जर्मनी येथील जगप्रसिद्ध शिक्षणसंस्था. मुख्यालय बर्लिन येथे. विल्हेल्म हंबोल्ट (१७६७-१८३५) याने१८१० मध्ये या विद्यापीठाची स्थापना केली. १९४५ पर्यंत तेफ्रीड्रिख विल्हेल्म विद्यापीठ या नावाने विख्यात होते. त्यानंतर ते बर्लिन विद्यापीठ म्हणून नावारूपास आले. ८ फेब्रुवारी १९४९ रोजी त्याचेहंबोल्ट विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. अध्यापन आणिसंशोधन यांचे ऐक्य साधून ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानोपयोजन यांतून मानवी विकास साधावा, हा उदात्त हेतू हे विद्यापीठ स्थापन करण्यामागे होता.
१८१० मध्ये या विद्यापीठाचे पहिले सत्र २५६ विद्यार्थी आणि ५२ अधिव्याख्याते यांच्या उपस्थितीत सुरू झाले. वैद्यक, तत्त्वज्ञान, कायदा आणि धर्मशास्त्र या विषयांच्या उच्चशिक्षणाची सोय प्रारंभी या विद्यापीठात होती. वेगवान वैज्ञानिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर एकोणिसाव्या--विसाव्या शतकांत विद्यापीठाने अनेक शाखोपशाखा सुरू करून अद्ययावत शिक्षणपद्धतीचा अवलंब केला आहे.
तत्त्वज्ञान, गणित, प्रकृतिविज्ञान, विधी, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, धर्मविद्या, वैद्यक, पशुवैद्यक आणि कृषी या विषयांतर्गत ११ विद्याशाखा विद्यापीठात आहेत. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक असून येथे सत्रपद्धतीचा अवलंब केला जातो. चार वर्षांच्या अध्ययनानंतर विद्यार्थ्यांना पदवीपरीक्षा देता येते. याशिवायपरीक्षेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना ‘डिप्लोमार्बिटा’ या नावाने संबो-धण्यात येणारा प्रबंधही लिहावयाचा असतो. प्रस्तुत पदवीपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी रोजगारक्षम बनतात. संशोधन करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ठराविक कालावधीकरिता अध्ययन व अध्यापन करावे लागते.
अध्यापन, संशोधन आणि प्रशासन या तीनही पातळ्यांवर महिलांच्या क्षमतांचा विकास व्हावा यासाठी विद्यापीठाने विशेष प्रयत्न केले. त्यासाठीखास महिलांसाठी स्वतंत्र प्रशालांची निर्मिती केली आहे. विद्यापीठास आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असून सु. १०० विविध देशांतील विद्यार्थी येथे अध्ययनासाठी येतात. जॉर्ज विल्हेल्म हेगेल, वाल्टर बेंजामिन, ॲल्बर्ट आइनस्टाइन, कार्ल मार्क्स, फ्रीड्रिख एंगेल्स, फ्रीड्रिख शिलर यांसारख्या जागतिक तत्त्ववेत्त्यांनी या विद्यापीठात अध्ययन केले आहे. जर्मनीचासंपन्न सांस्कृतिक वारसा, जर्मनीचे विभाजन आणि शीतयुद्ध या बाबींचा जर्मनीतील शिक्षणव्यवस्थेवर विशेष प्रभाव आहे. १९३०-५० याकाळात दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या राष्ट्रवादाची झळया विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गास बसली होती. त्यातूनही विद्यापीठ प्रशासनाने यशस्वी मार्ग काढला.
विद्यापीठाने सातत्याने वैज्ञानिक आणि सामाजिक विषयांच्या संशो-धनावर भर दिला असून त्यासाठी विद्यापीठात १० स्वतंत्र संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. विद्यापीठात १८५ पदवी अभ्यासक्रमांची सोय आहे. आजमितीस विद्यापीठात ३१,०६५ विद्यार्थी अध्ययन करीत असून ४१९ प्राध्यापक अध्यापन करीत आहेत (२०१३).
लेखक: जगतानंद भटकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/6/2024
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...