राजस्थानमधील एक विद्यापीठ. राजस्थान कृषिविद्यापीठ ह्या नावाने उदयपूर येथे १९६२ मध्ये ते प्रथम स्थापन झाले. त्याचे १९६३ मध्ये उदयपूर विद्यापीठात रूपांतर झाले. ते मुख्यतः कृषिप्रधान असले, तरी आता इतर विषयांच्या शाखोपशाखा त्यात निघाल्या आहेत. ह्याचे स्वरूप अध्यापनात्मक निवासी विद्यापीठ असे असून त्याच्या कक्षेत सात घटक व सात संलग्न महाविद्यालये अंतर्भूत होतात. विद्यापीठाचे नियामक मंडळ व त्याचा अध्यक्ष सर्व प्रशासनव्यवस्था पाहतात. अध्यक्ष हाच कुलगुरू असतो. कृषी-अभियांत्रिकी, गृहविज्ञान, कृषी व पशुवैद्यक ह्या विषयांव्यतिरिक्त मानव्यविद्या, वाणिज्य, विधी व इतर शास्त्रे ह्या विषयांचे शिक्षण येथील महाविद्यालयांतून दिले जाते.
शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व हिंदी आहे. नैसर्गिक शास्त्रे व मानव्यविद्या ह्या विषयांकरिता पदव्युत्तर वर्गांसाठी वर्षार्ध परीक्षापद्धती १९६९-७० मध्ये येथे सुरू करण्यात आली. ह्या विद्यापीठाचा एक विशेष म्हणजे त्यातील कृषिशिक्षणाबाबत अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ओहायओ राज्य विद्यापीठाचे अनुकरण करण्यात आले असून अमेरिकेतील ‘लँड ग्रँट’ महाविद्यालयाच्या धर्तीवर कृषिविषयांत अंतर्गत गुणवत्तामापनपद्धतीचा अवलंब केला जातो. १९७१-७२ सालाचे विद्यापीठाचे उत्पन्न सु. २३५·६१ लाख होते. विद्यापीठात १९७१-७२ मध्ये एकूण ७,२४९ विद्यार्थी शिकत होते.
लेखक: मु. मा. घाणेकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2023
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...