आफ्रिकन लोक निसर्ग व क्षुद्र वस्तू यांना देवता मानून त्यांची पूजा करतात. प्रत्येक चराचर वस्तूत एक चित्-शक्ती असते, मृत्यूनंतर आत्मा वनस्पतीत वा प्राण्यात जातो, सगळे जग जादूगारांच्या आशेत असते इ. प्रकारच्या त्यांच्या श्रद्धा असून त्यांतूनच त्यांच्या पुराणकथा निर्माण झाल्या आहेत. सृष्टिनिर्माता असा एक सर्वोच्च देव बहुतेक सर्व पुराणकथांतून आढळतो. आफ्रिकेत भिन्नभिन्न अशा असंख्य जमाती असून त्याच्या पुराणकथांतून विविधता आढळते.आग्नेय आफ्रिकेच्या उत्तर भागात मसाई लोक राहतात. त्यांच्या मते नॅजी हा विश्वनिर्माता सर्वश्रेष्ठ देव होय. त्यांच्या कथेनुसार प्रारंभी पृथ्वीवर किंटू नावाचा एकच पुरुष होता. स्वर्गाची कन्या त्याच्या प्रेमात पडली. मग त्याला बोलावून घेण्यात आले आणि त्यांचा विवाह झाला. तो परत निघाला, तेव्हा त्याला परत येऊ नकोस, म्हणून सांगितले होते; परंतु धान्य विसरले म्हणून तो परत आला. त्यामुळे त्याची सर्व मुले मारली गेली व मृत्यूस प्रारंभ झाला. काँगोतील उटोपोस हे लोक म्हणतात, की लिबांझाने म्हणजेच देवाने चंद्राला व पृथ्वीवरील लोकांना बोलावले असताना चंद्र वेळेवर गेला म्हणून अमर झाला आणि मानव उशिरा गेले म्हणून मर्त्य बनले. गॅल्लास लोकांच्या मते देवाने एका पक्ष्याजवळ मानवांना अमरत्वाचा संदेश दिला होता. स्वतःची त्वचा काढली, की तुम्ही तरुण व्हाल असे त्यांना सांगितले होते. वाटेत एक साप मांस खात होता.
पक्ष्याने त्याच्याकडून मांस घेतले आणि सापाला अमरत्वाचा संदेश दिला. देवाने पक्ष्याला शिक्षा दिली म्हणून तो अजूनही झाडावर बसून शोक करीत असतो. इतर जमातींतही अमरत्वाबाबत व मर्त्यत्वाबाबत विविध कथा आहेत.माकोउआस आणि बानाइस हे लोक मुलुकू या देवाला सर्वश्रेष्ठ स्थान देतात. एका मुलुकूने जमिनीत दोन छिद्रे पाडली. एकातून पुरुष व दुसऱ्यातून स्त्री आली; परंतु त्या दोघांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. माकडाच्या एका जोडप्याने मात्र देवाच्या आज्ञा पाळल्या. म्हणून देवाने माकडाच्या शेपट्या तोडून त्या माणसांना लावल्या व तेव्हापासून माकडांचे मानव आणि मानवांची माकडे बनली. मोझांबिकमधील निग्रो लोक टिलो हा आकाशदेव मानतात. पाऊस व मेघनाद यांच्याही देवता त्यांनी मानल्या आहेत. ते सूर्य व चंद्र यांचीही पूजा करतात. त्यांच्या एका कथेनुसार प्रारंभी निस्तेज चंद्र या महिलेने सूर्याचे लक्ष नाही हे पाहून त्याचे तेजःस्वरूप असे काही पंख चोरले. सूर्याच्या हे ध्यानात येताच त्याने तिच्या अंगावर चिखल उडवला. तेच तिच्या अंगावरचे डाग होत. तीही संधी साधून चिखल उडवते, तेव्हा सूर्यग्रहण होते.
बोमीताबा या लोकांच्या कथेनुसार प्रारंभी जगात दोन सूर्य असल्यामुळे लोकांना खूप त्रास होत असे. एका सूर्याने आपण स्नान करू या, असे दुसऱ्या सूर्याला म्हटले. त्याने स्वतः नदीत उडी मारण्याचे नुसते नाटक केले; परंतु प्रत्यक्षात मात्र उडी मारली नाही. दुसऱ्या सूर्याने मात्र खरोखरच उडी मारली म्हणून त्याचे तेज कमी होऊन तो चंद्र बनला.शिल्लुक लोकांच्या मते जुओक या देवाने काळ्या मातीतून निग्रो, पांढऱ्या मातीतून गोरे लोक आणि नाईलच्या मातीतून तांबडे लोक तयार केले. काँगोतील एका कथेनुसार गोरे व काळे लोक आणि गोरिला ही परमेश्वराचीच अपत्ये होत. परंतु गोरिला आणि निग्रो यांनी देवाची आज्ञा मोडल्यामुळे देवाने त्यांना सोडून दिले आणि तो आपली गोरी मुले व संपत्ती घेऊन मध्य आफ्रिकेतून निघून गेला.
हॉटेंटॉट लोकांमध्ये हेईत्सी-एईबीब हा अतिमानवी पुरुष असून त्याचा जन्म गायीपासून वा विशिष्ट वनस्पती खाल्लेल्या कुमारिकेपासून झाला, असे मानले जाते. त्याच्या शापामुळे वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळे गुणधर्म प्राप्त झाले. बुशमन लोक कॅन या देवाला विश्वनिर्माता मानतात. त्याची शक्ती त्याच्या एका दातात असते आणि तो आपल्या पादत्राणांना कुत्रे बनवून त्यांना शत्रूवर पाठवतो, असे मानले जाई. कोटी ही त्याची पत्नी होती. निर्मितीविषयीच्या काही पुराणकथा सर्वाना ठाऊक नसत, त्या फक्त दीक्षा घेतलेल्या लोकानांच ठाऊक असत. या लोकांच्या कथा त्यांच्या नृत्यांशी निगडित आहेत. कित्येकदा पिशाचांना दूर पळविण्यासाठी नृत्ये केली जात. नद्या, पर्वत, गुहा, पशू, वृक्ष, मृतात्मे इत्यादींचीही पूजा आफ्रिकेत चाले. सर्व आफ्रिकेत मृतात्म्यांविषयी विविध कल्पना होत्या. मादागास्करमध्ये मृतांचे आत्मे हे देवता व मानव यांतील मध्यस्थ मानले जात.
संदर्भ : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.
2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.
3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.
4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.
5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.
6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.
7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922
8. Gray, L. H. Ed. The Mythology of all Races, 13 Vols., Boston 1925-36.
9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.
10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.
11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.
12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.
13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.
14. Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.
15. Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.
16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.
17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.
18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth ,London 1963.
19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.
20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.
21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends, 4. Vols., London, 1976-78.
लेखक: आ. इ. साळुंखे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
ओशिअॅनिक पुराणकथा विषयक माहिती.
ईजिप्ती पुराणकथा विषयक माहिती.
अमेरिकन इंडियन जमातींच्या पुराणकथा विषयक माहिती.
केल्टिक पुराणकथा विषयक माहिती.