অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पा ले र्मो

पा ले र्मो

पा ले र्मो

प्राचीन पॅनॉर्मस, अरबी खालेसा. इटलीमधील सिसिली या स्वायत्त प्रदेशाचे व पालेर्मो प्रांताचे राजधानीचे ठिकाण व प्रमुख बंदर. लोकसंख्या ६,७३,१६३  (१९७६). हे सिसिली बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर पालेर्मो उपसागराच्या शिरोगामी आणि काँका दऑरो या सुपीक व सुंदर मैदानी प्रदेशाच्या टोकाला वसले असून वार्षिक पर्जन्यमान सु. ८४ सेंमी. आहे.

ख्रिस्तपूर्व आठव्या-सहाव्या शतकांत फिनिशियनांनी हे स्थापिले. कार्थेजियन, रोमन, व्हँडल, बायझेटिन, अरब, नॉर्मन, होअन्श्टाउफन, अँजव्हिन, सिसिलियन इत्यादींच्या सत्तांतरांनंतर १८६० मध्ये गॅरिबॉल्डीने जिंकले व पुढच्याच वर्षी ते इटलीत समाविष्ट झाले.

दुसरा रॉजर व दुसरा फ्रेड्रिक यांचया कारकीर्दी म्हणजे पालेर्मोच्या कलात्मक, सांस्कृतिक व व्यापारविषयक वैभवाचे सुवर्णयुगच मानतात. जहाजबांधणी, पोलाद, काच, लाकडी सामान, कापड, सिमेंट, कातडी वस्तुनिर्मिती इ. उद्योगधंदे येथे चालतात. या बंदरातून प्रामुख्याने लिंबू जातीची फळे, मद्ये, लाकडी सामान, काच, कापड यांची निर्यात व धान्य, मांस, कोळसा, कागद, यंत्रे, धातू, रसायन उत्पादने, खते यांची आयात केली जाते.

हे रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्ग आणि जलमार्ग यांनी महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडलेले आहे. अकराव्या-बाराव्या शतकांतील नॉर्मन – बायझंटिन चर्च, बाराव्या-पंधराव्या शतकांतील कॅथीड्रल आणि त्यांतील दुसरा रॉजर व दुसरा फ्रेड्रिक यांच्या कबरी, अनेक राजवाडे, रोमन व ग्रीक शिल्पकला, पुरातत्त्वविद्या व मानवजातिविज्ञान यांविषयीची वस्तुसंग्रहालये कलावीथी, भव्य रंगमंच, उद्याने, आकदमी, पालेर्मो विद्यापीठ (१७८१), ग्रंथालय, खगोलीय वेधशाळा, ऐतिहासिक व कौशल्यपूर्ण स्मारके इ. प्रेक्षणीय ठिकाणांमुळे एक पर्यटनकेंद्र म्हणूनही पालेर्मोस महत्त्व लाभले आहे.

 

चौधरी, वसंत.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate