टॉमस मोर : (७ फेब्रुवारी १४७८ – ६ जुलै १५३५). इंग्रज मुत्सद्दी, मानवतावादी व जगप्रसिद्ध यूटोपिया या ग्रंथाचा लेखक. त्याचा जन्म लंडन येथे सुखवस्तू कुटुंबात झाला. कायद्याच्या अभ्यासाची परंपरा मोरच्या कुटुंबात होती. त्याने लंडन येथील प्रसिद्ध सेंट अँथनी विद्यालयातून प्रारंभीचे शिक्षण घेतले, पुढील धार्मिक शिक्षण त्याने तत्कालीन आर्च-बिशप व चॅन्सेलर सेंट जॉन मॉर्टनच्या मार्गदर्शनाखाली घेऊन ग्रीक व लॅटिन भाषांचा अभ्यास केला आणि पुढील शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठातून पूर्ण केले. लंडनमध्ये लिंकन इनमधून त्याने कायद्याची पदवी घेतली (१४९८). सुरुवातीची चार वर्षे त्याने कार्थ्यूझन (जोग्यांचा संप्रदाय) पाद्र्यांच्या सहवासात व्यतीत केली आणि संतांसारख्या साध्या राहणीचा स्वीकार केला. पण मठातील एकूण कर्मठ जीवनाला विरोध करण्याच्या हेतूने त्याने जेन कोल्ट्स या वयाने खूप लहान असणाऱ्या युवतीबरोबर विवाह केला (१५०१). त्याना तीन मुली (मार्गारेट, एलिझाबेथ, सेसिली) आणि एक मुलगा (जॉन) झाला. त्यांपैकी मार्गारेट ही मुलगी आणि जावई विल्यम रोपर यांचे भावी आयुष्यात त्याला बहुमोल सहकार्य लाभले.
पहिली पत्नी कोल्ट्स वारल्यानंतर (१५११) त्याने ॲलिस मिड्लटन नावाच्या वयाने मोठ्या असलेल्या विधवेशी लग्न केले (१५११). तिच्यापासून त्याला पुढे संतती झाली नाही. मोरचे घर म्हणजे एक प्रकारची पाठशाळाच होती. तिथे ख्रिती धर्म-तत्त्वज्ञान यांचे अध्ययन-अध्यापन चालत असे. त्याने वकिली व्यवसायास प्रारंभ केला. याशिवाय त्याने लंडनमधील अनेक उद्योजकांचे व्यवहार हाताळण्याचे व त्याना सल्ला देण्याचे कामही केले. या कामात त्याला बऱ्यापैकी प्राप्ती होत असे. विद्यार्थिदशेतच त्याची डच विद्वान व कॅथलिक धर्मसुधारक इरॅस्मसशी (१४६६–१५३५) मैत्री जडली. रोमन कॅथलिक चर्चपरंपरेतील दांभिकता आणि भ्रामक समजुती इरॅस्मकप्रमाणे मोर यालाही मान्य नव्हत्या.
आठव्या हेनरीच्या राज्यभिषेकानंतर (१५०९) इरॅस्मस इंग्लंडमध्ये आला आणि मोरकडेच राहू लागला. दोघांनी मिळून काही प्राचीन ग्रीक वाङ्मयकृतींचे भाषांतर केले. मोरचे वाचन-मनन दिवसेंदिवस वाढत होते. मोरने तिसऱ्या रिचर्ड राजाच्या इतिहासावर लॅटिनमध्ये पुस्तक लिहिले. त्याचे १५१३–१८ दरम्यान हिस्टरी ऑफ किंग रिचर्ड द थर्ड हे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झाले. हा ग्रंथ इंग्रजी इतिहासलेखनाचा एक उत्तम नमुना असून शेक्सपिअरच्या याच नावाच्या नाटकाचा जुलमी नायक यातून जन्माला आला आहे. मे १५१५ मध्ये त्याची अँग्लो-फ्लेमिश व्यापारी करारासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात नियुक्ती झाली. या निमित्ताने त्याने बेल्जियममधील अनेक शहरांना भेटी दिल्या. तेथील अनुभवानंतर त्याने यूटोपिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला (१५१६). यूटोपिया या मूळ ग्रीक संज्ञेचा (औ तोपोस) अर्थ अस्थान, वा जागा नसलेले असा आहे. हा ग्रंथ प्लेटोच्या रिपब्लिकच्या धर्तीवर असून तो लॅटिन भाषेत आहे.
यूटोपिया या ग्रंथात एका काल्पनिक आदर्श समाजाचे वर्णन केले असून ते रॅफेल हिथ्लोर नावाच्या प्रवाशाच्या मुखी घातले आहे. या ग्रंथाच्या पहिल्या विभागात संवाद आहेत आणि सर्व ग्रंथभर उपरोधिक अशी वर्णने आढळतात. प्राचीन नगरराज्ये, पेगन-मत तसेच दंडशास्त्र, शासननियंत्रित शिक्षणव्यवस्था, धार्मिक बहुसत्तावाद, द्वैतवाद, स्त्रियांचे अधिकार, सामाजिक समता व समान न्याय यांसारखे अनेक विषय यात मोरने हाताळलेले आहेत. या ग्रंथातील मोरच्या नेमक्या क्रांतदर्शित्त्वाचे स्वरूप वादग्रस्त असले, तरी एकच स्वतंत्र व विचारसंपन्न वाङ्मयप्रकार म्हणून या ग्रंथाचे महत्त्व वादातीत आहे. एक थोर मानवतावादी म्हणून मोरची मर्मज्ञ बुद्धी आणि विलक्षण कल्पकता यांचे दर्शन त्यातून होते. यूटोपियाचे अनेक यूरोपीय भाषांत भाषांतर झाले.
