অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-बारा)

महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.

नागपूर

ड्रॅगन पॅलेस टेंपल

कन्हान कामठी येथे ड्रॅगन पॅलेस या बौद्ध मंदिराची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली. येथे चंदनाची अत्यंत रेखीव अशी बुद्धाची पुर्णाकृती मूर्ती आहे. ड्रॅगन पॅलेस मंदिर हे ‘लोटस टेंपल’ नावाने ओळखले जाते.

कसे पोहोचाल?
कामठी येथे जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत.

दीक्षाभूमी

14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘दीक्षाभूमी’ येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गांनी घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. हे बौद्धधर्मींयांचे आदराचे स्थान असून येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व बौद्ध स्तूप उभारण्यात आले आहे. दीक्षाभूमी या पवित्र स्थानाचे दर्शन घेण्यासाठी देशातील तसेच परदेशातील मुख्यत्वे जपान आणि थायलंड येथील अनुयायी दरवर्षी भेट देतात. 

कसे पोहोचाल?
दीक्षाभूमी नागपूर शहरात असून एसटी बसेस उपलब्ध आहेत.

यवतमाळ

टिपेश्वर अभयारण्य

पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर अंतर्गत संरक्षित क्षेत्रामध्ये टिपेश्वर अभयारण्याचा समावेश आहे. वाघांसोबतच अस्वल, चांदी अस्वल, निलगाय, रोही, सांबर, चितळ, इत्यादी प्रकारचे प्राणी व निलकंठ, हरीयल, पोपट, गरूड, घार, गिधाड, ससाना, घुबड, तीतर, बटेर, देवचिमनी इ. पक्षीसुद्धा आहेत. मोठ-मोठ्या वृक्षांसह मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात आहेत.

कसे पोहोचाल?

यवतमाळ ते पांढरकवडा 45 कि.मी. अंतर आहे. पांढरकवडा ते टिपेश्वर अभयारण्य 75 ते 80 कि.मी.अंतरावर आहे. एसटी बसेस उपलब्ध आहेत.

वाशिम

श्री नृसिंह सरस्वती जन्मस्थान, कारंजा

श्री दत्तात्रयाचे अवतार म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान म्हणून वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) ची ओळख आहे. येथे राज्यातून तसेच राज्याबाहेरून अनेक भाविक दर्शनासाठी येतात.

कसे पोहोचाल?

वाशिम रेल्वे स्थानकापासून कारंजा 60 कि. मी. अंतरावर आहे. कारंजा हे नागपूर-औरंगाबाद महामार्गालगत असलेले तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर महामार्गावरून जाणार्या बसेस बहुतांशी थांबतात.

श्री बालाजी मंदिर

वाशिमचा प्राचीन जहागीरदार तसेच बालासाहेब अशी ओळख असलेल्या बालाजीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर पेशवेकालीन असून मंदिरात चतुर्भुज जनार्धन मूर्ती तथा बालाजी मूर्ती आहे. मंदिराच्या बाजुलाच मोठा तलाव असून देव तलाव, बालाजी तलाव या नावाने हा तलाव ओळखला जातो. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर धार्मिक व पर्यटन क्षेत्र म्हणून सुपरिचित आहे.

कसे पोहोचाल?

मंदिर हे वाशिम येथेच असल्याने नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली येथून एस. टी. बसची सुविधा उपलब्ध आहे.

 

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate