অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जमनालाल बजाज

जमनालाल बजाज

जमनालाल बजाज : (४ नोव्हेंबर १८८९-११ फेब्रुवारी १९४२). एक गांधीवादी देशभक्त व बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक. जन्म पूर्वीच्या जयपूर संस्थानातील कासीकाबास या खेड्यात एक गरीब कुटुंबात झाला. वडील कनिराम व आई बिरदीबाई. वयाच्या चौथ्या वर्षी जमनालाल वर्ध्याचे बच्छराज बजाज या लक्षाधीशाच्या घरात दत्तक गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वर्धा येथे झाले. नंतर त्यांनी इंग्रजी, हिंदी, गुजराती या भाषा आत्मसात केल्या; पण कोणताही पदवी त्यांनी घेतली नाही. विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह इंदूर संस्थानातील जावरा येथील शेठ गिरधारीलाल जाजोदिया यांच्या जानकीदेवी या मुलीशी झाला (१९०२). कमलनयन व रामकृष्ण हे त्यांचे दोन मुलगे. ते उद्योगपती म्हणून ख्यातनाम आहेत. त्यांपैकी कमलनयन हे लोकसभेचे काही वर्षे सभासद होते.ते १९७२ मध्ये निवर्तले.

तरूणपणीच जमनालाल यांना लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, रवींद्रनाथ टागोर इ. थोर व्यक्तींचा सहवास लाभला. लोकमान्यांचा केसरी ते लहानपणापासून वाचीत. १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परत आल्यावर बजाज त्यांना भेटले. ते महात्माजींच्या विचारसरणीकडे आकृष्ट झाले. आणि आपणास ‘पाचवा मुलगा’ म्हणून स्वीकारावे, अशी त्यांनी गांधीजींना विनंती केली. (१९२०). बच्छराज यांच्याकडून लाभलेल्या संपत्तीचा त्यांनी अपरिग्रह वृत्तीने केवळ एक विश्वस्त म्हणून सांभाळ केला. १९०८ मध्ये जमनालाल मानसेवी दंडाधिकारी झाले. पुढे त्यांना ‘रायबहादूर’ हा किताब मिळाला (१९१८). जमनालाल नागपूर येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष झाले (१९२०). काँग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. १९२० मध्ये त्यांनी असहकार चळवळीत भाग घेऊन आचार्य विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या ठरावानुसार रायबहादूर या उपाधीचा त्याग त्याच साली केला. १९२३ मध्ये त्यांनी नागपूर येथे राष्ट्रध्वज सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्याबद्दल त्यांना १८ महिन्यांची शिक्षा झाली. त्याच वर्षी गांधीजीचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या अनुपस्थितीत ‘गांधी सेवकसंघा’ची त्यांनी स्थापना केली. १९२४ मध्ये ते नागपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व १९२५ मध्ये चरखा संघाचे खजिनदार होते. त्यांनी समाजसेवेसाठी अनेक संस्था स्थापन केल्या आणि अस्पृश्यतानिवारण, गोवर्धन, शिक्षणसंस्था यांसाठी भरीव आर्थिक मदत केली. अनेक संस्थांचे ते अध्यक्ष  व सचिव होते. ‘सस्ता साहित्य मंडळ’ याद्वारे त्यांनी राष्ट्रीय हिंदी साहित्य प्रकाशित केले. अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष  होते (१९३८). काँग्रेसच्या अस्पृश्यतानिवारण मोहिमेत त्यांनी सचिव या नात्याने पुढाकार घेऊन अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रचार केला. आणि वर्ध्याचे स्वतःच्या मालकीचे लक्ष्मीनारायण मंदिर हरिजनांना खुले केले (१९२८). विलेपार्ले (मुंबई) येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते(१९३०). या प्रसंगी त्यांच्या पत्नी जानकीदेवी व मुलगा कमलनयन यांनाही शिक्षा झाल्या.जमनालाल यांनी वर्ध्याजवळील ‘सेगाव’ हे खेडे व तेथील जमीन गांधीना दिली. तेथे गांधीनी ‘सेवाग्राम आश्रम’ स्थापन केला(१९३६). जयपूरच्या संस्थानी प्रजेस राजकीय हक्क मिळावेत, म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. त्यात त्यांना पुन्हा १९३९ मध्ये शिक्षा झाली. दुसऱ्या महायुध्दाकाळात युध्दविरोधी प्रचारांमुळे त्यांना अटक झाली (१९४१). वर्धा येथे ‘गोसेजा संघा’ची स्थापना त्यांनी केली होती (९१४१). त्यांना रक्तदाबाचा विकार होता; त्यातच रक्तस्त्राव होऊन ते निधन पावले.

जमनालाल यांनी स्त्रीशिक्षणास अग्रक्रम देऊन स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता वर्धा येथे त्यांनी मारवाडी शिक्षण मंडळाची स्थापना केली. तसेच गांधींच्या मूलोद्योग शिक्षणावर भर दिला आणि राष्ट्रीयतेची भावना जोपासली व अस्पृश्यतानिवारणाचे महान कार्य अंगीकारले. त्यांनी खिलाफत चळवळीतही भाग घेतला होता. अखेरच्या दिवसांत सेवाग्राम आणि गोसेवासंघ या कार्यास त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. गांधीवादी मार्गाने स्वराज्य मिळेल, यावर त्यांची दृढ श्रध्दा होती. म्हणूनच त्यांनी खादी, ग्रामोद्योग व गोसेवा यांचा पुरस्कार केला.

आधुनिक भारताच्या औद्योगिक क्षेत्रातही जमनालाल बजाज यांनी स्पृहणीय कामगिरी केली. त्यांनी १९२६ साली बजाज उद्योगसमूहाचा सुसंघटित पाया घातला आणि त्या उद्योगसमूहातर्फे पहिला साखर कारखाना सुरू केला(१९३१); तथापि एक विश्वस्त म्हणूनच ते बजाज उद्योगसमूहाचे काम पाहत असत.

त्यांच्या मृत्यूंनंतर त्यांच्या स्मरणार्थ अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यांचे पुत्र रामकृष्ण यांनी जमनालाल प्रतिष्ठान स्थापन केले. त्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती असून रामकृष्ण बजाज हे अध्यक्ष आहे. भारताताली ग्रामीण भागात विशेष सेवा करणाऱ्या  मान्यवर व्यक्ती व संस्था यांना त्याद्वारे पुरस्कार देण्यात येतात.

 

संदर्भ : Parvate, T.V. Jamnalal Bajaj, A Brief Study of His Life and Character, Ahmedabad ,1962.

लेखक - रूक्साना शेख

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate