आइल ऑफ मॅन : ब्रिटिश बेटांपैकी आयरिश समुद्रातील एक बेट, क्षेत्रफल ५७२ चौ. किमी. लोकसंख्या ६२,००० (१९८१). डग्लस हे राजधानीचे ठिकाण तसेच प्रमुख शहर व बंदर, इंग्लंडच्या वायव्य भागात इंग्लंड व उत्तर आयर्लंड यांच्या भूमीपासून ४८ किमी. अंतरावर, तर स्कॉटलंडच्या दक्षिणेस २५ किमी. वर हे बेट आहे. बेट खडकाळ असून किनारा दंतुर आहे. किनाऱ्यावर वाळूचे दांडे, पुळणी आढळतात. बेटाचा मध्यवर्ती भाग पर्वतीय असून स्नेफेल (६२१ मी.) हे त्यातील सर्वोच्च शिखर आहे. उत्तरेकडे व दक्षिणेकडे सर्वसाधारण उंची कमी झालेली असून तेथे कृषिक्षेत्र आढळते. सल्बी, दू-ग्लास, सँतॉन, सिल्व्हर बर्न, नबे-ऱ्हेनास या येथील प्रमुख नद्या होत. सौम्य व आल्हाददायक हवामान आणि सृष्टिसौंदर्य यांमुळे उत्तम पर्यटन केंद्र म्हणूनही या बेटाची ख्याती आहे. वार्षिक सरासरी तापमान ८·१° से. व वार्षिक सरासरी पर्जन्य ११४·६ सेंमी. मॅन बेटाच्या नैर्ऋत्येस काफ ऑफ मॅन हे एक छोटेसे खडकाळ द्वीपक (क्षेत्रफळ २४० हेक्टर) असून तेथे पक्ष्यांचे अभयारण्य आहे. त्याचे व्यवस्थापन ‘मॅक्स नॅशनल ट्रस्ट’ कडून पाहिले जाते.
‘मोना किंवा मोनापिआ’ ही याची प्राचीन नावे. सेंट पॅट्रिक (इ. स. पाचवे शतक) याचे अनुयायी असलेल्या अनेक आयरिश मिशनऱ्यांचे हे प्रमुख केंद्र होते. केल्ट हे येथील मूळ रहिवासी. नवव्या शतकात नॉर्स (व्हायकिंग) लोकांनी हा भाग आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून १२६६ मध्ये तो स्कॉटलंडला विकेपर्यंत नॉर्वेकडे या बेटाचा ताबा होता. तिसऱ्या एडवर्डनंतर (कार. १३२७–७७) येथील सर्व राजे इंग्रज होते. येथील राजाकडून लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती केली जाते. बेटावर ‘कौन्सिल’ (वरिष्ठ गृह) व ‘हाउस ऑफ कीज’ (कनिष्ठ गृह) ‘कोर्ट ऑफ टिनवाल्ड’ –अशी द्विसदनी शासनव्यवस्था आहे.
पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे, हा या बेटावरील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. प्रतिवर्षी सु. पाच लक्ष पर्यटक या बेटास भेट देतात. शेती हा दुसरा प्रमुख व्यवसाय असून गहू, ओट, सातू, सलगम, बटाटे ही प्रमुख कृषिउत्पादने घेतली जातात. यांशिवाय मेंढ्यांची पैदास, दुग्धव्यवसाय, लोकरी वस्तूंची निर्मिती व मासेमारी हे व्यवसायही चालतात. राजधानी डग्लसशिवाय रॅम्से, पील, कॅसलटाउन ही येथील इतर महत्त्वाची नगरे होत. रोनाल्डस्वे येथे विमानतळ आहे. डग्लस येथे ‘मॅक्स म्यूझीयम’ हे निसर्गेतिहासविषयक संग्रहालय असून सागरी जैव संशोधन केंद्र पोर्ट एरिन येथे आहे. क्रेग्निश येथील ‘मँक्स ओपन एअर म्यूझीयम’ मध्ये बेटावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा जुन्या घरांच्या रचना आढळतात. पील व कॅसलटाउन येथे तेराव्या शतकातील किल्ले आहेत. यांशिवाय बेटावर शिलास्मारके, क्रूस, जुने किल्ले, राजवाडे अशा अनेक ऐतिहासिक वास्तू पाहावयास मिळतात. येथील मोटारसायकलींच्या शर्यती (टूरिस्ट ट्रॉफी) हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते.
लेखक - वसंत चौधरी
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/15/2020
अॅडिलेड : ऑस्ट्रेलियातील चौथ्या क्रमांकाचे शहर व ...
तेल आवीव्ह–जाफा : इझ्राएलची जुनी राजधानी व प्रमुख ...
अॅस्ट्राखान : रशियातील अॅस्ट्राखान प्रांताची राज...
पाँसे : वेस्ट इंडिजमधील प्वेर्त रीकोचे प्रमुख बंदर...