कार्लोस द साआव्हेद्रा लामास: (१ नोव्हेंबर १८७८ – ५ मे १९५९). अर्जेंटिनाचा मुत्सद्दी, विधिज्ञ व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा लॅटिन अमेरिकेतील पहिला मानकरी (१९३६). त्याचा जन्म ब्वेनस एअरीझ (अर्जेंटिना) येथे राजकारणाची परंपरा असलेल्या सधन सरदार घराण्यात झाला. ब्वेनस एअरीझ विद्यापीठातून त्याने कायद्याची पदवी घेतली आणि पुढे या विषयात डॉक्टरेट मिळविली (१९०३). त्याने ला प्लाता व ब्वेनस एअरीझ येथील महाविद्यालयांत काही वर्षे अध्यापनाचे काम केले. ब्वेनस एअरीझ नगरपालिकेचा सचिव व पतपेढीचा संचालक ही पदेही त्याने सांभाळली (१९०६–१९०७). परिणामतः तो सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाला व १९०८ मध्ये अर्जेंटिनाच्या संसदेवर निवडून आला. संसदेत त्याने कायदा संमत करून घेऊन एतद्देशीय साखर उद्योगांना परराष्ट्रीय चढाओढींपासून संरक्षण मिळवून दिले (१९१२). त्याची कायदामंत्री व नंतर सार्वजनिक शिक्षणमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली (१९१५). त्याने जिनीव्हा आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत अर्जेंटिनाचे नेतृत्व केले व अध्यक्षपद भूषविले (१९२८). त्यानंतर त्याची परराष्ट्रमंत्रिपदावर नियुक्ती करण्यात आली (१९३२ – ३८).
अर्जेंटिनाच्या परराष्ट्रीय धोरणात त्याने आमूलाग्र बदल केले. स्पॅनिश वसाहतींतील स्वतंत्र देशांतील मित्रत्व व सामंजस्यासाठी त्याने प्रयत्न केले. यासाठी रीओ द जानेरो येथील परिषदेत त्याने युद्ध विरोधी करार (१९३३) मांडला. याचा मसुदा त्यानेच तयार केला होता आणि १९३४ पर्यंत या करारावर १४ राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारात (१) युद्ध वा आक्रमण केल्यास त्या राष्ट्रावर सर्वानुमते दंड लादावा, (२) आंतरराष्ट्रीय शांततेकरिता सहकार्य व हमी द्यावी आणि (३) करारातील सर्व राष्ट्रांनी तटस्थता पाळावी असे होते. त्याच्या या प्रयत्नांना अंशतः यश मिळाले. या धोरणामुळे पूर्व गोलार्धातील अमेरिका व अर्जेंटिना यांमधील प्रदीर्घकाह चालू असलेल्या ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेस चालना मिळाली. परिणामतः लॅटिन अमेरिकन राष्ट्रांतील मूलभूत मतभेद १९३३ च्या अंतर-अमेरिकन परिषदेत शमविण्याचा प्रयत्न झाला. याच सुमारास बोलिव्हिया आणि पॅराग्वाय यांत ग्रान चाको प्रदेशावरून सीमातंटा उद्भवला आणि त्याचे रूपांतर चाको युद्धात झाले. तेव्हा लामासने प्रयत्नांची पराकाष्ठा करून सन्मान्य तोडगा काढला.
अखेर युद्धविरोधी तहावर शिक्कामोर्तब झाले (१९३५). या कार्यामुळे त्यास राष्ट्रसंघाच्या सतराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद मिळाले (१९३५). तसेच ब्वेनस एअरीझ येथील सकल अमेरिकन परिषदेचे अध्यक्षपदही त्याने भूषविले. त्याने राष्ट्रसंघाच्या सहकार्याने सुरक्षितता आणि शांतता यांसाठी काही संरक्षणात्मक मार्ग सुचविले. त्याच्या या शांतता कार्याचा उचित गौरव त्यास शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आला (१९३६). परराष्ट्रमंत्रिपदातून निवृत्त झाल्यानंतर त्याने उर्वरित जीवन अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून व्यतीत केले. ब्वेनस एअरीझ राष्ट्रीय विद्यापीठाचा अध्यक्ष (१९४१-४३) व तेथेच तो प्राध्यापक झाला (१९४३-१९४६). स्फुटलेखनाव्यतिरिक्त त्याने विपुल ग्रंथलेखन केले. त्यांपैकी आंतरराष्ट्रीय धोरणावरील पोर ला पाझ द लास अमेरिकाज (१९३७) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अखेरच्या दिवसांत त्याच्यावर फॅसिस्ट म्हणून टीकेची झोड उठवली. आंतराष्ट्रीय कायद्याचे सूक्ष्म ज्ञान, व्यावहारिक मुत्सद्दीपणा आणि सामंजस्य यांचे पारंपरिक मिश्रण त्याच्या करारातून दृष्टोत्पत्तीस येते. त्याच्या धोरणात आंतराष्ट्रीय करार व त्यातून निर्माण होणारा समझोता यांची सांगड सैद्धांनिक तत्त्वानुसार घालण्याचा सक्रिय प्रयत्न दिसतो. तो ब्वेनस एअरीझ येथे मरण पावला.
संदर्भ : 1. Garner, W. R. The Chaco Dispute : A Study of Prestige Diplomacy, London, 1966.
2. Rout, L. B. Politics of the Chaco Peace Conference : 1935-1939, London, 1970.
3. Zook, D. H. The Conduct of The Chaco War, New York, 1961.
४. शेख रूक्साना, शांतिदूत, सातारा, १९८६.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/18/2020
इंग्लंडमधील एक राजकीय मुत्सद्दी व क्रांतिकारक. त्य...
मेक्सिकन मुत्सद्दी, निःशस्त्रीकरणाचा पुरस्कर्ता आ...
भारतातील एक राजकीय मुत्सद्दी व इतिहासाचे अभ्यासक.
अमेरिकन मुत्सद्दी, उपराष्ट्राध्यक्ष आणि शांतता नोब...