गोमल. सिंधूची एक उपनदी. लांबी सु. २४० किमी. ही अफगाणिस्तानात कोह नाक पर्वतश्रेणीतील सरवंदीजवळ उगम पावून वझीरीस्तान व अफगाणिस्तान यांमधील समांतर रांगांचा टेकड्यांचा पट्टा भेदून दोमंदी येथे पाकिस्तानात शिरते व डेरा इस्माइलखानजवळ सिंधूला मिळते. कुंदार, वनतोई व झोब या तिच्या उपनद्या होत. गुमलच्या मार्गातच २,२८६ मी. उंचीवर खैबर व बोलान यांदरम्यानची सर्वांत महत्त्वाची गुमल खिंड आहे. खिंडीच्या तोंडाशी गुलकच्छ, निलिकच्छ व कोट मुर्तझा ही ठाणी आहेत.
कधीकधी गुमल नदीचा सर्व मार्गच गुमल खिंड म्हणून ओळखला जातो. या प्राचीन मार्गाने पोविंडा हे व्यापारी उंटांच्या किंवा गाढवांच्या पाठीवर फळे, कातडी, कापड इ. माल लादून व्यापार करीत. ते उन्हाळ्यात अफगाणिस्तानात आणि हिवाळ्यात हल्लीच्या पाकिस्तानाच्या मैदानात वस्ती करीत. गुमलचे बहुतेक पाणी ओलितासाठी वापरले जाते व फक्त पुराच्या वेळीच ते सिंधूला मिळते. गुमल-झोब संगमाखाली खजुरीकच्छ व मियान नूर येथे धरणे, सु. ४१ किमी. कालवे व खजुरीकच्छ, मुर्तझा, गुमल व कोट आझम येथे विद्युत केंद्रे अशा गुमलझोब प्रकल्पाची ६३,००० हे. पेक्षा अधिक पिकाऊ जमिनीस पाणीपुरवठा व १,११,००० किवॉ. जलविद्युत्निर्मिती यांसाठी १९६० पासूनची योजना आहे.
अंतिम सुधारित : 6/27/2020
मोठ्या भूप्रदेशावरून वाहत जाणारा निसर्गोत्पन्न जलप...
नदी जलवाहतुकीस उपयुक्त असल्यानेच हिला युक्रेनची व्...
दुष्काळी भागातील शेती शाश्वत व किफायतशीर करावयाची...
कृष्णा नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते.