केरळ राज्यातील एक विद्यापीठ. कालिकत ह्या ठिकाणी १९६८ मध्ये स्थापन झाले. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून त्याच्या कक्षेत मल्लापुरम्, कननोर, कालिकत, पालघाट व त्रिचूर या महसूल जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालये समाविष्ट करण्यात आली आहेत. कालिकतमधील महाविद्यालये विद्यापीठाची घटक महाविद्यालये म्हणून राहतील, असे ठरले आहे. विद्यापीठात इतिहास, हिंदी, रसायनशास्त्र, पशुविज्ञान, वनस्पतिविज्ञान वगैरे भिन्न विषयांच्या एकूण १० विद्याशाखा असून विद्यापीठास एकूण ६० महाविद्यालये संलग्न केली आहेत. ह्याशिवाय विद्यापीठात इतिहास, हिंदी, रसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान ह्या विषयांत संशोधन केले जाते.
तसेच संलग्न महाविद्यालयांतील फारूक महाविद्यालय आणि सेंट जोसेफ महाविद्यालय येथेही संशोधनाची केंद्रे आहेत. ह्यांव्यतिरिक्त विद्यापीठाने कोईमतूर येथील ‘साउथ इंडिया टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशन’ व पट्टम्बी येथील ‘राइस रिसर्च स्टेशन’ ह्या संस्थांस विद्यापीठीय संशोधनसंस्था म्हणून मान्यता दिली आहे. प्रौढशिक्षण व विस्तार सेवा या विद्याशाखांद्वारे विद्यापीठ प्रौढशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करते; तसेच शिक्षक व मागास वर्ग यांसाठी सुधारकेंद्रे चालविते. ही विद्यापीठाची खास वैशिष्ट्ये होत. विद्यापीठाची प्रशासनव्यवस्था विद्यापीठीय संविधानानुसार कुलगुरू व कुलसचिव पाहतात. कुलगुरुपद सवेतन आहे. विद्यापीठाचे उत्पन्न १९७१–७२ मध्ये ११४·०९ लाख रु.व खर्च ११२·४९ लाख रु. एवढा होता. विद्यापीठाचे माध्यम इंग्रजी असून त्यात १९७१–७२ मध्ये सु. ५३,००० विद्यार्थी शिकत होते.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/23/2019
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...