पुस्तके अथवा ग्रंथ यांच्या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्हटल्या जाते. मनोरंजक आणि वैचारिक असे साधारणपणे पुस्तकांचे दोन प्रकार करता येऊ शकतात. मनोरंजनातून संदेश देणारी, वाचकांच्या भावनेला हात घालणारी पुस्तके ही लोकप्रिय असतात. या उलट बुध्दीला आव्हान देणारी, वाचकाच्या तर्कशक्तीला जोखणारी पुस्तके चोखंदळ वाचकांमध्ये लोकप्रिय ठरु शकतात. प्रत्येक पिढीची आवड-निवड ही वेगळी असते. त्यामुळे काळाच्या कसोटीवर आणि वाचकांच्या अभिरुचीनुसार टिकणारी पुस्तके ही चिरकाल आनंद देणारी असतात.
वाचनाची आवड असणारे वाचक सर्व प्रकारची पुस्तके विकत घेऊन वाचू शकत नाहीत. अशावेळी त्यांच्या मदतीला येते ते ग्रंथालय. या ग्रंथालयातील ग्रंथपाल हा मनमिळावू, सहकारी वृत्तीचा असेल तर वाचकाला हवे ते पुस्तक सहजतेने उपलब्ध होऊ शकते. यशस्वी झालेल्या अनेक व्यक्तींच्या जीवनात ग्रंथालयांनी, पुस्तकांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
राज्यातील वाचनसंस्कृती वाढविणा-या अशा या ग्रंथालय चळवळीचा थोडक्यात घेतलेला आढावा. महाराष्ट्रातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृध्द करण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. यामध्ये शासकीय ग्रंथालयांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. या ग्रंथालयांकडून वाचकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे.
वाचनसंस्कृतीचा मोठा वारसा राज्याला लाभलेला आहे. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना सुमारे 200 वर्षांहून अधिक काळाचा वैभवशाली इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपतींनी आपल्या जनतेला सुजाण करण्यासाठी 1945 साली पहिला सार्वजनिक ग्रंथालय कायदा केला. त्यांचे हे पाऊल सांस्कृतिक क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण करणारे ठरले. त्यानंतर 1967 मध्ये राज्यात ‘महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये कायदा’ मंजूर करण्यात आला. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र उभारणीत ग्रंथांचे योगदान महत्त्वाचे आहे. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाच्या अंगभूत गुणांमुळे ‘ग्रंथ हेच गुरु’ असे म्हटल्या जाते.
‘वाचाल तर वाचाल’ असा मंत्र सांगितला जातो, ते उगीच नाही. बौध्दीक आणि सामाजिक विकासासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य, समताआणि बंधुता या त्रिसूत्रीचा केवळ उक्तीतून उद्घोष न होता ती कृतीतून प्रत्ययास आणण्याचे कार्य पुस्तकांच्या रुपाने होऊ शकते. आजच्या पिढीवर असे संस्कार करण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही.
महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा आढावा घेतांना असे दिसून येते की, राज्यामध्ये 1 राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, 6 शासकीय विभागीय ग्रंथालये, 35 जिल्हा ग्रंथालय कार्यालये, 6 विभागीय सहायक ग्रंथालय संचालक कार्यालये, दापोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय आणि 1 ग्रंथालय संचालनालय अशी एकूण 50 कार्यालये कार्यरत आहेत.
राज्यामध्ये मार्च 2016 अखेर 12 हजार 144 सार्वजनिक ग्रंथालयांना शासनमान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये 21 हजार 615 कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ग्रंथालय अधिकारी कार्यालयांचे पहिल्या टप्प्यात ई-ग्रंथालयात रुपांतर करण्यात येणार असून दुस-या टप्प्यात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे ई-ग्रंथालयात रुपांतर करण्याचे प्रस्तावित असल्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी सांगितले.
अहमदनगर येथे 1 फेब्रुवारी 2010 रोजी शासकीय जिल्हा ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. सध्या ग्रंथालयात विविध विषयावरील एकूण 16 हजार 791 हून अधिक ग्रंथ, 20 दैनिके, 32 नियतकालिके नियमितपणे येत असतात. ग्रंथालयाचे एकूण 56 वाचक सभासद असून 6 संस्था सभासद आहेत. ग्रंथालयात अभ्यासिकेची स्वतंत्र व्यवस्था असून दररोज 25 ते 30 वाचक अभ्यासिकेत बसून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असतात. जिल्ह्यात वाचन चळवळीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून तालुकानिहाय कार्यशाळा घेण्यात येत असतात, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष नि.मुंढे यांनी दिली.
सन 2013-14 मध्ये विभागीय सहायक ग्रंथालय संचालक कार्यालयाचे विकेंद्रीकरण होऊन या कार्यालयाचे शासकीय जिल्हा ग्रंथालय ऐवजी ‘जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय’ असा नावात बदल झाला आहे. त्या अनुषंगाने सहायक ग्रंथालय संचालक कार्यालयाचे काम त्या-त्या जिल्ह्याकडे वर्ग करण्यात आले आहे. त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांची तपासणी, अनुदानाचे वितरण करणे, नवीन व दर्जा वाढ ग्रंथालयांची तपासणी करुन अटींची पूर्तता करणा-या ग्रंथालयांची शिफारस करणे ही कामे या कार्यालयाकडून केली जातात. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागवून व छाननी करुन शिफारस करण्यात येत असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय व डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्ताव तपासून शिफारस करणे अशी कामे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून केली जातात. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 514 शासनमान्य ग्रंथालये असून 5 उपकेंद्रे व 2 संशोधन संस्था व जिल्हा ग्रंथालय संघ कार्यरत आहे. यामध्ये अकोले 15, नगर 64, कर्जत 28, कोपरगाव 28, जामखेड 19, नेवासा 51, पाथर्डी 74 ,पारनेर 62, राहाता 13, राहुरी 43, शेवगाव 55, श्रीगोंदा 23, श्रीरामपूर 12, संगमनेर 27 अशी एकूण 514 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. तसेच 46 व्यक्ती सभासद असून 5 संस्था सभासद आहेत. या शिवाय दररोज 25-30 वाचक वाचन कक्षात बसून स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करीत असतात. या कार्यालयाकडून वाचन प्रेरणा दिन, दिवाळी अंकांचे प्रदर्शन तसेच 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2016 या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ अथवा पुस्तके हे माणसे घडविण्याचे काम करतात.
ग्रंथांमुळे माणसे सुसंस्कृत, प्रगल्भ होत असतात. देशाचा विकास हा भौतिकदृष्टया कितीही असला तरी तो सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीने किती विकसितआहे, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे ग्रंथ चळवळीचा, वाचनसंस्कृतीचा विकास व्हायला हवा. भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन हे आहेत. ग्रंथालय शास्त्राची पाच सूत्रे सांगितली जातात. ग्रंथालय हे उपयोगासाठी आहेत, प्रत्येकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, वाचकांचा वेळ वाचावा आणि ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे, ही पंचसूत्री डोळ्यांसमोर ठेवूनच वाचन चळवळीची वाटचाल व्हायला हवी.
रेडिओ, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट च्या काळात नवी पिढी वाचनापासून दूर जात असल्याचे चित्र दिसते. त्यांच्यावर सुसंस्कार करण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तके पुरेशी नाहीएत. नव्या पिढीची मानसिकता ओळखून त्यांच्या सोयीने पुस्तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागेल. त्यासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची साधने वापरावी लागतील. असे केले तरच वाचनसंस्कृती वाढण्यास मदत होईल. वाचनचळवळीला खरी गतीमानता प्राप्त होईल.
स्त्रोत - राजेंद्र सरग जिल्हा माहिती अधिकारी , अहमदनगर
स्त्रोत - http://rajendrasarag.blogspot.in/2016/09/blog-post_15.html
अंतिम सुधारित : 8/2/2023
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना शासनमा...
ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय. त्या...
महावीर वाणीलक्ष्मीसेन ग्रंथालयात अनेक प्राचीन ग्रं...
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ ची अं...