी, ओडीशी लिपीतील मात्र संस्कृत भाषेतील ही सहाव्या शतकापासून दीडशेवर्ष जुनी हस्तलिखिते गायधनींच्या संग्रहात आहेत. सहाव्या शतकातील रामायणावरील पोथीही त्यांच्याकडे आहे तर नेपाळी लिपीतील परंतु संस्कृत भाषेत असलेले सुंदरकांड हे हस्तलिखितही येथे आहे. पानिपत युद्धाचे वर्णन असलेली पेशवे बखर मोडीत उपलब्ध आहे. तर वेदांमध्ये आलेल्या व्यवसायांची सूची असलेली पोथीही त्यांच्याकडे आहे. या सर्व हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी पुण्यातील भांडारकर इन्स्टट्यिूटच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. अनिता जोशी यांच्या मदतीने आतापर्यंत शंभर हस्तलिखितांचे डिजिटलायजेशनही करण्यात आले आहे.
‘मला मोडी, पारशी अथवा बंगाली येत नाही. पण हा ठेवा जपला गेला पाहिजे या भावनेतून हा संग्रह वाढत गेला. हस्तलिखिते खराब होऊ नयेत म्हणून भांडारकर संस्थेकडून देखभाल करून घेण्यात आली आहे. प्रत्येक हस्तलिखिताचा विषय, नाव, लेखक, साल, स्थिती याची सूचीही तयार करण्यात आली आहे. यामुळे हस्तलिखितांच्या अभ्यासासाठी येणाऱ्यांना खूप उपयोग होतो. भावी पिढीसाठी एक महत्त्वपूर्ण बौद्धिक व सांस्कृतिक वारसा जपला जाण्याचा हा एक प्रयत्न आहे.
घरात गेल्या २५ वर्षांपासून हस्तलिखितांचा संग्रह जपला जात आहे. हे लहान-पणापासून पाहत असल्याने मीही या हस्तलिखितांचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयत्न करत असून, सध्या मोडी व शारदा लिपी शिकत आहे. चैतन्य गायधनी
घरातील हस्तलिखितांचा संग्रह म्हणजे आमच्या कुटुंबातील एक सदस्यच आहे. त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आम्ही सर्वांनी मिळून उचलली आहे. हा वारसा आपल्या संस्कृतीचा भाग असल्याने त्यावर अभ्यास होण्याची गरज आहे. बिना गायधनी
लेखक : रमेश पडवळ
rameshpadwal@gmail.com
contact no : 8380098107
अंतिम सुधारित : 6/29/2020
नाशिक शहरातील सिडकोचा परिसर. आसपास दुकाने आणि घरां...
नाशिकच्या मातीला धैर्य अन् शौर्याचा गंध आहे. म्हण...
हवामान बदलामुळे द्राक्षशेतीत रोगांची समस्या व त्या...
स्वयंचलित खाद्य, पाणी व्यवस्थापन यंत्रणेचा वापर ...