मोरने इरॅस्मसच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मतांचा प्रसार-प्रचार केला. १ मे १५१७ रोजी परकीय रहिवाशांविरुद्ध लंडनच्या नागरिकांनी उठाव केला. हा उठाव मोर याने अत्यंत समयसूचकतेने शमविला; परिणामतः राजाची त्याच्यावर मर्जी बसली आणि तो शासकीय सेवेत रुजू झाला. शिवाय फ्रान्सबरोबरच्या राजनैतीक संबंधातही त्याने चांगली कामगिरी केली. १५२०–२१ मध्ये त्याने कॅलैस आणि ब्रुझ येथील राजकीय वाटाघाटीत सक्रिय भाग घेतला. त्याची उप-खजिनदाराच्या पदी नियुक्ती झाली (१५२१) आणि त्याला सरदारकी देऊन राजाने त्याचा सन्मानही केला. पुढे त्याची हाऊस ऑफ कॉमन्सचा सभापती म्हणून निवड झाली (१५२३). त्यावेळी संसदेतील संभाषणाला पूर्ण स्वातंत्र्य असावे, म्हणून त्याने विनंती केली, पुढील वर्षी ऑक्सफर्ड (१५२४) आणि केंब्रिज (१५२५) या विद्यापीठांनी त्याला स्टुअर्ड (मालमत्ता अधिकारी) नेमले. त्याला डची ऑफ लँकेस्टर विभागाचा चॅन्सेलर (प्रमुख न्यायाधीश) करण्यात आले (१५२५–२९). त्यामुळे उत्तर इंगलंडमधील फार मोठा भाग त्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आला. त्याची मध्यंतरी काही काळ फ्रान्सच्या दूतावासातही नियुक्ती झाली होती.
आठव्या हेन्रीच्या राणी कॅथरिनशी घटस्फोट घेण्याच्या निर्णयाबबत त्याने अनुकूलता दाखवली नाही. या संदर्भात आठव्या हेन्रीने पुढे केलेल्या बायबलचा आधार त्याला मान्य नव्हता. याच प्रकरणी पुढे बिशप टनस्टॉलने त्याच्याकडून १५२८ मध्ये इंग्रजीमधील तथाकथित सर्व पाखंडी लेखन वाचून घेतले. कार्डिनल वूल्झीला बडतर्फ केल्यानंतर राजाने त्याची लॉर्ड चान्सेलर (१५२९–३२) या सर्वोच्च न्यायाधिशाच्या पदावर नियुक्ती केली. यावेळी रोमन कॅथलिक चर्चबरोबर राजाचा संघर्ष वाढला होता. हेन्रीला गादीला वारस म्हणून मुलगा हवा होता, या कारणासाठी कॅथरिनशी (तिच्यापासून राजाला सर्व मुलीच झाल्या होत्या) घटस्फोट घेऊन ॲन बुलीनबरोबर त्याला विवाह करावयाचा होता. पोपविरुद्धच्या राजाच्या या धोरणाला पाठिंबा देणे मोरला तात्त्विक दृष्ट्या मान्य नव्हते. म्हणून त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. मोरने १५२९–३३ दरम्यान या पाखंडमताची चर्चा व खंडन करणारे सात ग्रंथ लिहिले. त्यांपैकी ए डायलॉग कन्सर्निंग हिअरसीज हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे.
एप्रिल १५३४ मध्ये मोरने राजाच्या सर्वंकष सत्तेला पाठिंबा देण्याची शपथ घेण्यास नकार दिला, या शपथेत आठवा हेन्री पोपपेक्षाही थोर आहे, असा मजकूर होता. त्यामुळे मोरला तुरुंगात डांबण्यात आले आणि त्याच्यावर आरोप ठेवून त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
तुरुंगात असताना त्याने ए डायलॉग ऑफ कम्फर्ट अगेन्स्ट ट्रिब्युलेशन हा इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिला. त्यात काही भाग आत्मचरित्रपर आहे. याशिवाय त्याने लॅटिन आणि इंग्रजीमधून गद्यपद्य स्वरूपाचे विपुल लेखन केले. त्यातून त्याने प्रॉटेस्टंटांच्या अनेक हल्ल्यांपासून कॅथलिक चर्चचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. रोमन कॅथलिक चर्चने १९३५ मध्ये त्याची संतांमध्ये गणना केली. येल विद्यापीठाने त्याचे समग्र वाङ्मय अठरा खंडांत प्रसिद्ध करण्याची योजना आखली असून त्यांपैकी बहुसंख्य ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
संदर्भ : 1. Chambers, R. W. Thomas More, Harcourt, 1935.
2. Guy, John, The Public Career of Sir Thomas More, Yale, 1980.
3. Reyholds Ernest, The field is Won : The Life and Death of St. Thomas More, Bruce, 1968.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
अर्जेंटिनाचा मुत्सद्दी, विधिज्ञ व शांततेच्या नोबेल...
इंग्लंडमधील एक राजकीय मुत्सद्दी व क्रांतिकारक. त्य...
भारतातील एक राजकीय मुत्सद्दी व इतिहासाचे अभ्यासक.
अमेरिकन मुत्सद्दी, उपराष्ट्राध्यक्ष आणि शांतता नोब...