राशबिहारी घोष : एक प्रसिद्ध देशभक्त व कायदेपंडित. तोरेकोन (बरद्वान जिल्हा) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. एम्. ए. झाल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. त्यांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिली.
कलकत्ता येथे त्यांनी वकिलीस सुरुवात केली (१८६७). थोड्याच अवधीत ते एक नामांकित वकील म्हणून प्रसिद्धीस आले. वकिलीत त्यांनी अमाप पैसा मिळविला. कायदेविषयक अभ्यासामुळे विद्यापीठाच्या कायद्याच्या परीक्षांचे परीक्षक (१८७७), विद्यापीठाच्या विधिविषयातील अधिछात्र (१८७९), सिंडिकेटचे सभासद (१८८७) वगैरे पदेही त्यांना देण्यात आली. पुढे ते कलकत्ता विद्यापीठाच्या विधिविद्याशाखेचे अध्यक्ष झाले. याशिवाय त्यांनी टागोर विधी व्याख्यानमालेत गहाण या विषयावर व्याख्याने दिली. १९०५ पर्यंत त्यांचा काँग्रेस वा तत्सम राजकारण यांच्याशी काहीच संबंध आला नव्हता. मात्र लॉर्ड कर्झनच्या आक्षेपांचा त्यांनी विद्यापीठात निषेध केला. पुढे ते कलकत्ता काँग्रेसचे स्वागताध्यक्ष (१९०६) आणि सुरत व मद्रास काँग्रेसचे (१९०७ व १९०८) अध्यक्ष झाले. या वेळी जहाज व मवाळ या दोन काँग्रेस गटांत फार मोठा कलह माजला होता. इंग्लंडला गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाचेही ते सदस्य होते (१९१७). ॲनी बेझंट यांना विरोध करण्यासाठी भरलेल्या काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्या जोड अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले. इंडिया मासिकाच्या व्यवस्थापक मंडळाचे ते दीर्घकाल अध्यक्ष होते.
राशबिहारींची सामाजिक व राजकीय मते नामदार गो. कृ. गोखले यांच्याशी बरीचशी मिळतीजुळती होती. आपल्या मूळ गावी त्यांनी एक मोठे रुग्णालय काढले. तथापि बालविवाह त्यांना मान्य होता. स्त्रीशिक्षणाचा तसेच हिंदु-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार त्यांनी केला. विविध संस्थांसाठी त्यांनी लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या. त्यांत कलकत्ता विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, जादवपूर तांत्रिक महाविद्यालय, तोरेकोन येथील विद्यालय वगैरेंचा समावेश होता. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, असे त्यांचे मत होते. त्यांची दोन लग्ने झाली पण त्यांना अपत्य नव्हते.
लेखक - इंदुमति केळकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/25/2020
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक राजकीय पुढारी, कायद...
एक थोर देशभक्त व श्रेष्ठ संसदपटू. पहिले लोकनियुक्त...
एक गांधीवादी देशभक्त व बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक...
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध कायदेपंड...