অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चार्ल्स गेट्स डॉझ

चार्ल्स गेट्स डॉझ

चार्ल्स गेट्स डॉझ : (२७ ऑगस्ट १८६५ – २३ एप्रिल १९५१ ). अमेरिकन मुत्सद्दी, उपराष्ट्राध्यक्ष आणि शांतता नोबेल पारितोषिकाचा मानकारी. मॅरीएट (ओहायओ) येथे जन्म. मॅरीएट महाविद्यालयातून एम्.ए. (१८८७) होऊन पुढे त्याने कायद्याचा अभ्यास केला आणि काही वर्षे नेब्रॅस्का राज्यातील लिंकन येथे यशस्वी रीत्या वकिली केली (१८९४). यानंतर त्याने विविध गॅस व इलेक्ट्रिक कंपन्यांच्या व्यवसायात पदार्पण केले. १८९६ मध्ये तो मॅकिन्‌लीच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत सहभागी झाला आणि त्यानंतर त्याची महालेखापरीक्षक म्हणून नियुक्ती झाली (१८९७–१९०१). पुढे सेंट्रल स्टेट कंपनी काढून तो बँकिंगच्या व्यवसायात पडला व एका बँकेचा संचालक झाला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यास मेजरची बढती मिळाली; परंतु जनरल जॉन जे परशिंगने त्याला युद्धसाहित्य पुरविण्याचे काम दिले, ते त्याने चोखपणे केले. यामुळे त्यास ब्रिगेडियर जनरल हा किताब मिळाला.

१९२१ मध्ये तो अर्थसंकल्पाच्या कार्यालयात संचालक झाला. त्याने सरकारी पैशाचा अपव्यय थांबवून अनेक सुधारणा केल्या; यामुळे १९२३–२४ मध्ये त्याची हानिपूर्ती समितीचा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. युद्धोत्तर जर्मनीची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याने एक योजना मांडली. ती ‘डॉझ योजना’ या नावाने प्रसिद्ध आहे. या कार्याबद्दल त्याला ऑस्टिन चेंबरलिनसमवेत १९२५ चे शांतता नोबेल पारितोषिक मिळाले. त्याच वर्षी तो अमेरिकेचा उपाध्यक्ष म्हणून निवडून आला; पण त्यात त्याला फारसा रस नव्हता. १९२९ मध्ये त्याची हर्बर्ट हूव्हरने परराष्ट्र वकील (राजदूत) म्हणून इंग्लंडला नियुक्ती केली. १९३२ मध्ये रिकन्स्ट्रक्शन फायनान्स कॉर्पोरशनचा अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली. उर्वरित आयुष्यात त्याने बँकिंग व इतर धंद्यांत अधिक लक्ष घातले.

डॉझ हा संगीतप्रेमी होता. त्याने पियानोवर काही संगीतरचना बसविल्या व त्या पुढे प्रसिद्धही झाल्या. याशिवाय त्याने आपले अनुभव ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. त्यांपैकी नोट्स ॲज व्हाइस प्रेसिडेंट (१९३५), ए जर्नल ऑफ रेपरेशन्स (१९३९) आणि जर्नल ॲज ॲम्बॅसॅडर टू ग्रेट ब्रिटन (१९३९) ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. तो एव्हॅन्स्टन (इलिनॉय) येथे मरण पावला.

 

संदर्भ : Timmons, B. N. Portrait of an American : Charles G. Dawes, New York, 1953.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate