मासा हा नेहमी पाण्यात राहणारा प्राणी आहे. ग्रीस, इटली, ईजिप्त, चीन वगैरे देशांतील प्राचीन वाङ्मयांत मासे, त्यांच्या सवयी व उपयोग यांचे बरेच उल्लेख आहेत. भारतातील पौराणिक वाङ्मयात श्रीविष्णूने जगातला प्रथमावतार मत्स्यरूपानेच घेतला, असा उल्लेख आहे. झष माशाने मनूला त्याच्या निसर्गसंपत्तीने भरलेल्या नौकेसह पाण्यातून ओढून नेऊन वाचविले, अशी कथा आहे. सम्राट अशोकांच्या काळात माशांना प्रजोत्पत्तीसाठी वाव मिळावा व संरक्षण मिळावे म्हणून काही नियम केल्याचे आढळते. जैनकालाच्या शिल्पाकृतींत माशांचे मनोहर मुखवटे आढळतात. अलीकडच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील परशुरामाच्या देवळात, रायगड जिल्ह्यातील पाली येथील गणेशमंदिरात,तसेच नेपाळमधील पशुपतिनाथाच्या देवळात माशांच्या प्रतिकृती आढळतात. माशांच्या आकाराच्या डोळ्यांस सौंदर्यवर्णनात फार मोठे स्थान आहे.‘मीनाक्षी’ हे नाव यावरूनच प्रचारात आले. ज्योतिषशास्त्रात एका राशीस ‘मीन’ राशी म्हणतात, तर लॅटिन भाषेतही ही रास ‘Pisces’ (मासा) या नावाने ओळखली जाते. ख्रिस्ती संस्कृतीत मासा हा येशू ख्रिस्त यांचे प्रतीक मानला जातो. सिरियामधील एका जुन्या पंथात मासा फार पवित्र म्हणून आहारात वर्ज्य मानला जात असे. भारतातही सरासरी ३५ टक्के लोकसंख्या मासे न खाणारी आहे.
मत्स्य वर्गाचा शास्त्रीय अभ्यास अँरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४ – ३२२) यांनी सुरू केला. यानंतर जगात इतरत्र माशांवर विविध प्रकारचे लिखाण झाले. उपलब्ध माहितीप्रमाणे भारतात एम्. ई. ब्लॉक या जर्मन शास्त्रज्ञांनी १७८५ साली भारतीय मत्स्यसंपत्तीवर लिखाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर श्नायडर (१८०१), बी. जी. ई. लेसीपीड (१७९८ – १८०३), पी. रसेल (१८०३), बी. हॅमिल्टन (१८२२) यांनी लिखाण केले. त्यानंतर १८७८ साली फ्रान्सिस डे यांनी द फिशेस ऑफ इंडिया हा युगप्रवर्तक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ अजूनही संदर्भग्रंथ म्हणून वापरला जातो. १९२५ ते १९६५ या काळात एस्. एल्. होरा यांनी हे काम पुढे चालविले. यानंतर कलकत्ता येथील भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेत आणि इतरत्र काही संस्थांत व विद्यापीठांत माशांवर संशोधन चालू आहे.
हे पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणारे) प्राणी होत. ते पाण्यात राहतात. क्लोमाने (कल्ल्याने) श्वसन करतात व पक्षाने (म्हणजे त्वचेच्या स्नायुमय घडीने, पराने) हालचाल करतात. यांतील पुष्कळांच्या अंगावर खवले असतात. मार्जारमीन (कॅटफिश), सुरमाई, वाम हे मासे यास अपवाद आहेत. सर्वसाधारणपणे माशांचे अंक बुळबुळीत असले, तरी केंडसासारख्या माशांचे अंग काटेरी, तर मुशीसारख्या (शार्कसारख्या) माशांचे अंग खरखरीत असते. घोडामासा किंवा नळीमासा यांचे अंग खडबडीत असते. बहुसंख्य माशांचा आकार निमुळता असतो. तरी पण सूर्यमाशासारखे काही मासे वाटोळे भोपळ्यासारखे तर भाकसासारखे मासे भाकरीसारखे चपटे असतात. माशांच्या आकारात खूपच वैचित्र्य आढळते. स्टारफिश, जेलीफिश, क्रेफिश, कटलफिश वगैरे प्राण्यांच्या नावात जरी ‘फिश’ हा प्रत्यय येत असला, तरी शास्त्रीय दृष्ट्या ते मत्स्य वर्गात मोडत नाहीत. हे सर्व अपृष्ठवशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी होत. मत्स्योद्योगात मात्र देवमासा, झिंगे, कोळंबी, खेकडे, कालवे वगैरे मत्स्य वर्गात नसलेल्या प्राण्यांचा समावेश करण्यात येतो.
काही मासे खाऱ्या पाण्यात, तर काही गोड्या पाण्यात आणि काही मचूळ पाण्यात राहतात. सामन किंवा पाला यासारखे मासे काही काळ गोड्या, तर काही काळ खाऱ्या पाण्यात राहू शकतात. समुद्रसपाटीपासून ३,८०० मी. उंचीवरच्या (पेरू व बोलिव्हिया या देशांमध्ये विभागलेल्या तितिकाकासारख्या) सरोवरात, तर ३,०५० मी. सागराच्या खोलीवर मासे आढळले आहेत. मासे हे अनियततापी (शरीराच्या तापमानात परिसराच्या तापमानाला अनुसरून चढउतार होणारे) प्राणी असले, तरी अतिथंड पाण्यात किंवा ५२° से. तापमान असलेल्या पाण्यातही ते आढळले आहेत. माशांच्या जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) असे दिसते की, सु. ४५ कोटी वर्षापूर्वी हे प्राणी अस्तित्वात आले असावेत. जीवसृष्टीतील पृष्ठवंशी प्राण्यांच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) मासा हा एक सुरूवातीचा दुवा आहे. यापासूनच यथाकाल बेडकासारखे उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) प्राणी, सरीसृप (सरपटणारे) प्राणी, पक्षी सस्तन प्राणी यांचा विकास झाला. मत्स्य वर्गात रंग, रूप, आकार व आकारमान यांचे खूपच वैचित्र्य आढळते. जननिक परिवर्तनामुळे (आनुवंशिक लक्षणांत बदल झाल्यामुळे) माशांच्या पुष्कळ जाती निर्माण झाल्या. त्यांतील काही नाश पावल्या. आज अस्तित्वात असलेल्या जातींची संख्या २०,००० ते ३०,००० च्या दरम्यान असावी. इतर कोणत्याही पृष्ठवंशी वर्गातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे. सर्वांत लहान माशांचे आकारमान ९ ते ११ मिमी. इतके असते (उदा., पँडका पिग्मिया), तर सर्वांत मोठा मासा २० मी. पेक्षाही लांब असू शेकल [उदा., करंज (ऱ्हिंकोडॉन टायपस)]. माशाचे वजन ०.०८ ग्रॅ. (उदा., होराइक्थीस सेटनाय) पासून ६८,००० किग्रॅ. पर्यंत असू शकते. सयाममधील पॅगासियस सॅनिट्वांगसी या माशाची लांबी ३.५ मी. असते. तर व्होल्गा नदीतील एसिपेन्सर हूसो या माशाची लांबी ४ मी. असून वजन १,०१० किग्रॅ. पर्यंत असते.
--------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/28/2020
अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या...
तिरंदाज माशाचा समावेश पर्किफॉर्मीस गणाच्या टॉक्झोट...
मासा हा नेहमी पाण्यात राहणारा प्राणी आहे. ग्रीस, इ...
खाण्याकरिताही त्याचा उपयोग करतात