नेदर्लंड्समधील लायडन शहरात १५७५ मध्ये स्थापण्यात आलेले सर्वांत जुने विद्यापीठ. डच मुत्सद्दी व राजकारणपटू विल्यम द सायलेंट (१५३३–१५८४) हा या विद्यापीठाचा संस्थापक. सतराव्या शतकात लायडन विद्यापीठ म्हणजे यूरोपमधील अग्रभागी असणारे, उच्च शिक्षण प्रदान करणारे प्रॉटेस्टंट पंथीय केंद्रच समजले जात असे. या विद्यापीठात शेकडो इंग्रज विद्यार्थ्यांनी अध्ययनार्थ आपली नावे नोंदविली होती. त्यावेळी लॅटिन हे अध्यापनाचे माध्यम होते. एकोणिसाव्या शतकारंभापासून डच हे अध्यापनाचे माध्यम झाले.
प्रारंभी लायडन विद्यापीठ हे हॉलंडचे प्रांतिक विद्यापीठ म्हणून कार्य करीत होते. मूलतः ‘जिनीव्हा अकॅडमी’ या कॅल्विहन संप्रदायाची शिकवण देणाऱ्या शिक्षणकेंद्राच्या धर्तीवर या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. नेपोलियनच्या काळापासून लायडनला तीन राज्य विद्यापीठांपैकी एकाचा दर्जा प्राप्त झाला.
फ्रेंच राज्यक्रांतिपूर्वकाळात ‘ईश्वरविद्या’ ही लायडन विद्यापीठाची अग्रेसर विद्याशाखा समजण्यात येई आणि केवळ सनातन संप्रदायातील कॅल्व्हिनमताच्या प्राध्यापकांनाच या विद्यापीठात अध्यापनास अनुज्ञा होती. त्यानंतरच्या काळात ही विद्याशाखा मागे पडली आणि विधी, वैद्यक, निसर्गविज्ञाने, औषधनिर्माणशास्त्र, वाङ्मय, तत्त्वज्ञान, सामाजिक विज्ञाने, भूगोल या विद्याशाखांना महत्त्व प्राप्त झाले. स्त्रियांना अध्ययनार्थ विद्यापीठात प्रवेश दिला गेल्याने विद्यापीठाचे शैक्षणिक व अध्यापनात्मक स्वरूपच बदलल्याचे आढळते. लायडन विद्यापीठात सु. १७,९९३ विद्यार्थी आणि सु. १,६३४ अध्यापक होते (१९८७–८८). विद्यापीठ ग्रंथालयात (स्था. १८५७) १६ लाखांवर ग्रंथ व १५,००० वर हस्तलिखिते आहेत.
सांप्रत लायडन विद्यापीठ हे पौर्वात्य विद्या, भौतिकी, खगोलशास्त्र या विद्याशाखांसाठी प्रसिद्धी पावले आहे. याच विद्यापीठात ‘लायडन जार’चा (स्थिरविद्युत् साठविण्याचे उपकरण) शोध लागला. अठराव्या शतकात हेरमान बूरहाव्हे (१६६८–१७३८) हा डच भौतिकीविज्ञ व वैद्यकाचा प्राध्यापक या विद्यापीठात होता.
वैद्यक व रसायनशास्त्र या विषयांच्या आपल्या असामान्य अध्यापनकौशल्यामुळे त्याने विद्यापीठातील वैद्यकशाखेची प्रतिष्ठा उंचावली.आधुनिक आंतरराष्ट्रीय कायद्याचा जनक तसेच डच विधिवेत्ते व मुत्सद्दी ह्यूगो ग्रोशिअस (१५८३–१६४५) ह्यांनी १५९७ मध्ये याच विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. जॅकब हार्मेन्सेन (१५६०–१६०९) हे डच धर्मोपदेशक व धर्मशास्त्रवेत्ते; डॅनिअल हाइन्सीअस (१५८०–१६५५) तसेच फ्रॅन्सिस्कस हॅम्स्टरहुइस (१६८५–१७६६) हे डच भाषाभ्यासक ह्या सर्वांनी लायडन विद्यापीठात काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले.
‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लिंग्विस्टिक्स अँड अँथ्रॉपॉलॉजी’, ‘द नॅशनल म्यूझीयम ऑफ अँटिक्विटीज’, ‘द नॅशनल म्यूझीयम ऑफ एथ्नॉलॉजी ऑफ एशिया’, ‘द म्यूझीयम ऑफ द हिस्टरी ऑफ सायन्स’, ‘लायडन वेधशाळा’ इ. ख्यातनाम संस्था लायडन विद्यापीठाशी संबद्ध आहेत.
लेखक: वि. रा. गद्रे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/6/2024
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.