राजा सुरजमल याने अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात हे शहर वसविले. येथील हस्तकला प्रसिद्ध असून, चंदन व हस्तिदंत यांपासून बनविलेल्या चवथ्या व पंखे, हातमागाचे कापड तसेच मातीच्या वस्तू उत्कृष्ट समजल्या जातात. आसमंतातील शेतमालाची बाजारपेठ म्हणून यास महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे तेल गिरण्या, लोहमार्ग साहित्यनिर्मिती, मोटारनिर्मिती इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. येथे अनेक सुंदर मंदिरे व वास्तू असून लक्ष्मी मंदीर व गंगा मंदिर विशेष उल्लेखनीय आहेत.
भरतपूरचा किल्ला राजस्थानमधील एक प्रमुख किल्ला होय. मातीची भिंत, खंदक यांमुळे किल्ल्यास मजबुती आलेली आहे. किल्ल्यास आठ बुरूज असून यास उत्तरेकडे 'अष्टघाती' व दक्षिणेस 'लोहिया' हे दोन दरवाजे आहेत. किल्ल्यातील महल खास, कोठी खास व किशोरी महल या शाही वास्तू प्रसिद्ध आहेत. दिल्लीला केलेल्या यशस्वी आक्रमणाच्या स्मरणार्थ व इंग्रजांच्या केलेल्या पराभवाच्या स्मरणार्थ व 'जवाहरसिंहने बांधलेले अनुक्रमे 'जवाहर बुरूज' (१७६५) व 'फतेह बुरूज' (१८०५) येथे आहेत. जवाहर बुरूजाच्या ठिकाणी भरतपूरच्या राजांना राज्याभिषेक केला जाई. येथील एका लोखंडी खांबावर येथील आठ राजांची वंशावळ कोरलेली आढळते, तसेच येथील संग्रहालयात प्रादेशिक संस्कृती व कला यांच्या निदर्शक अशा अनेक गोष्टी पाहावयास मिळतात.
शहराच्या आग्नेयीकडे ५ किमी. वरील केवलदेव घाना येथील पक्ष्यांचे अभयारण्य प्रसिद्ध आहे. येथे दलदलीचा भाग असून तेथे बाभूळ वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. या दलदलीचे पावसाळयात विस्तीर्ण अशा तळयात रूपांतर होत असून त्यामुळे सु. ५२ चौ. किमी. क्षेत्र व्यापले जाते. येथे बगळा, करढोक, आयबिस, क्रौंच, सारस इ. विविध पक्षी आढळतात. अफगाणिस्तान, चीन, सायबीरिया, तिबेट इ. देश-प्रदेशांतून पक्षी या ठिकाणी येतात. जुलै ते ऑक्टोबर या पावसाळी मोसमात येथील निसर्गसौंदर्य अप्रतिम असते.
दातार, नीला
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
बांसवाडा संस्थान : ब्रिटिश भारतातील राजस्थान राज्य...
चित्तौड़गढ़ किल्ला हा भारतातील प्रसिद्ध किल्ल्यांप...
जैसलमेर चा किल्ला हा जगातील काही सर्वात मोठ्या किल...
राजांची भूमि रा्जस्थान, विरांची भूमि रा्जस्थान, शि...