लालमोहन घोष : (१७ डिसेंबर १८४९—१८ ऑक्टोबर १९०९). एक देशभक्त व तडफदार वक्ते. कृष्णनगर (बंगाल) येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण कृष्णनगर येथे घेऊन १८६९ मध्ये पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले व बॅरिस्टर होऊन आले. त्यांनी कलकत्त्यास वकिली सुरू केली. पुढे ते ब्रिटिश इंडियन असोसिएशनचे सभासद झाले आणि पुन्हा १८७९ मध्ये इंग्लंडला गेले. ब्रिटिश जनतेस त्यांनी भारतीयांची सामाजिक व राजकीय गाऱ्हाणी ऐकविली आणि वृत्तपत्रविषयक जाचक कायदे रद्द करावेत, अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर आय्. सी. एस्. या परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढवावी, असेही मत त्यांनी व्यक्त केले. इल्बर्ट बिलाविरुद्ध त्यांनी केलेल्या भाषणांची सर्वत्र वाखाणणी झाली.
१९०३ साली मद्रासला भरलेल्या एकोणिसाव्या काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी अध्यक्ष म्हणून केलेले भाषण फार प्रभावी ठरले. इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत त्यांनी हिंदुस्थानच्या विविध राजकीय हक्कांकरिता पुष्कळ प्रचार केला. ते ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुकीकरिता दोनदा उभे राहिले, पण पराभूत झाले. आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांनी राजकारण सोडले आणि ते साहित्याकडे वळले. 'मेघनादवध' या प्रसिद्ध बंगाली कवितेचा त्यांनी छंदोबद्ध इंग्रजी अनुवाद केला. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले. याशिवाय त्यांचे बरेचसे लेख मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले.
लेखक - त्र्यं. र. देवगिरीकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 12/14/2019
एक थोर देशभक्त व श्रेष्ठ संसदपटू. पहिले लोकनियुक्त...
एक गांधीवादी देशभक्त व बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक...
एक प्रसिद्ध देशभक्त व कायदेपंडित. तोरेकोन (बरद्वान...
भार-तीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते, काँग्रेसचे अ...