अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील जुन्या विद्यापीठांपैकी एक प्रसिद्ध निवासी विद्यापीठ. न्यूयॉर्क शहरात इंग्लंडचा दुसरा जॉर्ज याच्या सनदेनुसार १७५४ साली स्थापन झालेल्या किंग्ज कॉलेजचे रूपांतर १७८४ मध्ये कोलंबिया कॉलेजमध्ये झाले आणि पुढे न्यूयॉर्क संस्थानच्या उच्च-न्यायालयाच्या अधिनियमानुसार १९१२ मध्ये त्यास विद्यापीठाचे स्वरूप प्राप्त झाले. कोलंबिया विद्यापीठास प्रथमपासूनच थोर व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले व अनेक कर्तबगार अमेरिकन व्यक्तींनी तेथे शिक्षण घेतले.
हे विद्यापीठ खासगी असून त्याच्या क्षेत्रात २८ उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था (महाविद्यालये) समाविष्ट होतात. त्यांपैकी बर्नार्ड महाविद्यालय हे फक्तस्त्रियांकरिता आहे, तर कोलंबिया महाविद्यालय पुरुषांकरिता आहे. उर्वरित महाविद्यालयांतून सहशिक्षण आहे. विद्यापीठाच्या महाविद्यालयांतून बहुतेक सर्व महत्त्वाच्या विषयांच्या विद्याशाखा असून त्यांपैकी राज्यशास्त्र, विधी, तत्त्वज्ञान, महासागरविज्ञान, वास्तुकला व भौतिकशास्त्रे यांचे विभाग व त्या विषयांच्या संबंधित संशोधन संस्था प्रसिद्ध आहेत. यांशिवाय विद्यापीठाने इतरही अनेक संस्था सुरू केल्या आहेत.
येथील कोलंबिया प्रेस्बिटेरिअन वैद्यकीय केंद्र व जोसेफ पुलिट्झर यांच्या मृत्युपत्रान्वये सुरू केलेला वृत्तपत्रव्यवसाय विभाग प्रसिद्ध आहे. याशिवाय विद्यापीठातील अनुप्रयुक्त सामाजिक संशोधन संस्था, लॅमॉन्ट भूविज्ञान वेधशाळा, नभोवाणी इ. संस्था प्रसिद्ध आहेत. विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाने अणुकेंद्रीय विद्युज्जनित्र बसविलेले आहे. या विद्यापीठाचे खास वैशिष्ट्य म्हणजे इतर कोणत्याही विद्यापीठापेक्षा यांत परकीय भाषांचे मोठ्या प्रमाणावर अध्ययन व संशोधन केले जाते. प्रकाशन विभाग हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. या विभागातर्फे विविध विषयांतील अभ्यासकांनी संशोधिलेले प्रबंध व तत्संबंधीची टीका आणि निष्कर्ष रोमँटिक रिव्ह्यू, वर्डइ. नावांनी तसेच कोलंबिया युनिव्हर्सिटी फोरम या त्रैमासिकातून आणि कोलंबिया स्पेक्टेटर या दैनिकातून प्रसिद्ध होतात.
विद्यापीठाचे बटलर ग्रंथालय दुर्मिळ आणि मौल्यवान ऐतिहासिक हस्तलिखितांसाठी प्रसिद्ध असून त्यात सु. तीस लाख ग्रंथ आहेत. फार्मसी, बर्नार्ड आणि टीचर्स ही महाविद्यालये वगळता विद्यापीठात सु. १७,०४० विद्यार्थी ५,५५२ अध्यापक होते (१९७२).
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2023
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...