অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भावनगर

भावनगर

म. गांधी स्मृती-मनोरा, भावनगर

भावनगर

गुजरात राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व पूर्वीच्या भावनगर संस्थानाची राजधानी. लोकसंख्या ३,०६,६७३ (१९८१). हे अहमदाबादच्या नैर्ऋत्येस सु. १४५ किमी. खंबायतच्या आखातावर वसलेले आहे. रस्ते, माध्यम व अरूदमापी लोहमार्ग आणि हवाईमार्ग यांचे हे केंद्र असून राज्यातील एक प्रमुख बंदर म्हणून हे प्रसिद्ध आहे.

सागरी व्यापारास उत्तेजन मिळू शकेल व बडोदेकरांच्या हल्ल्यापासून संरक्षण होईल या उद्देशांनी भाऊसिंगजी गोहेल याने १७२३ मध्ये पूर्वीच्या वाडवा या गावाच्या जागी हे शहर वसविले. व्यापाराच्या द्दष्टीने याची उत्तरोत्तर याची प्रगती होत गेली, तसेच भाऊसिंगजी नंतरच्या राज्यकर्त्यांनीही शहराच्या प्रगतीच्या द्दष्टीने विशेष प्रयत्‍न केले. येथून मीठ, शेंगदाने इत्यादींची निर्यात होते व कापूस, अन्नधान्ये, कोळसा इत्यादींची आयात केली जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात या बंदराचा विकास करण्यात येऊन व्यापारास चालना देण्यात आला. सुती कापड, रेयॉन, तेल, रबर, खते, लोखंड व पोलाद इत्यांदीच्या निर्मितीउद्योगांचा येथे विकास झालेला असल्याने, गुजरातमधील ते एक औद्योगिक केंद्र बनले आहे. तेथील जहाजबांधणी उद्योग विशेष प्रगत झालेला आहे. या उद्योगातील अँल्‌कॉक अँशडाउन ही अग्रेसर कंपनी भारत सरकारने १९७३ मध्ये आपल्या ताब्यात घेतली. शहरातील गुजरात स्टेट मशीन टूल्स कंपनी उल्लेखनीय आहे.

हे एक शैक्षणिक केंद्र समजले जाते. भावनगर विद्यापीठ तसेच सौराष्ट्रतील सर्वांत जुने सामळदास महाविद्यालय (१८८५), शेठ जे.पी. आयुर्वेद महाविद्यालय, सर पी. पी. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इ. संस्था उल्लेखनीय आहेत. येथील ' सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट ' विशेष प्रसिद्ध आहे.

येथील दरबारगड, सर कृष्णकुमारसिंहजी नगरभवन (१९३२); तख्तेश्वर, जशोनाथ इ. मंदिरे; गांधीस्मृती व बार्टन ग्रंथालय व संग्रहालय, गौरीशंकर तळे; वल्लभभाई पटेल व कैलास विटिकेसारखी उद्याने, महाराणी मजिराजबा हिच्या स्मरणार्थ बांधलेली संगमरवरी छत्री व गंगाजलिया तलाव ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे होत.


गाडे, ना. स.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate