तिरंदाज माशाचा समावेश पर्किफॉर्मीस गणाच्या टॉक्झोटिडी कुलात होत असून सामान्यपणे आढळणाऱ्या माशाचे शास्त्रीय नाव टॉक्झोटिस जॅक्युलॅट्रिक्स आहे. या कुलात टॉक्झोटिस ही एकच प्रजाती असून त्यात सात जातींचे तिरंदाज मासे आहेत. या माशांचे डोळे मोठे असतात. विशेष म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावरील वनस्पतींच्या फांद्यांवर बसलेल्या कीटकांवर हे मासे तोंडातून जोरदार पिचकारी मारून त्यांना खाली पाडतात. म्हणून या कुलाला टॉक्झोटिडी (तिरंदाज) ही संज्ञा वापरली आहे. हे मासे भारतापासून फिलिपीन्सपर्यंत, ऑॅस्ट्रेलिया व पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात आढळतात. उष्ण प्रदेशातील सागरकिनारी, खाजणीच्या वनात आणि खाडीत ते राहतात. ते नद्यांच्या पात्रांमध्ये दूरवर गोड्या पाण्यातही आढळतात. जेथे नद्यांच्या पाण्यावर वनस्पतींची पाने आणि फांद्या झुकलेल्या असतात, तेथे ते झुंडीने वावरतात.
तिरंदाज मासे सु. ४० सेंमी.पर्यंत लांब वाढू शकतात. मात्र, सामान्यपणे ते सु. २० सेंमी. लांब असतात. शरीर दोन्ही बाजूंना दबलेले व चपटे असते. शरीराचा रंग चंदेरी असून बाजूला विरत गेलेले उभे ४-५ पटाशीसारखे काळे पट्टे असतात. डोके त्रिकोणी असून तोंड टोकदार असते. कल्लाछद मोठे असून पृष्ठपर आणि अधरपर काहीसे दूर सरकलेले असल्यामुळे या माशाचा आकार काहीसा लांबट व चपटा पण आकर्षक वाटतो.
पाण्यावर झुकलेल्या वनस्पतींवर बसलेले टोळ, फुलपाखरे, पतंग, भुंगेरे, रातकीटक, कोळी अथवा अन्य लहान प्राणी, तसेच पाण्यातील लहान मासे हे त्यांचे भक्ष्य असते. ते पृष्ठभागाजवळ येऊन पाण्याबाहेरील भक्ष्यावर पाण्याची अचूक पिचकारी मारून त्याला खाली पाडतात आणि खातात. त्यांच्या तोंडात टाळ्यावर एक उभी खाच असते. तिला जीभ लावून कल्ल्यांचा कप्पा आंकुचित करून ते पाण्याची पिचकारी उडवितात. ही पिचकारी २ ते ५ मी. दूर जाऊ शकते. तसेच पिचकारीचा कोन पाण्याच्या पृष्ठभागाशी ४५० ते ११०० इतका असू शकतो. त्यांचे दोन्ही डोळे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आणून ते प्रकाशकिरणांच्या वक्रीभवनाचा अंदाज घेऊन भक्ष्याचा अचूक वेध घेतात. एकापाठोपाठ ६-७ वेळा ते पिचकारी मारू शकतात. प्रौढ मासे पहिल्या प्रयत्नात भक्ष्य मिळवितात. भक्ष्य ३०-६० सेंमी. उंचीवर असल्यास हे मासे पाण्याबाहेर उडी मारून त्यास थेट पकडतात.
नर व मादी दिसायला सारखेच दिसतात. विणीसाठी हे मासे प्रवाळ परिसंस्थेत जातात. मादी सु. २०,००० ते १,५०,००० अंडी घालते. त्यांपैकी फारच थोडी पिले प्रौढावस्था गाठू शकतात. पिले १-२ वर्षांत प्रौढ होतात.
भारतात तिरंदाज माशाच्या टॉ. शॅटॅरियस आणि टॉ. मायक्रोलेपिस या दोन जातीही आढळतात. टॉ. शॅटॅरियस या माशाची लांबी १५-२० सेंमी., रंग काळा असून शरीरावर ६-७ गडद पट्टे असतात. टॉ. मायक्रोलेपिस हा मासा लांबीला इतर दोन्ही जातींहून लहान असून त्याची कमाल लांबी १५ सेंमी. असते. शरीराच्या बाजूवर पिवळे किंवा सोनेरी पट्टे असतात.
खाजण क्षेत्रातील मानवी अतिक्रमण आणि प्रदूषण यांच्यामुळे या माशांची संख्या घटत चालली आहे. काही ठिकाणी उद्यानांमधील कृत्रिम हौदात आणि तळ्यात हे मासे सोडले जातात. अशा ठिकाणी पाणवनस्पतींवर येणाऱ्या मावा कीटकांच्या संख्येवर हे नियंत्रण राखतात.
लेखक: शिवाप्पा किट्टद
स्त्रोत: कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
खाण्याकरिताही त्याचा उपयोग करतात
डिप्नोई गणातील माशांना फुप्फुसमीन म्हणतात.
अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या...
मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील...