অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योकोहामा

योकोहामा

योकोहामा

जपानमधील प्रसिद्ध औद्योगिक शहर व बंदर. टोकिओ उपसागराच्या पश्चिम किनाऱ्यावर होन्शू बेटावर,टोकिओच्या नैऋत्येस सु. ३० किमी.वर ते वसले आहे. लोकसंख्या २७,७३,८२२ (१९८१). लोकसंख्येच्या दृष्टीने ते जपानचे चौथ्या क्रमांकाचे शहर असून कानागावा विभागाची येथे राजधानी आहे. योकोहामा व कावासाकी या दोन शहरांमुळे औद्योगिक संकुल निर्माण झाले आहे.

योकोहामाचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही. प्रारंभी ते एक मच्छीमारीचे साधे बंदर होते. एकोणिसाव्या शतकात अमेरिकी राजदूत मॅथ्यू कॅलब्रेथ पेरी (१७९४–१८५८) याने योकोहामाजवळ प्रथम आपले जहाज नांगरले (१८५३). त्यानंतर तो पुन्हा राष्ट्राध्यक्षाची पत्रे घेऊन जपानमध्ये आला आणि कानागावाच्या तहानुसार अमेरिकी जहाजांना व्यापारासाठी परवानगी देण्यात आली. १८५८-५९ दरम्यान अमेरिकेशी व्यापारी करार झाला. मात्र १८७२ मध्ये योकोहामा रेल्वेने टोकिओशी जोडल्यानंतर बंदराचा विकास आणि वाढ झपाट्याने झाली. याच सुमारास त्याचा देशांतर्गत शहरांशी व्यापारही वाढला. १ सप्टेंबर १९२३ रोजी भूकंपाने योकोहामा जवळजवळ उद्‌ध्वस्त झाले. त्यानंतर त्याची पुन्हा उभारणी करण्यात आली. परंतु दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांनी त्यावर बाँबवर्षाव करून त्याचे अतोनात नुकसान केले (१९४५). या दोन्ही संकटांतून विद्यमान योकोहामा पुन्हा विसाव्या शतकात उभे राहिले. ते नागरी बोटींसाठी १९६२ नंतर खुले करण्यात आले.

योकोहामा हे एकेकाळी प्रक्रिया न केलेल्या रेशमासाठी प्रसिद्ध होते व अमेरिकेला तसेच पौर्वात्य देशांस त्याची निर्यात होत असे. त्यामुळे ‘रेशीम बंदर’ म्हणूनच ते प्रसिद्ध होते. रेशमाप्रमाणेच चहाही येथून मोठ्‌या प्रमाणावर निर्यात होई. मात्र १९५० नंतर रेशीम व चहा ह्या गोष्टी मागे पडून सुती कपडे, पोलाद व लोखंडाच्या वस्तू, यंत्रसामग्री, विजेची उपकरणे, मोटारी, कॅमेरे, दूरचित्रवाणी संच इ. वस्तू निर्यात होऊ लागल्या. येथे जहाजबांधणी, मोटारगाडी, रासायनिक द्रव्ये तसेच तेलशुद्धीकरणाचे कारखाने आहेत. तेल, सोयाबीन, कच्चे लोखंड यांची आयात येथूनच केली जाते. शहराचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा उपवने व उद्याने यांच्याद्वारे पूर्ववत वाढविण्याचा प्रयत्न जपानी लोकांनी केला आहे, याचे द्योतक म्हणजे नोगेयामा, यामाशिटा इ. पार्क होत. नोगेयामा ही शहरातील सर्वांत मोठी बाग असून, जपानी उद्यानविज्ञानाचे प्रगत तंत्र येथे दृग्गोचर होते. याशिवाय या उद्यानात खुले नाट्‌यगृह,प्रशस्त सभागृह आणि प्राणिसंग्रहालय आहे. उद्यानाजवळच कानाझावा बूंको हे प्राचीन ग्रंथालय असून (स्था. १२७५) त्यात प्राचीन ऐतिहासिक ग्रंथांबरोबरच जुनी कागदपत्रे आहेत. दाईजुंगो येथे शिंतो संप्रदायाचा एक स्तूप असू झेन बौद्ध धर्माचे लहान-मोठे अनेक स्तूप व मंदिरे आहेत. योकोहामात दोन खासगी व दोन सार्वजनिक अशी चार विद्यापीठे आहेत.

हे शहर रेल्वे व हवाईमार्ग यांनी देशातील इतर प्रमुख शहरांशी जोडले आहे. येथील औद्योगिक कारखान्यांमुळे याला जागतिक बाजारपेठेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate