অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मदुराई - कामराज विद्यापीठ

मदुराई - कामराज विद्यापीठ

तमिळनाडू राज्यातील एक विद्यापीठ. मदुराई या प्राचीन तमिळ विद्याकेंद्र असलेल्या इतिहासप्रसिद्ध शहरी ६ फेब्रुवारी १९६६ रोजी स्थापना. पूर्वी येथे मद्रास विद्यापीठाचे विस्तार केंद्र होते. मदुराईच्या पश्चिमेस १२ किमी.वरील मदुराई-थेनी रस्त्यावरील रम्य परिसरात हे विद्यापीठ वसले आहे. तमिळनाडूमधील थोर देशभक्त व लोकनेते कामराज यांच्याविषयीच्या आदराचे प्रतीक म्हणून ‘मदुराई-कामराज विद्यापीठ’  असे त्याचे नामांतर करण्यात आले (१९७८).

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मदुराई, रामनाथपुर, तिरूनेलवेली व कन्याकुमारी हे चार जिल्हे येतात. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून  त्यात ३७ विद्याविभाग आहेत. ऊर्जा, पर्या-वरण व नैसर्गिक साधनसामग्री, व्यवसाय प्रशासन आणि तमिळविद्या  हे विद्याविभाग १९८०-८१ सालापासून सुरू करण्यात आले. शालान्त परीक्षेकरिता मार्गदर्शन करणारी तीन विद्यालयेदेखील विद्या-पीठाच्या कक्षेत आहेत. संस्कृत, मलयाळम, कन्नड, तेलुगू, फ्रेंच, रशियन इ. भाषा व म. गांधीविचार यांचे विद्याविभाग आहेत.

तिरूनेलवेली येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विस्तार केंद्र १९८०-८१ पासून सुरू करण्यात आले. शिक्षणाचे माध्यम तमिळ व इंग्रजी आहे. बुद्धिवाद, मार्क्सवाद, भाषांतर इत्यादींचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम  तसेच लोकसंख्या, नेहरूविचार, प्रौढशिक्षण, वृत्तपत्रविद्या, नाट्यशास्त्र इत्यादींचे पदविका अभ्यासक्रमही विद्यापीठात उपलब्ध आहेत. पत्र-द्वारा शिक्षण व निरंतर शिक्षण यांचीही सोय विद्यापीठाने केलेली आहे. विद्यापीठक्षेत्रात १०४ महाविद्यालये असून त्यांमधून १,१४,२९८ विद्यार्थी शिक्षण घेत होते (१९८१).

तमिळ भाषासाहित्याच्या संशोधन विकासासाठी विद्यापीठाने तमिळ अकादमी (१९७७) स्थापन केलेली आहे. मदुराई येथे जानेवारी १९८१ मध्ये जागतिक तमिळ परिषद भरली होती. त्या परिषदेतील ठरावामुळेच ‘जागतिक तमिळ सेवा विभागा’ ची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाच्या प्रकाशन विभागाने आजवर तमिळ व इंग्रजी भाषांत ४४ पुस्तके प्रकाशित केली आहेत.

राष्ट्रीय सेवा योजना, विज्ञान शिक्षण केंद्र, युवक कल्याण विभाग (स्था. १९७३), सायंकालीन महाविद्यालय (स्था. १९६९) आणि फिरते आरोग्य केंद्र या योजनाही विद्यापीठाने हाती घेतलेल्या आहेत. विद्यापीठाच्या डॉ. टी. पी. मीनाक्षीसुंदरन् ग्रंथालयात १,६२,१५०   ग्रंथ व ५०० नियतकालिके असून सूक्ष्मपटाची सोयही आहे. (१९८१). विद्यापीठात या वर्षी एकूण १५५ अध्यापक असून विद्यापीठाचे उत्पन्न ४.९७ कोटी रूपये व खर्च १.८७ कोटी रूपये होता.

लेखक: म. व्यं. मिसार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate