मासा हा नेहमी पाण्यात राहणारा प्राणी आहे. ग्रीस, इटली, ईजिप्त, चीन वगैरे देशांतील प्राचीन वाङ्मयांत मासे, त्यांच्या सवयी व उपयोग यांचे बरेच उल्लेख आहेत. भारतातील पौराणिक वाङ्मयात श्रीविष्णूने जगातला प्रथमावतार मत्स्यरूपानेच घेतला, असा उल्लेख आहे. झष माशाने मनूला त्याच्या निसर्गसंपत्तीने भरलेल्या नौकेसह पाण्यातून ओढून नेऊन वाचविले, अशी कथा आहे. सम्राट अशोकांच्या काळात माशांना प्रजोत्पत्तीसाठी वाव मिळावा व संरक्षण मिळावे म्हणून काही नियम केल्याचे आढळते. जैनकालाच्या शिल्पाकृतींत माशांचे मनोहर मुखवटे आढळतात. अलीकडच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील परशुरामाच्या देवळात, रायगड जिल्ह्यातील पाली येथील गणेशमंदिरात,तसेच नेपाळमधील पशुपतिनाथाच्या देवळात माशांच्या प्रतिकृती आढळतात. माशांच्या आकाराच्या डोळ्यांस सौंदर्यवर्णनात फार मोठे स्थान आहे.‘मीनाक्षी’ हे नाव यावरूनच प्रचारात आले. ज्योतिषशास्त्रात एका राशीस ‘मीन’ राशी म्हणतात, तर लॅटिन भाषेतही ही रास ‘Pisces’ (मासा) या नावाने ओळखली जाते. ख्रिस्ती संस्कृतीत मासा हा येशू ख्रिस्त यांचे प्रतीक मानला जातो. सिरियामधील एका जुन्या पंथात मासा फार पवित्र म्हणून आहारात वर्ज्य मानला जात असे. भारतातही सरासरी ३५ टक्के लोकसंख्या मासे न खाणारी आहे.
मत्स्य वर्गाचा शास्त्रीय अभ्यास अँरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४ – ३२२) यांनी सुरू केला. यानंतर जगात इतरत्र माशांवर विविध प्रकारचे लिखाण झाले. उपलब्ध माहितीप्रमाणे भारतात एम्. ई. ब्लॉक या जर्मन शास्त्रज्ञांनी १७८५ साली भारतीय मत्स्यसंपत्तीवर लिखाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर श्नायडर (१८०१), बी. जी. ई. लेसीपीड (१७९८ – १८०३), पी. रसेल (१८०३), बी. हॅमिल्टन (१८२२) यांनी लिखाण केले. त्यानंतर १८७८ साली फ्रान्सिस डे यांनी द फिशेस ऑफ इंडिया हा युगप्रवर्तक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ अजूनही संदर्भग्रंथ म्हणून वापरला जातो. १९२५ ते १९६५ या काळात एस्. एल्. होरा यांनी हे काम पुढे चालविले. यानंतर कलकत्ता येथील भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेत आणि इतरत्र काही संस्थांत व विद्यापीठांत माशांवर संशोधन चालू आहे.
हे पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणारे) प्राणी होत. ते पाण्यात राहतात. क्लोमाने (कल्ल्याने) श्वसन करतात व पक्षाने (म्हणजे त्वचेच्या स्नायुमय घडीने, पराने) हालचाल करतात. यांतील पुष्कळांच्या अंगावर खवले असतात. मार्जारमीन (कॅटफिश), सुरमाई, वाम हे मासे यास अपवाद आहेत. सर्वसाधारणपणे माशांचे अंक बुळबुळीत असले, तरी केंडसासारख्या माशांचे अंग काटेरी, तर मुशीसारख्या (शार्कसारख्या) माशांचे अंग खरखरीत असते. घोडामासा किंवा नळीमासा यांचे अंग खडबडीत असते. बहुसंख्य माशांचा आकार निमुळता असतो. तरी पण सूर्यमाशासारखे काही मासे वाटोळे भोपळ्यासारखे तर भाकसासारखे मासे भाकरीसारखे चपटे असतात. माशांच्या आकारात खूपच वैचित्र्य आढळते. स्टारफिश, जेलीफिश, क्रेफिश, कटलफिश वगैरे प्राण्यांच्या नावात जरी ‘फिश’ हा प्रत्यय येत असला, तरी शास्त्रीय दृष्ट्या ते मत्स्य वर्गात मोडत नाहीत. हे सर्व अपृष्ठवशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी होत. मत्स्योद्योगात मात्र देवमासा, झिंगे, कोळंबी, खेकडे, कालवे वगैरे मत्स्य वर्गात नसलेल्या प्राण्यांचा समावेश करण्यात येतो.
काही मासे खाऱ्या पाण्यात, तर काही गोड्या पाण्यात आणि काही मचूळ पाण्यात राहतात. सामन किंवा पाला यासारखे मासे काही काळ गोड्या, तर काही काळ खाऱ्या पाण्यात राहू शकतात. समुद्रसपाटीपासून ३,८०० मी. उंचीवरच्या (पेरू व बोलिव्हिया या देशांमध्ये विभागलेल्या तितिकाकासारख्या) सरोवरात, तर ३,०५० मी. सागराच्या खोलीवर मासे आढळले आहेत. मासे हे अनियततापी (शरीराच्या तापमानात परिसराच्या तापमानाला अनुसरून चढउतार होणारे) प्राणी असले, तरी अतिथंड पाण्यात किंवा ५२° से. तापमान असलेल्या पाण्यातही ते आढळले आहेत. माशांच्या जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) असे दिसते की, सु. ४५ कोटी वर्षापूर्वी हे प्राणी अस्तित्वात आले असावेत. जीवसृष्टीतील पृष्ठवंशी प्राण्यांच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) मासा हा एक सुरूवातीचा दुवा आहे. यापासूनच यथाकाल बेडकासारखे उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) प्राणी, सरीसृप (सरपटणारे) प्राणी, पक्षी सस्तन प्राणी यांचा विकास झाला. मत्स्य वर्गात रंग, रूप, आकार व आकारमान यांचे खूपच वैचित्र्य आढळते. जननिक परिवर्तनामुळे (आनुवंशिक लक्षणांत बदल झाल्यामुळे) माशांच्या पुष्कळ जाती निर्माण झाल्या. त्यांतील काही नाश पावल्या. आज अस्तित्वात असलेल्या जातींची संख्या २०,००० ते ३०,००० च्या दरम्यान असावी. इतर कोणत्याही पृष्ठवंशी वर्गातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे. सर्वांत लहान माशांचे आकारमान ९ ते ११ मिमी. इतके असते (उदा., पँडका पिग्मिया), तर सर्वांत मोठा मासा २० मी. पेक्षाही लांब असू शेकल [उदा., करंज (ऱ्हिंकोडॉन टायपस)]. माशाचे वजन ०.०८ ग्रॅ. (उदा., होराइक्थीस सेटनाय) पासून ६८,००० किग्रॅ. पर्यंत असू शकते. सयाममधील पॅगासियस सॅनिट्वांगसी या माशाची लांबी ३.५ मी. असते. तर व्होल्गा नदीतील एसिपेन्सर हूसो या माशाची लांबी ४ मी. असून वजन १,०१० किग्रॅ. पर्यंत असते.
मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीराला पोषक आहेत. कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांसारखी जैव मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी खनिजेही थोड्या प्रमाणात माशांपासून मिळतात. मासळीत काही महत्त्वाची जीवनसत्त्वेही असतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून अ व ड जीवनसत्त्वयुक्त औषधी तेल निघते, तर आतड्यापासून ब जीवनसत्त्व मिळू शकते. मुश्यांच्या पक्षांपासून सार (सूप) करतात. मासे पचनास हलके असतात. त्यांच्या चरबीपासून रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉल वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्याने रक्तदाब कमी होतो. काही माशांच्या शरीरातील वाताशयांचा (हवेच्या पिशव्यांचा) विविध कामांसाठी उपयोग केला जातो. पाळीव जनावरांच्या आहारासाठी मत्स्यपीठ व झाडांसाठी उत्तम खतही मासळीपासून मिळते. मत्स्योद्योगात जगातील कोट्यवधी लोक गुंतले आहेत.
डासांच्या अळ्या नष्ट करून हिवतापाचे (मलेरियाचे) निर्मूलन करण्याच्या कामी गॅम्ब्यूझसारख्या माशांचा फार उपयोग होतो. काही मासे नारूसारख्या रोगाचा प्रतिबंध करण्यास उपयोगी पडतात. काही मासे प्रायोगिक प्राणी म्हणून तर काही पाण्यातील प्रदूषण शोधून काढण्यास उपयुक्त ठरतात.
ज्या माशांच्या जातीचे सहज प्रजनन होऊ शकते व जे आकारमानाने लहान पण रंगदार व दिसण्यात आकर्षक असतात असे गोड्या पाण्यातील मासे काचेच्या जलजीवपात्रात ठेवून घराची शोभा वाढविणे व मनोरंजन करणे हाही जगातील लक्षावधी लोकांचा व्यवसाय आहे. एकट्या उत्तर अमेरिकेत या व्यवसायात अंदाजे पन्नास लक्ष लोक गुंतलेले असावेत. चीन, जपान व इतर दक्षिण आशियातील राष्ट्रांतही हा एक आवडीचा छंद मानला जातो.मुंबईत अनेक लोकांच्या घरी माशांची जलजीवपात्रे आढळतात. मुंबईतील तारापोरवाला जलजीवालय प्रसिद्ध आहे.[⟶ जलजीवालय].
पाण्यात गळ टाकून मासे पकडणे हाही प्रकार जगात सर्वत्र आढळतो. या प्रकाराने काही गोरगरीब चरितार्थासाठी मासे पकडतात, तर काही छंद म्हणून हौसेने मासेमारी करतात. या कामासाठी लागणारी उपकरणे अत्यंत साधी व गरिबांच्या आवाक्यात असलेली असू शकतात, तर काही किंमती असतात. किंमती उपकरणे तयार करण्याचे कारखाने बऱ्याच विकसित देशांत आहेत. हा छंद असलेले, निरनिराळ्या सामाजिक वा आर्थिक स्तरांतले लाखो लोक जगात आहेत. काही मासे शिकारी मासे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सहजगत्या गळास लागत नाहीत. काही वेळा बंदुकीने त्यांची शिकार केली जाते.[⟶ मत्स्यपारध].
(प्रसार). गोडे, खारे किंवा मचूळ अशा सर्व प्रकारच्या पाण्यात माशांचे अस्तित्व आढळते. काही गरम पाण्याचे झरे, मध्यपूर्व प्रदेशामधील (पॅलेस्टाइन) मृतसमुद्र व अमेरिकेतील उटा राज्यातील ग्रेट सॉल्ट लेक हे पाण्याचे साठे यास अपवाद आहेत. भारतात महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर व आफ्रिकेतील काही सुप्त ज्वालामुखींच्या कुंडातील तळी यांत मासे आढळत नाहीत. सर्वसाधारणपणे गोड्या पाण्यातला मासा खाऱ्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यातला मासा गोड्या पाण्यात जगू शकत नाही; सामन, यूरोपियन वाम, पाला, शॅड हे व असेच आणखी काही मासे गोड्या व खाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या पाण्यात काही काळ जगू शकतात. बोय, भेक्ती (जिताडा), काळुंदर, वडस यांसारखे मासे नदीमुखातील मचूळ पाण्यात आढळतात.
समुद्राच्या खाऱ्या पाण्याची विभागणी (अ) किनाऱ्यास लागून असलेले खारे पाणी, (आ) किनाऱ्यापासून दूर असलेले खारे पाणी व (इ) समुद्राच्या तळाशी खोलवर असलेले खारे पाणी, अशी करता येईल. नदीमुखातील मचूळ पाण्यामधील माशांचे किनाऱ्यास लागून असलेल्या खाऱ्या पाण्यातील माशांशी बरेच साधर्म्य आढळते. तसेच किनाऱ्याजवळच्या खाऱ्या पाण्यातील माशांचे किनाऱ्यापासून दूर असलेल्या खाऱ्या पाण्यातील माशाशीही काही प्रमाणात साधर्म्य आढळते; पण समुद्राच्या खोल पाण्यात राहणाऱ्या माशांच्या जाती मात्र निराळ्या आहेत. अत्यंत खोल सागराच्या धनदाट अंधःकारात व पाण्याच्या प्रचंड दाबाखाली अत्यंत कष्टमय व वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीत राहिल्यामुळे त्यांच्या शरीररचनेत खूप बदल घडून येतात. काही मासे समुद्रात फार खोलवर न जाता मधल्या भागात राहतात, तर काही समुद्राच्या पृष्ठभागाजवळ राहतात. किनाऱ्याजवळ पण खडकांत अगर पोवळ्यांच्या बेटांत राहणाऱ्या माशांच्या शरीररचनेतही परिस्थितीनुरूप बदल घडून येतात. गोड्या पाण्यात राहणारे मासेही काही तलावांच्या संथ पाण्यात, काही नदीच्या डोहांत, तर काही खळखळत जोराने वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात आढळतात. परिस्थितीनुरूप त्यांच्या शरीररचनेत बदल घडून येतात. डोंगरी प्रवाहातील माशांचा या कारणामुळेच निराळा गट मानला गेला आहे.
मत्स्य वर्गाचा उद्भव खाऱ्या पाण्यातच झाला असावा असे दिसते. खाऱ्या पाण्यातून मासे गोड्या पाण्यात आले असावेत, असा काही शास्त्रज्ञांचा कयास आहे. याला अपवाद म्हणजे सायप्रिनिफ्रॉर्मीस या गणातील कार्प, कॅरसीन व मार्जारमीन हे मासे होत. या माशांच्या पूर्वजांत अगर शरीररचनेत खाऱ्या पाण्यातील माशांच्या शरीररचनेशी साम्य आढळत नाही. गोड्या पाण्यातील माशांत, खाऱ्या पाण्यातील माशांपेक्षा जाती व उपजाती पुष्कळच कमी आहेत; तसेच त्यांच्यातील जीवनकलहही इतक्या तीव्र स्वरूपाचा नाही. यामुळे त्यांच्या शरीररचनेत होणाऱ्या परिवर्तनाचे स्वरूपही सौम्य आहे. खाऱ्या पाण्यात समुद्राच्या तळाशी राहणारे मासे विलक्षण मोठ्या जबड्याचे आणि लांबलचक चमत्कारिक दात असलेले आहेत. किनाऱ्याजवळच्या खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या माशांतही हे वैचित्र्य आढळते. उदा., घोडामासा, गायमासा, पिसोमारी वगैरे माशांचे आकार विलक्षण आहेत. खाऱ्या पाण्यातील माशांच्या रंगातही खूपच विविधता आढळते.
माशांच्या भौगोलिक वितरणावरून असे दिसते की, प्राचीन काळातील माशांत फारसे फरक नसावेत. याउलट अर्वाचीन मत्स्य वर्गाची उत्पत्ती व वितरण निरनिराळ्या भूविभागांत निरनिराळे व स्वतंत्र रीतीने झाल्यासारखे दिसते. तरीही या विकासात मूलभूत रचनात्मक साम्य आढळते. मलेशिया, ब्रह्मदेश व भारत या देशांतील गोड्या पाण्यातील माशांची उत्पत्ती व प्रसार एकाच तऱ्हेने झालेले आहे. या पलीकडील पूर्व भागांतील मत्स्यसंपत्ती निराळी दिसत असली, तरीही त्यांच्यातील आनुवंशिक गुणधर्म इतर भागांतील मत्स्यसंपत्तीशी सारखेपणा दर्शवितात. प्रत्येक देशातील पर्वतांच्या रांगा, पाण्याच्या प्रवाहातील प्रतिबंध इ. कारणांमुळे माशांच्या प्रसाराला बाध येतो. अशा प्रसार खंडित झालेल्या माशांच्या शरीररचनेतही फरक पडतात. नैसर्गिक कारणांनी भूभागाचे विभाजन झाले म्हणजे दोन खंडांतील मत्स्य वर्ग काही बाबतींत सारखा, तर काही बाबतींत निराळा आढळून येतो. उदा., भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या माशांच्या काही जातींत व आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरच्या माशांच्या काही जातींत बरेच साम्य आहे. तसेच दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील व आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील काही जातींत साम्य आहे. यावरून असे अनुमान निघते की, भारत, आफ्रिका व दक्षिण अमेरिका हे भूप्रदेश एकेकाळी जुळलेले असावेत आणि पुढे दूर दूर ते होत गेले असावेत. उत्तर अमेरिकेतील काही माशांच्या जाती यूरोपियन माशांच्या जातींशी सारखेपणा दर्शवितात. उत्तर व दक्षिण ध्रुवांजवळील समुद्रातला मत्स्य वर्ग मात्र एकमेकांपासून भिन्न आहे. पॅसिफिक व अटलांटिक महासागरांच्या उत्तर विभागातील किनाऱ्यावरील मत्स्य वर्ग जरी निरनिराळा असला, तरी या समुद्राच्या मध्यभागात दूरवर भ्रमण करणाऱ्या ट्यूनासारख्या माशांच्या जातींत विशेष फरक आढळत नाही.
माशांचे जीवनवृत्त सर्वसाधारणपणे पाण्यातील एकंदर परिस्थितीशी जुळणारे असते. ही परिस्थिती विविध प्रकारची असल्यामुळे जीवनवृत्तातही विविधता आढळते. माशांना बाह्य जननेंद्रिये नसतात. मादी पाण्यात अंडी सोडते व त्याच वेळी तिच्याजवळ असणारा नर अंड्यावर शुक्राणूंचा (पु-जनन पेशींचा) वर्षाव करतो. अंड्याचे निषेचन (फलन) व पुढील विकास पाण्यातच होतो. अंड्यातून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगाणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर येण्यास अठरा तासांपासून काही आठवड्यांचा अवधी लागतो. किती अवधी लागावा हे त्या जातीवर व तापमान वगैरेंसारख्या भोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते.डिंभाचे रूपांतरण प्रौढात होते. यास लागणारा कालही माशाच्या जातीवर अवलंबून असतो. पुष्कळ माशांत थोडे दिवस पुरतात, तर ईल या माशास ३ किंवा ४ वर्षे व लँप्री या माशास पाच वर्षे लागतात. साधारणपणे अंडी निषेचित झाल्यावर तो इतस्ततः वाहत जात असतानाच वाढत असतात व शेवटी डिंभ बाहेर पडतो. स्टिकलबॅक, गुरामी, सयामी फायटर, शिंगाडा इ. माशांत नर किंवा मादी अंड्याची किंवा पिलांची काळजी घेतात. पिसिलीडी व इतर काही मत्स्यकुलांत अंड्याचे निषेचन व गर्भाची वाढ मादीच्या शरीरातच होते व ही मादी अंडी न घालताच पिलांना जन्म देते. या माशांत बाह्य जननेंद्रियेही आढळतात. मुशी, वागळी, पाकट इ. उपास्थिमिनांतही ( ज्यांचा सांगाडा कूर्चेचा बनलेला असतो अशा माशांतही) अशीच प्रजनन व्यवस्था असते. काही माशांत अंड्यांचे निषेचन मादीच्या शरीरात होते व पुढची वाढ बाहेर पाण्यात होते. काही थोड्या जाती उभयलिंगी आहेत; परंतु त्यांच्यातील पुं-जनन तंत्र (नरातील जनन संस्था) व स्त्री-जनन तंत्र निरनिराळ्या वेळी पक्व होतात.
काही जाती डिंभावस्थेपासून काही महिन्यांतच प्रौढावस्थेत येऊन प्रजनन करू लागतात, तर काही माशांत हा काळ ४-५ वर्षांपेक्षाही जास्त असतो. वाम माशास प्रौढावस्थेत येण्यास बारा वर्षे लागतात. माशांचे आयुष्यही एकदोन वर्षांपासून काही जातीत २० ते ३० वर्षांपर्यंत असू शकते. कार्प मासा ५० वर्षेही जगतो असे म्हणतात.
माशांचे हे गुणधर्म फार जटिल (गुंतागुंतीच्या) स्वरूपाचे आहेत. त्यांचे संवेदन मुख्यतः त्यांच्या मेंदूपासून सुरू होते. परिस्थितीचा दृश्य प्रतिसाद व त्यातील अनुभव यांवर त्यांची प्रतिक्रिया अवलंबून असते आणि या सर्वांचा परिपाक त्यांच्या वर्तनात होत असतो. माशांची संवेदनशीलता फक्त दृष्टीच्या साह्यानेच प्रतीत न होता चव, आवाज, स्पर्श याही मार्गांनी होते. माशांच्या दोन्ही बाजूंना सूक्ष्म छिद्रे असलेली अशी ⇨ पार्श्विक रेखा असते. या सूक्ष्म छिद्रांत असलेल्या संवेदन तंतूंमुळे पाण्याच्या दाबात, प्रवाहात, स्पर्धात किंवा आवाजात होणारे सूक्ष्म फरकही त्यांना जाणवतात. यामुळेच थव्याने जाणारे मासे आपली दिशा एकसमयावच्छेदेकरून बदलू शकतात. काही मासे विजेचा दाब उत्पन्न करू शकतात व यापासून विवक्षित प्रकारची संवेदना प्राप्त करतात. काही माशांत (उदा., वडस) डोळे मोठे असतात. हे इंद्रिय जास्त कार्यक्षम झाले, तर इतर इंद्रिये कमी कार्यक्षम असण्याची शक्यता असते. याउलट मुशीसारख्या लहान डोळ्यांच्या माशात घ्राणेंद्रिये जास्त कार्यक्षम असतात. शिकार मिळविण्यास किंवा शत्रूचा प्रतिकार करण्यात त्यांना घ्राणेंद्रियाचा जास्त उपयोग होतो.
अन्न मिळविणे, शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करणे व प्रजनन या क्रिया करताना माशांच्या वर्तनाचे निरनिराळे आविष्कार प्रकट होतात. मार्जारमीन, साळ मासे (पॉर्क्युपाइनफिश) इत्यादींच्या शरीरावर स्वसंरक्षणासाठी काटेरी कवच असते. काही मासे स्वसंरक्षणासाठी खडकात किंवा कपारीत लपून बसतात, तर काही थव्याथव्याने राहून शत्रूचा प्रतिकार करतात. थव्याने राहताना संरक्षण हा नुसता एकच हेतू नसतो, तर विणावळीची सुलभता व अन्नार्जन हेही हेतू असतात. जिताडा, तांबुसा, गोडी वाम यांसारखे मासे एकेकटे राहतात; तर कटला, रोहू, मृगळ, बोय, गुरामी या माशांचे समूह एकमेकांत मिसळतात. प्रजननासाठी काही माशांचे होणारे स्थलांतर आश्चर्यकारक आहे. सामन मासे हे विणावळीस खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात (नदीत) आपल्या जन्मस्थानाकडे जातात, तर यूरोपियन ईल मासे गोड्या पाण्यातून निघून हजारो किलोमीटर खाऱ्या पाण्याचा प्रवास करतात. माशांचे एकमेकांशी संदेशवहन कसे होते हे अजून तितकेसे स्पष्ट झाले नाही. दोन नरांमध्ये युद्ध होणे, नर व मादी यांनी मिळून घरटे बांधणे, काचेच्या जलजीवपात्रात किंवा जलजीवालयातील टाकीत पुष्कळ मासे असताना त्यांतील एक नर व एक मादी यांची जोडी बनणे, या सर्व क्रिया होण्यास संदेशवहन आवश्यक आहे व ते होत असले पाहिजे. डॉक्टर मासा हा आकारमानाने लहान आहे; पण तो मोठ्या माशाच्या तोंडात जाऊन त्याचे दात साफ करतो व क्लोमांत जाऊन त्यांतील किडे काढून टाकतो. मोठा मासा इतर लहान माशांना खात असला, तरी या लहान डॉक्टर माशास तो काही करत नाही. यावरून या दोन माशांस एकमेकांस ओळखण्याची व संदेश देण्याची पात्रता असली पाहिजे, असे दिसते.
माशांच्या डोळ्यावर पापण्या नसल्यामुळे इतर पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे पापण्या मिटून झोप घेणे त्यांना शक्य नसते. माशांची झोप म्हणजे एके ठिकाणी निश्चल राहणे. या परिस्थितीतही आजूबाजूच्या पाण्यात किंचित जरी फरक पडला, तरी ते भरकन आपली जागा बदलतात. मागूर, मरळ, मुरी यांसारखे मासे रात्री जास्त चपळ असतात व अन्नार्जनासाठी इतस्ततः फिरत असतात.
(हालचाल). माशांची हालचाल मुख्यतः पाण्यातच होते. त्यांच्या शरीराचा आकार या हालचालीस योग्य असाच असतो. चलनवलनाच्या रीती निरनिराळ्या असतात. सर्वसाधारणपणे अग्रगामी (डोक्याच्या बाजूस होणारी) हालचाल शरीराच्या पश्च भागाच्या (शेपटीच्या) एकामागे एक असलेल्या पार्श्व स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणामुळे होत असते. या क्रियेत पाणी बाजूला दाबले जाऊन शरीराच्या लवचिकपणामुळे मासे पुढे पुढे जाऊ शकतात. बाजूला वळणे किंवा शरीराचा तोल सांभाळणे या क्रिया इतर विविध पक्ष पार पाडतात. सर्वसाधारणपणे मासे पाण्याच्या पृष्ठभागाशी समांतर स्थितीत आडवे पोहतात. काही मासे (उदा., पाइपफिश, घोडामासा) पोहत असताना त्यांचे शरीर पाण्याच्या पृष्ठभागाशी काटकोनात असते म्हणजे ते उभे पोहतात व त्यांची गती त्यांच्या परांवरच अवलंबून असते. सरंगा, हलवा यांसारखे मासे तिरक्या स्थितीत पोहतात. ⇨ उडणारे मासे आपल्या शेपटीच्या फटकाऱ्याने पाण्याच्या बाहेर झेप घेतात व आपल्या अंसपक्षांनी (पुढील पायांसमान असलेल्या पक्षांनी) पक्ष्यासारखे हवेत तरंगतात. समुद्राच्या तळाशी राहणारे वागळी, पाकट यांसारखे मासे त्यांच्या चापट शरीराच्या दोन्ही बाजूंच्या परांच्या व स्नायूंच्या विवक्षित हालचालीने आपली प्रगती करतात. लेप, प्लेस, सोल,
हॅलिबट या माशांना प्रचालनाकरिता त्यांच्या शरीराच्या पश्च भागात असलेल्या स्नायूंची मदत होते. निवटी (मडस्कीपर) मासे खाऱ्या पाण्याच्या डबक्यात राहतात. हे आपले अंसपक्ष जोराने चिखलावर आपटून घेऊन धावू शकतात. खजुरी (कोय, क्लायम्बींग पर्च), मागू र, शिंगी यांसारखे पूरक किंवा साहाय्यक श्वसनावयव असणारे मासे अंस पक्षांच्या कंकालाच्या (सांगाड्याच्या) आधारे एकदा एक बाजूस वळून पुढे जाऊन नंतर दुसऱ्या बाजूस पुढे जाऊन, पाण्याच्या बाहेर गवतावरून किंवा ओल्या जमिनीवरून आपला मार्ग आक्रमितात. याबाबतीत खजुरी मासा आपल्या क्लोमाच्या प्रच्छदावरील (आवरणावरील) कंटकांचाही (काट्यांचाही) उपयोग करतो. मरळ मासा आपल्या लांबट गोलसर शरीराला सापासारखी डावी-उजवी वळणे देऊन ओल्या जमिनीवरून सरपटत जातो. किनारपट्टीच्या चिखलातले निवटी,अमेरिकेतील मड मिनो, उम्रा व जपानी मिसगुरनस हे मासे बिळे करण्याच्या व त्यांतून आतबाहेर येण्याच्या हालचाली करतात. आफ्रिकेतील फुप्फुसमीन प्रोटॉप्टेरस व पिलावस्थेतील लँप्री हेही बिळे करून राहतात. भारतातील हिरवी वाम (पिसोडोनोफीस) ही तर शेपटीच्या टणक टोकाने खाजणी शेताच्या बांधात विळे करते. रोहू, बोय, क्लास हे मासे जाळे लावले असता त्यावरून उड्या मारून पळून जाऊ शकतात. सामन मासे छोटे बंधारे उल्लंघून जातात, तर टारपन किंवा महसीर मासे टाकलेल्या गळावरून हवेत उसळून जातात. या वर उल्लेखिलेल्या माशांच्या हालचाली विशिष्ट तऱ्हेच्या होत.
माशांचे स्थलांतर हा त्यांच्या हालचालीचाच एक प्रकार आहे. दूरवरच्या नवीन पर्यावरणात मोठ्या संख्येने जाण्याच्या क्रियेस स्थलांतर म्हणता येईल. स्थलांतराचा हेतू प्रजनन, अन्नार्जन किंवा प्रतिकूल परिस्थितीतून सुटका हा असू शकेल. प्रजननासाठी होणाऱ्यास्थलांतराचे निरनिराळे प्रकार आहेत. पाला (हिल्सा), शॅड किंवा सामन यांसारखे मासे समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून नद्यांच्या गोड्या पाण्यात येतात; तर अमेरिकन व यूरोपियन ईल नद्यांतून निघून समुद्रात शिरतात व हजारो किलोमीटर
दूरवर जातात. खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात स्थलांतर करणाऱ्या माशास समुद्रापगामी (ॲनाड्रोमस) मासे व गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात स्थलांतर करणाऱ्या माशांस समुद्रगामी (कॅटोड्रोमस) मासे असे म्हणतात. पॅसिफिक सामनचे स्थलांतर फार चित्तथरारक आहे. या माशांची वाढ चार वर्षे समुद्रात होते व अंडी घालण्याची वेळ आली की, ते मोठ्या संख्येने नदीच्या पाण्यात त्यांच्या जन्मस्थानाकडे म्हणजे ज्या लहान ओढ्यात त्यांचा जन्म झाला असेल तेथे स्थलांतर करू लागतात. या काळात नर व मादी काही खात नाहीत व कुठेही थांबत नाहीत. वाटेत येणाऱ्या अडचणींवर मात करून लहानलहान धरणांरून उड्या मारून ते आपले उद्दिष्ट गाठतात. इष्टस्थळी पोहोचल्यावर उथळ पण स्वच्छ अशा गोड्या पाण्याच्या प्रवाहात ते आपल्या तोंडांनी खड्डे करतात. याला आपण घरटे म्हणू शकतो. या खड्ड्यात अगर घरट्यात मादी अंडी घालते व नर ती निषेचित करतो. नंतर ते दोघे तिथल्याच गोलसर गोट्यांनी ते खड्डे बुजवितात. सामनच्या काही जातींतील नर व मादी परत समुद्रात जातात;परंतु ‘सॉक आय’ किंवा किंग सामनच्या नर व मादी घरटेवजा खच्चे बुजविण्याचे शेवटचे कार्य संपले की, मरून जातात. २५−३० दिवसांनी अंड्यांतून डिंभ बाहेर येतात व तेथील पाण्यातील सूक्ष्म जीवजंतूंवर आपली गुजराण ४−६ महिन्यांपर्यंत करतात. नंतर ज्या मार्गाने त्यांचे मातापितर आले त्या मार्गानेच समुद्राकडे स्थलांतर करतात. तेथे ४−६ वर्षे राहून मोठे झाल्यावर परत नदीकडे विणावळीसाठी येतात, अंडी घालतात व मरून जातात.
यूरोपियन ईल या माशांचे स्थलांतर समुद्रगामी आहे. यूरोपातील नद्या सोडून हे मासे अटलांटिक महासागरातील४,८००किमी.चा खाऱ्यापाण्यातील प्रवास करून सारगॅसी समुद्रात येतात. हा समुद्र उत्तर अटलांटिक प्रदेशात वेस्ट इंडीज बेटांच्या ईशान्येकडे आहे व येथील पाणी थोडेसे उष्ण व संथ आहे. या पाण्यात ईल मासे अंडी घालतात. ती निषेचित झाल्यावर लेप्योसेफॅलस स्वरूपातील डिंभ बाहेर येतात. मग हे डिंभ गल्फ स्ट्रीमच्या पाण्यात वाढतात व त्या प्रवाहाबरोबर परंतु न चुकता परत ज्या देशातून त्यांचे जनक आले त्या देशात परत जातात. [⟶ प्राण्यांचे स्थलांतर].
तारली (सार्डीन), हेरिंग व बांगडे (मॅकेरेल) यांचे मोठाले थवेही स्थलांतर करताना आढळले आहे. यांच्या हालचालींवरून हे स्थलांतर अन्नार्जन किंवा जनन याकरिता असावे असे वाटते.
माशाचे शरीर साधारणपणे लांबट, दोन्ही टोकांस निमुळते व प्रवाहरेखित म्हणजे पाण्यात फिरताना कमीतकमी प्रतिरोधी असे असते. माशाच्या शरीराचे मस्तक (डोके), धड व पुच्छ (शेपटी) असे तून भाग पडतात. पुच्छाच्या टोकास पुच्छपक्ष असतो. मस्तक किंवा डोक्याच्या पुढच्या टोकास जबडा, वर नासाद्वारांची (नाकपुड्यांची) जोडी आणि दोन्ही बाजूंस लकाकणारे पाणीदार डोळे असतात. डोक्याच्या पश्चभागी दोन्ही बाजूंस, वर प्रच्छद असलेले क्लोमकक्ष (कल्ल्यांचे कप्पे) असतात. या कक्षांत लालबुंद क्लोम असतात. यांच्याद्वारेच मासे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे शोषण करून श्वसन करतात. हे माशांचे वैशिष्ट्यपूर्ण इंद्रिय आहे [⟶ क्लोम]. प्रच्छदाच्या पश्च कडेपर्यंत डोक्याची लांबी मानली जाते. या दोन्ही क्लोमकक्षांच्या मध्यभागात शरीरांतर्गत हृदय असते. डोक्याच्या पुढच्या मध्यभागात हाडांच्या कवटीत लांबटसा मेंदू असतो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या मेंदूच्या कवटीस जोडून निरनिराळ्या मणक्यांचा बनलेला पृष्ठवंश (पाठीचा कणा) पुच्छभागापर्यंत जातो व त्यात असणाऱ्या मेरु नालेतून मेंदूपासून निघणारा मेरुरज्जू पुच्छापर्यंत जातो. प्रच्छदाच्या दोन्ही बाजूंस वरच्या भागात हाडांच्या बंदिस्त पोकळीत श्रवणेंद्रिये असतात. माशांना बाह्यकर्ण नसतो. त्यांच्या शरीरावर निरनिराळ्या भागांत पक्ष असतात. पाठीवर एक किंवा कधीकधी दोन पृष्ठपक्ष, खांद्याच्या भागात प्रत्येक बाजूस एक अशी अंसपक्षांची जोडी, खाली पोटाजवळ श्रोणिपक्षांची जोडी, धडाच्या शेवटी मध्यस्थ असा गुदपक्ष व पुच्छ भागात पुच्छपक्ष अशी ही निरनिराळ्या पक्षांची रचना असते. श्रोणिपक्षामागे अधर मध्यभागी गुदद्वार व जननरंध्र असते. धडाच्या देहगुहेत (शरीराच्या पोकळीत) जठर,आतडे वगैरे पचन तंत्राचे (पचन संस्थेचे) भाग, हृदय, यकृत, वृक्क (मूत्रपिंड), जनन ग्रंथी इ. शरीराचे महत्त्वाचे अवयव सामाविलेले असतात. पक्षांच्या सर्वसाधारण व्यवस्थेत दोन जोड्या व तीन एकाकी पक्ष अशी व्यवस्था असली, तरी काही माशांत पुच्छभागात पाठीवर आणखी एक कंटकविरहित मांसल पक्ष असतो. सामोनिडी (ट्राउट) व सिक्लिडी (टेट्रा) या कुलांत हे पक्ष पहावयास मिळतात.
प्रारूपिक (नमुनेदार) स्वरूपाचे पक्ष व त्यांची रचना वर दिली आहे; पण यांतही वरेच फरक आढळून येतात. सर्वसाधारणपणे पुष्कळ जातींत पाचही प्रकारचे पक्ष असले तरी बाम, अहीर यांसारख्या माशांत पृष्ठ, पुच्छ व गुद पक्ष हे स्वतंत्र नसून संलग्न असतात आणि तिन्हींचा मिळून एक अखंड पक्ष निर्माण झालेला असतो. काही माशांत श्रोणिपक्ष नसतात, तर काहींत ते पुढे सरकून अंसपक्षाच्या खाली येतात. गँव्यूझ किंवा होराइ क्थीस (मोतके) यांसारख्या माशात गुदपक्षाचे पहिले तीन अर (काटे) नराचे शुक्राणू मादीकडे फेकण्यासाठी उपयुक्त ठरतात व यामुळे या माशांत हा एक नवीन अवयव (जननभुजा) निर्माण झाला आहे.
निओस्टीअस (फ्लोस्टेथिडी) या दक्षिण अमेरिकेतील माशात याच
कामासाठी श्रोणिपक्षाचा व वक्षीय कमानीच्या एका भागाचा आकार संपूर्णपणे बदलून एक नवीन रचनेचा अवयव तयार झाला आहे.
पुच्छपक्षाचे निरनिराळ्या मत्स्य जातींत विविध आकार आढळतात. साध्या एका टोकाच्या शेपटीपासून, दोन टोकी, बोंबिलामधील तीन टोकी, लायरटेल मोलीमधील अर्धचंद्राकृती, असीपुच्छ (स्वोर्ड टेल) माशामधील तलवारीसारखी टोकदार, तर मुश्यांमधील कोयत्यासारखी वक्रचंद्राकृती अशा अगणित तऱ्हा आहेत. हौशी मत्स्यपालनातील प्रजनन प्रयोगात नवनव्या पुच्छपक्षाच्या तऱ्हा उत्पन्न केल्या जातात. या सर्व तऱ्हांचा अभ्यास केल्यावर असे आढळून येते की, कंकाल तंत्रावर आधारित अशा तीनच मूलभूत तऱ्हा आहेत. या म्हणजे समखंडित, विषमखंडित व अखंडित. बाह्यात्कारी फरक घडून इतर तऱ्हा या तीन तऱ् हांपासूनच निर्माण झाल्या आहेत.
पंख्यास किंवा छत्रीस मजबुती आणण्याकरिता जसा काड्यांचा सांगाडा केला जातो, तशीच योजना माशांच्या पक्षांतही असते. या काड्यांना पक्ष-अर असे म्हणतात. हे अर पक्षाच्या बुंध्यापर्यंत जाऊन तेथे मांसात उत्पन्न झालेल्या टेरिजिओफोर
नावाच्या पातळ हाडास स्नायूने जोडलेले असतात. या स्नायूमुळे या अरांची हालचाल सुलभ होते. हे अर अशाख किंवा शाखायुक्त असतात. हे टोकदार असून स्वसंरक्षणा साठी किंवा इतर प्राण्यांवर हल्ला करण्यासाठीही यांचा उपयोग केला जातो. माशांच्या काही जातींत या अरांना करवतीसारखे दात असतात. पुच्छपक्षातच नव्हे तर अंसपक्षात, श्रोणिपक्षात किंवा गुदपक्षातही असे अर असू शकतात. मांसल पक्षात मात्र ते आढळत नाहीत.
अंसपक्ष व श्रोणिपक्ष यांसाख्या युग्मित (जोडीने असणाऱ्या) पक्षांना क्रमविकास सिद्धांतात विशेष महत्त्व आहे. यापासूनच इतर प्रगत पृष्ठवंशी प्राण्यांत आढळणाऱ्या बाहू व पाद या युग्मित उपांगांचा विकास झाला असावा, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.
माशाच्या पक्षाच्या मुळाशी त्वचेत ज्या अस्थी निर्माण होतात, त्यांना त्वचाजन्य अस्थी म्हणतात. यामुळे पक्षांना बळकटी येते. शरीराच्या इतर भागात अशा अस्थी निर्माण झाल्या, तर त्यांना माशाचे काटे म्हणतात. मार्जारमीन कुलात या अस्थी आढळतात. मत्स्य वर्गाचे एक प्रमुख बाह्य लक्षण म्हणजे त्यांच्या अंगावर असलेले खवले होत. हे देखील त्वचेपासूनच तयार होतात.
(शल्क). बहुतेक माशांच्या अंगावर खवले असतात. शिवडा, शिंगाडा, शिंगटी, अहीर,वाम हे मासे यास अपवाद होत. सायप्रिनिडी कुलातील माशांच्या फक्त धडावर, ट्यूना माशाच्या फक्त छातीवर, वर मलळ माशाच्या सर्वांगावर खवले असतात. पुष्कळसे मासे बुळबुळीत तर घोडामासा, नळीमासा यांसारखे काही खडबडीत, बिनखवल्यांचे व किरकोळ शरीराचे असतात. त्यांचे शरीर खवल्यांऐवजी अस्थींनी आच्छादिलेले असते. लँप्री माशात खवले नसतात. काही पुरातन काळातील माशांच्या अंगावर खूप जाड अस्थिमय,चापट व कणा असलेले खवले होते. त्यांना आकाचक खवले म्हणतात. या प्रकारचे खवले सध्या अस्तित्वात असलेल्या स्टर्जन माशांच्या शरीरावर आढळतात. सध्या अस्तित्वात असलेल्या माशांवर अस्थिमय पण पातळ असे हलणारे, लवचिक, पानासारखे असे खवले असतात. या खवल्यांचा पुढचा भाग मागच्या खवल्याखाली असतो व मागचा लहान भाग उघडा असतो. त्यावरच अगदी पातळ अशी कातडी असते. ही रचना निरनिराळ्या माशांत निरनिराळी असते. यामुळे माशांना थोडा लवचिकपणा येतो. मार्जारमिनांना मात्र खवले नसतात.
त्यांच्या शरीराच्या काही भागांत, विशेषतः मस्तकाजवळ संलग्न अस्थिभाग दिसून येतो. मुशी या माशात दंताभ नावाचे अतिसूक्ष्म दंतुरित खवले असतात. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास त्यांच्यात दातासारखेच विभाग दिसतात. त्यांच्यावर व्हिट्रोडेंटिनाचा (काचदंतिनाचा) थर असतो, तर दशनाभ या खवल्यावर कॉस्मीन या पदार्थांचा थर असतो. कटला, रोहू घोळ, करकरा इ. माशांवरच्या खवल्यांस चक्राभ खवले म्हणतात. हे खवले वाटोळे असून त्यांची कडा पूर्ण झालेली असते. ज्या खवल्यांच्या कडा दंतूर असतात, त्यांना कंकताभ असे म्हणतात. असे खवले खजुरी (कोय), पिकू, बोय इ. माशांत पहावयास मिळतात. काही खवल्यांच्या उघड्या भागावर काट्यासारखा कणा वर आलेला असतो. यांना कंटकी खवले असे म्हणता येईल. असे खवले काटबांगडा, शितप (करँक्स) या प्रजातींच्या माशांत शेपटीच्या दोन्ही बाजूंस पहावयास मिळतात. माशांच्या व खवल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संबंधामुळे नुसत्या खवल्यांचा अभ्यास करून तो कोणत्या माशाचा आहे, हा ओळखता येते. खवल्यावर वर्तुळाकार रेषा असतात. यामुळे माशाच्या वयाचा अंदाज करता येतो. खवल्यांवरच्या काही रेषा जननरेषा म्हणून ओळखल्या जातात. काही माशांच्या खवल्यांचा व जीवनवृत्ताचा सखोल अभ्यास झाला आहे. खवल्यावरून माशाची जात, वय, लांबी व रुंदी, वजन व त्याचे किती वेळा प्रजनन झाले असावे याचा अंदाज घेता येतो. [⟶खवले].
त्वचेत सामावलेल्या रंगांच्या कोशिकांना वर्णलवक असे म्हणतात. वर्णलवकाच्या प्रसरणाने किंवा आकुंचनाने निरनिराळ्या रंगांच्या छटा उद्भवतात. काळ्या रंगांच्या
कोशिका (मेलॅनोफोर) चांदीच्या रंगाच्या चकाकणाऱ्या कोशिकेजवळ आल्याने दोन्ही रंगांचे परावर्तन होते व त्यांतून निळा व हिरवा रंग दिसू लागतो. काही कोशिकांत
(ग्वानोफोर) ग्वानिनाचे अणकुचीदार स्फटिक असतात. त्यांतून काही किरण परावर्तित होऊन तांबडा व पिवळा रंग दिसू लागतो. एरिथ्रोफोर व झँथोफोर या कोशिकाही रंगक्रियेत समाविष्ट असतात. रंगाच्या इतर छटा कोशिकांच्या संयुक्त क्रियेने व त्यांच्यावर पडणाऱ्या प्रकाशझोतामुळे उद्भवतात. या निरनिराळ्या रंगसंयोगांमुळे मत्स्य वर्गात विविध प्रकारची रंगसंगती आढळते. या रंगांच्या विविधतेचे निरनिराळे उपयोग आहेत. त्यांपैकी सभोवतालच्या परिस्थितीशी आपले रंग जुळवून घेऊन मोठ्या माशापासून अगर शत्रूपासून आपले संरक्षण करणे हा एक महत्त्वाचा उपयोग आहे. याला एक तऱ्हेचे मायावरण म्हणता येईल. यामुळे आपले भक्ष्य मिळविण्यासही मदत होते. काही रंग नर-मादीला परस्परांकडे आकर्षित करण्याकरिता उपयोगात आणले जातात. सर्वसाधारणपणे नर हा जास्त भडक रंगाचा व आकर्षक असतो. गपी, पिकू तसेच उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात आढळणारे डार्टर या माशांचे नर रंगीत व फार आकर्षक असतात. काही रंग एकमेकांची ओळख पटण्यासाठी तर काही भीती उत्पन्न करण्यासाठी असतात. लेप किंवा प्लेस माशांसारखे काहींचे रंग पाण्यातील रेतीच्या रंगाप्रमाणे बदलतात. त्यामुळे ते त्यांच्या शत्रूंना दिसत नाहीत. काहींचा रंग पाण्यातील शेवाळासारखा असतो. पोवळ्यांच्या बेटातील मासे पोवळ्याच्या रंगाचे असतात. सयामी फायटर (लढाऊ) मासा आपल्या पक्षांच्या रंगांत फेरफार करतो व मादीला जिंकण्याकरिता आपल्या प्रतिस्पर्ध्याशी लढतो. डॉक्टर मासा आपल्या विशिष्ट रंगाने मोठ्या माशास आपली ओळख पटवितो व त्याचे दात साफ करण्याचे आपले कार्य पुरे करतो. शरीराच्या आतील अवयवांत असलेले काही काळसर रंग त्या नाजूक इंद्रियांचे बाहेरच्या काही घातुक किरणांपासून रक्षण करतात, असे काही शास्त्रज्ञांना वाटते.
वर निदश केलेल्या प्रच्छदाच्या आत हा अवयव असतो. क्लोम सकृत्दर्शनी केस विंचरावयाच्या एकावर एक
ठेवलेल्या फण्यांच्या पुंजक्यासारखा व लालभडक रंगाचा दिसतो. माशांचे श्वसन हे क्लोमांचे महत्त्वाचे कार्य आहे. या फणीसारख्या क्लोमाच्या बुंध्यात आधारभूत असा क्लोमचाप असतो व त्याचा एक प्रसारित भाग म्हणून आतील बाजूला घशात डोकावणाऱ्या क्लोमकर्षणी असतात. या क्लोमकर्षणींचा आकार माशाच्या खाद्याच्या स्वरूपावर अवलंबून असतो. क्लोमचापाला घरूनच पुष्कळशा क्लोमपटलिका असतात आणि यांवरच अभिवाही व अपवाही रक्तवाहिन्या असतात.
या तंत्रामुळे शरीरास मजबुती येते. अस्थिमिनांच्या अंतर्गत सांगाड्यात मुख्यत्वेकरून मेंदूभोवतालचा अस्थिसंच, मणक्याची हाडे व शेपटाच्या बुध्यातील हाडे
यांचा समावेश होतो. मेंदूभोवतालच्या आद्य अस्थींवर द्वितीयक अस्थींचे आवरण असते. या दोन्ही प्रकारची हाडे मिळून मस्तकाचा सांगाडा होतो. या द्वितीयक अस्थिप्रकारात तोंडाच्या जवड्याची हाडे आणि पक्षांच्या बुंध्यांच्या आधारभूत त्वचाजन्य अस्थी यांचा समावेश होतो. शरीराच्या मांसल भागात त्वचाजन्य बारीक टोकदार अस्थीही (काटेही) असतात. या सर्व अस्थींमुळे माशांना आकार येतो. क्लोमचापाच्या खालच्या संयुक्त बुंध्याला जिभेचे हाड म्हणतात. माशांना मांसल अशी सुटी पुढे येणारी जीभ नसते. सायक्लोस्टोम व मुशी यांसारख्या उपास्थिमिनांत आंतरिक सांगाडा हाडांऐवजी उपास्थींचा असतो. काही पुरातन टेलिऑस्ट मत्स्य वंशांतही सांगाडा उपास्थिमय असतो आणि पुढे विकसित कुलांत तो अस्थिमय होतो. या सर्व फरकांना⇨ पुराजीवविज्ञानात फार महत्त्व आहे.
किंवा लहान माशांवरच आपली उपजीविका करतात. अशा माशांना बॅराकुडा माशात दिसणारे अणकुचीदार दात योग्य असतात. यांतील काही दात टाळूवर, तर काही क्लोमचापाच्या बुंध्यावर आढळतात. घशात असणाऱ्या दातांना ग्रसनी दात म्हणतात. हे क्लोमचापाच्या जाड झालेल्या भागावर आढळतात. यांच्यात देखील अन्नानुरूप फरक आढळतात. मुश्यांसारख्या उपास्थिमिनात जवड्यातील दात दंताभ स्ववल्यांच्या घर्तीवरच पण खूप जाड असे असतात. या दातांवर विकसित वर्गातील प्राण्यांच्या दातांप्रमाणे दंतवल्क व दंतिन असते [⟶ दात]. त्यांचे पुढचे दात झिजले, तर मागच्या रांगेतील पुढे येतात. काही मुश्यांच्या दाताचा एक भाग करवतीच्या पात्यासारखा दंतुर असतो व पाव कापावयाच्या सुरीप्रमाण मांस कापू शकतो. बागळीचे दात फरशीसारखे चापट, तर पिरान्हाचे धारदार असतात. पोपट माशाच्या धारदार जबड्यात प्रवाळाचे खडक फोडू शकतील असे कृंतक (पटाशीचे) दात असतात व त्या खडकाच्या तुकड्यांचा चुरा करण्यासीठी घशात
फरशीसारखे चापट ग्रसनी दात असतात. काही मार्जारमिनांचे दात खरवडण्यास योग्य असे असतात. खवळचोर नावाच्या माशाला जबड्याबाहेर असे दात असून त्यांनी तो दुसऱ्या माशाचे खवले ओरबडून खातो. शिवड्याच्या मुखात अणकुचीदार दात असतात. बोंबिलांचे दात बारीक व तीक्ष्ण असून टोकाजवळ वाकलेले असतात आणि त्यामुळे त्याचे भक्ष्य मुखातून निसटून जाऊ शकत नाही.
जबड्यानंतर मुखाची विस्तीर्ण पोकळी आढळते [आ. २ (आ)]. तिच्या पश्चभागी दोन्ही बाजूंस क्लोम-दरणे (क्लोमांतील फटी) असतात. हा भाग घशापर्यंत प्रसरणशील असतो. यानंतरच्या अन्नमार्गाच्या भागास ग्रसिका असे म्हणतात. ग्रसिकेच्या भित्ती प्रसरणशील असतात. मुखातील किंवा घशातील दाताने चावलेले अन्न या नलिकेत येते व नंतर येथून जठरात जाते. माशांच्या जठराचा आकार त्यांच्या अन्नावर अवलंबून असतो. प्राणिभक्षी माशांत ते थोडे फुगीर व नलिकासदृश असते. जठराच्या भित्तीत रस स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. या रसाने अन्नाचे पचन होते. जिताडा, मरळ, शिवडा या माशांत अशा आकाराचे जठर आढळते. स्टर्जन, गीझर्डशॅड, बोय यांसारख्या माशांत जाड गोळ्यासारखे स्नायुयुक्त जठर असते. त्याच्या आकुंचनामुळे क्रमसंकोच होतो व जठरातील अन्न आतड्यात पुढे सरकते. जठर व आतडे या दोहोंच्या संधिभागात यकृत व अग्निपिंड (स्वादुपिंड) यांमधून येणारे रस येऊन मिळतात व पचनक्रियेत भाग घेतात. यकृत हे विस्तृत आकारमानाचे, दोन खंडात विभालेले, किरमिजी रंगाचे इंद्रिय असते. यकृतातून स्रवणारा रस पित्ताशयात साठविला जातो व तेथुन तो एका स्वतंत्र नलिकेद्वारे जठर व आतडे यांच्या संधिभागात पचन तंत्रात ओतला जातो. अग्निपिंड कधीकधी यकृतास चिकटलेला किंवा आतड्याच्या आधारभूत ऊतकास (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहास) जोडलेला असतो. जठर व आतडे यांच्या संधिभागास जठरनिर्गमद्वार म्हणतात. या भागात एक स्नायुयुक्त झडप असते व अंधनालांचा (पिशवीसारख्या एका टोकास बंद असलेल्या नलिकाकार भागांचा) एक पुंजकाही येथे आढळतो [आ. २ (आ)]. या नालांतून कधीकधी पाचकरस स्रवतात, तर कधीकधी अन्नरसांचे शोषणही होते. यापुढील अन्नमार्ग पातळ भित्तीचा व पचवलेल्या अन्नाचे शोषण करणारा असतो. या भागातील अन्नमार्गाचो लांबी निरनिराळ्या माशांत निरनिराळी असते. प्राणिभक्षी माशांची आतडी लांबीला कमी, तर वनस्पतिभक्षी माशांची आतडी बरीच लांब असतात. रोहू, मृगळ यांच्या बाबतीत ती शरीराच्या लांबीच्या १०–१२ पट असते, तर खडशी किंवा महसीर माशांत ती ३-४ पट असते. महसीर हा मासा शेवाळ व जलीय वनस्पतींबरोबर मासेही खातो.
आतड्याचे मुख्य कार्य अन्नरसाचे शोषण हे आहे. जितके आतडे लांब तितके ते जास्त उपयुक्त ठरते. वनस्पतिजन्य अन्नात सेल्युलोजाचे प्रमाण जास्त असते व सेल्युलोजाच्या पचनास जास्त वेळ लागतो. आतडे लांब असले म्हणजे त्यात सेल्युलोजावर होणाम री प्रक्रिया पूर्ण होते व रूपांतरित अन्नरसाचे शोषण होते. मुशी, पाकट, कायमीरा, काँड्रोस्टीयन, होलोस्टीयन व काही प्राचीन टेलिऑस्ट या माशांत आतड्याची लां बी जरी कमी असली, तरी शोषणशील पृष्ठभाग वाढविण्यासाठी त्यांच्या आतड्याच्या आतील बाजूस सर्पिल झडप असते. या झडपेत खाचा असतात व त्यांतून अन्नरस वाहत असतात. अर्वाचीन टेलिऑस्टमध्ये हे काम आतड्यातील रसांकुर करतात. काही माशांच्या खाऱ्या-गोड्या पाण्यातील जीवनामुळे त्यांच्या आतड्यामध्ये होणाऱ्या तर्षण फरकांचे नियमन करणाऱ्या कोशिका असतात. आतड्यातील मलाचे उत्सर्जन गुदद्वारावाटे होते. डिप्नोई व मुशी यांची आतडी अवस्करात (ज्यात आतडे, युग्मक-वाहिन्या म्हणजे जननकोशिका वाहणाऱ्या वाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात असा शरीराच्या मागील टोकाकडे असलेल्या समाईक कोष्ठात) उत्सर्जन करतात आणि विष्ठा व मूत्र एकाच रंध्रातून बाहेर येतात.
ऑक्सिजन व कार्वन डाय-ऑक्साइड हे दोन्ही वायू थोड्याफार प्रमाणात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असतात. हा विरघळलेला ऑक्सिजन क्लोमावाटे रक्तात शोषून घेणे व रक्तात साठलेला कार्बन डाय-ऑक्साइड वायू त्याच मार्गाने बाहेर टाकणे हीच माशांची श्वसनक्रिया होय. क्लोमाचे वर्णन वर आले आहेच. चाप मुखाच्या पोकळीच्या मागे दोन्ही पार्श्वीय बाजूंस बसविलेले असतात व त्यांवर असंख्य क्लोमपटलिका असतात. या क्लोमपटलिकांस रक्ताचा भरपूर पुरवठा होत असतो. मुखात घेतलेले पाणी या क्लोमपटलिकांवरून वाहत जाऊन प्रच्छदाच्या मागील बाजूने बाहेर जाते. क्लोमपटलिकांचा या पाण्याशी संबंध आला म्हणजे त्यांच्यातील रक्तात असलेल्या तांबड्या कोशिका हीमोग्लोबिन या द्रव्याद्वारे पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेते व रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू बाहेर टाकला जातो. अस्थिमिनांत क्लोमांवर उघडझाप करणारे झाकण असते, याला प्रच्छद म्हणतात. सायक्लोस्टोम, मुशी व काही पुरातन मत्स्यकुलांतही क्लोम असतात; पण त्यांवर आवरण नसते. क्लोमाच्या लांबट छिद्रात आतील बाजूस एक त्वचेची झडप असते. इतर क्रिया मात्र अस्थिमिनांसारख्या असतात.
माशांच्या पोटात आतड्याच्या वरच्या बाजूस एक पांढरी लांबट हवेची पिशवी असते. तिला वाताशय म्हणतात [आ. २ (आ)]. काही माशांत हा वाताशय निरुंद अशा खोबणीने विभागलेला असतो. या वाताशयाची उत्पत्ती अन्ननलिकेपासून निघणाऱ्या अंधवर्धापासून (पिशवीसारख्या एका टोकास बंद असलेल्या वाढीपासून) झालेली असते.ॲकँथोप्टेरिजियनासारख्या अर्वाचीन माशांत या अंधवर्धाचा व अन्ननलिकेचा काही संबंध आढळून येत नाही. महसीरसारख्या काही माशांत या दोहोंचा सुताने जोडल्यासारख्या संबंध आढळून येतो. काही प्राचीन माशांत वाताशयाच्या आतील बाजूस रक्तवाहिन्या व सूक्ष्मकोशिकामिश्रित त्वचेची उत्पत्ती झाली. यातूनच पुढे वायवी श्वसनक्रियेला (पाण्याबाहेरील हवेचा सरळ उपयोग करणाऱ्या श्वसनक्रियेला) सुरुवात झाली असावी. याची परिणती लेपिडोसायरन व प्रोटॉप्टेरस यांसारख्या वायवी श्वसन करणाऱ्या माशांच्या उत्पत्तीत झाली असावी. या माशांचे वायवी श्वसनास इतके अनुकूलन झाले आहे की, त्यांना जर मोकळी हवा मिळाली नाही, तर ते मरतात. क्लोमांवाटे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेण्याची त्यांची क्षमता काही प्रमाणात नष्ट झालेली असते. काही मासे वाताशयाचा उपयोग जलस्थितिक (पाण्याचा दाव व समतोल यांच्याशी संबंधित असलेले) अंग म्हणून करतात. यामुळे माशाला पाण्याच्या दाबाशी अनुकूलन करता येते. पाण्याच्या आवश्यक त्या खोलीत राहण्यासाठी वाताशयातील वायूचे प्रमाण कमीजास्त करावे लागते. हे काम वाताशयातील अंतस्त्वचेच्या कोशिका करतात. हा वायू बहुधा ऑक्सिजनच असतो आणि तो कमी करावयाचा असल्यास भोवतालच्या रक्तवाहिन्यांत त्याचे शोषण होते. या वाताशयाचा क्रमविकास फुप्फुसात झाला असावा, असे अनुमान करण्यात आले आहे. काही मासे (उदा., सायप्रिनिफॉर्मीस गणातील) वाताशयाचा उपयोग ध्वनिग्रहणाच्या कार्यात, तर काही (उदा., स्किईनिडी कुलातील) ध्वनिनिर्मितीच्या कामीही करतात.या तंत्रातील मुख्य घटक म्हणजे हृदय, रोहिण्या, नीला आणि केशिका हे होत. केशिका अत्यंत सूक्ष्म असून शरीरात सर्वत्र पसरलेल्या असतात. त्यांची भित्ती अत्यंत पातळ असल्यामुळे त्यांतून पोषकद्रव्ये, हॉर्मोने (वाहिनीविहीन ग्रंथींचे एकदम रक्तात मिसळणारे उत्तेजक स्राव),तसेच ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड या वायूंची रक्तात देवाणघेवाण होत असते. क्लोमपटलिकांतील केशिका वायूची देवाणघेवाण करण्यात फार कार्यक्षम असतात. या तंत्रातील केंद्रीय घटक हृदय हा होय. भ्रूणावस्थेत ते एका वाकविलेल्या माहरोहिणीपासून तयार होते. भ्रूणविकासात या महारोहिणीच्या भित्ती जाड स्नायुयुक्त बनतात व शेवटी तीन किंवा चार कप्प्यांचा हा अवयव तयार होतो. हृदयाच्या तालबद्ध प्रसरण व आकुंचनामुळे महानीलेत आलेले अशुद्ध रक्त नीलाकुहरातून अलिंदात (अशुद्ध रक्ताच्या कप्प्यात) जमा होते. तेथून ते निलय (शुद्ध रक्ताचा कप्पा) या स्नायुयुक्त कप्प्यात येते. या कप्प्यातून पुढे रक्त महारोहिणीशंकू या कप्प्यात येते. हा कप्पा नीलाकुहरापेक्षा जास्त स्नायुयुक्त असतो. या कप्प्याच्या आकुंचनाने रक्त पुढे महारोहिणीत शिरते. या निरनिराळ्या कप्प्यांत अशा झडपा असतात की, महानीलेपासून रक्ताचा प्रवाह एका दिशेने पुढे सरकत असतो. महारोहिणीत रक्त आल्यानंतर क्लोमात जाण्यासाठी दोन्ही बाजूंना अभिवाही फाटे फुटतात व हे फाटे क्लोमचापावर जाऊन तेथे रुधिरकेशिकांत विभागतात. या रुधिरकेशिका क्लोमपटलिकांत विसावतात. तेथे रक्तातील हीमोग्लोबिन पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेते. रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड व इतर उत्सर्ग द्रव्ये (निरुपयोगी द्रव्ये) पाण्यात सोडून दिली जातात. हे काम झाल्यावर शुद्ध रक्त रुधिरकेशिकांद्वारे चार किंवा पाच अपवाही रोहिण्यांत जाते व तेथून ते पृष्ठमहारोहिणीत नेले जाते. या रोहिणीतून डोक्यास व शरीराच्या इतर भागांत शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. रोहिणीचे अंतम विभाजन केशिकांत होते. या केशिका इंद्रियांत विखुरलेल्या असतात. रक्तातील पोषक द्रव्ये, हॉर्मोन, ऑक्सिजन वगैरे इंद्रियांत मिळाल्यावर कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त रक्त नव्या केशिकांत जाते. या केशिका एकमेकींस मिळतात. महानीलेतले अशुद्ध रक्त हृदयात येते. अशा रीतीने मत्स्य वर्गातील प्राण्यांचे रक्ताभिसरण होते. इतर पृष्ठवंशी हृदयातील अशुद्ध रक्त फुप्फुसात जाऊन शुद्ध झाल्यावर परत हृदयात येते व तेथून ते इतर इंद्रियांकडे जाते. माशांच्या बाबतीत मात्र क्लोमांत शुद्ध झालेले रक्त हृदयात परत न येता परस्पर इंद्रियांकडे जाते.
या क्रियेचे मुख्य इंद्रिय वृक्क (मूत्रपिंड) हे होय. ते लांबट आकाराचे, तांबूस किंवा किरमिजी रंगाचे असते. हे इंद्रिय देहगुहेच्या वरच्या भागात मणक्यांच्या खाली चिकटलेले असते. वृक्के दोन असतात. त्यांपैकी एक उजव्या बाजूस व दुसरे डाव्या बाजूस असते. वृक्कांतील उत्सर्ग द्रव्य नलिकेद्वारे बाहेर टाकले जाते. दोन्ही बाजूंच्या नलिका एका मूत्राशयात येऊन ते मूत्र छिद्रावाटे बाहेर फेकले जाते. काही माशांत उत्सर्जनाचे कार्य थोड्या प्रमाणात आतडी, त्वचा व क्लोम हे अवयवही करीत असतात. विशेषतः क्लोमांमधून अमोनियासारखी काही उत्सर्ग द्रव्ये बाहेर टाकली जातात. मासे नेहमीच गोड्या किंवा खार्याव पाण्यात राहत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त आंतरिक पर्यावरण म्हणजे शरीरातील द्रव पदार्थ व बाह्य पर्यावरण म्हणजे पाणी यांत तर्शण दाबाच्या [⟶ तर्षण] दृष्टीने समतोल राखणे आवश्यक असते आणि हे बिकट काम वृक्कांतील कोशिका व त्याचबरोबर क्लोमपटलिका व त्वचा करीत असतात. खार्यार पाण्यातील लवणांचे प्रमाण (संहती) माशातील द्रव पदार्थात किंवा रक्ताच्या द्रवात असलेल्या लवणांच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. अशा स्थितीत तर्षणामुळे शरीरातील द्रव बाहेर जाऊ न देता जीवन कंठाचे लागते. गोड्या पाण्यात लवणांचे प्रमाण शरीरातील द्रव पदार्थातील लवणांपेक्षा कमी असते. अशा माशांत आत आलेले जास्त पाणी वृक्काच्या कोशिका इतर उत्सर्ग द्रव्याबरोबर बाहेर टाकीत असतात. सामन, पाला यांसारखे मासे समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात प्रजोत्पादनासाठी येतात; तसेच यूरोपियन वाम गोड्या पाण्यातून खाऱअया पाण्यात जाते. या दोन्ही प्रकारच्या माशांत तर्षण नियमन करून शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे नियमन करावे लागते. हे करण्यास वृक्काबरोबरच क्लोमपटलिकांतील काही कोशिका,आतड्यातील काही कोशिका व त्वचा यांचाही उपयोग केला जातो. मुशी, पाकट यांसारख्या माशांत रक्तात साठविलेल्या युरियाचा तर्षण दाब समतोल साधण्यासाठी उपयोग केला जातो. यामुळेच गोड्या पाण्यातील काही मुशी किंवा पाकट यांच्या रक्तात यूरियाचे प्रमाण समुद्रातील माशापेक्षा पुष्कळ कमी असते.
(वाहिनीविहीन ग्रंथी). या ग्रंथींना वाहिनीनलिका नसल्यामुळे त्या आपले स्राव रुधिरकेशिकांत सोडतात. तेथे रक्तात मिसळलेल हे स्राव रक्तप्रवाहाद्वार शरीरातील इतर भागांत जातात. ह्या स्रावातील द्रव्ये शरीराच्या विविध क्रिया-प्रक्रियांचे नियमन करतात. सायक्लोस्टोम माशात या ग्रंथींचे कार्य पुष्कळ विस्तृत असते. ⇨पोप ग्रंथी, ⇨अपटू ग्रंथी, ⇨अधिवृक्क ग्रंथी, ⇨अग्निपिंड व ⇨जनन ग्रंथी या मुख्य अंतःस्रावी ग्रंथी होत. यांशिवाय आतड्यातील व क्लोमचापावरील विशिष्ट ग्रंथींपासूनही अंतःस्राव होतो. शरीराची वाढ, जननक्रिया, तर्षण नियमन, अन्नपचन, वसा (स्निग्ध पदार्थ) उत्पादन, रक्तदान व कातडीचा रंग या सर्वांचे नियमन अंतःस्रावांद्वारे व मेंदूतील संवेदनशक्तीच्या आधारे होत असते. या ग्रंथी शरीरात एकमेकींपासून दूर अंतरावर असल्या, तरी त्यांच्या क्रियांचे सुसूत्रीकरण मेंदूकडून केले जाते. पोष ग्रंथीचा उपयोग अलीकडे खाद्य माशांचे प्रजनन (पैदास) वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला आहे. [⟶ अंतःस्रावी ग्रंथी].
(मज्जासंस्था). शरीराच्या सर्व संवेदनांचे व हालचालींचे नियमन या तंत्राद्वारे होते. या तंत्राचे मुख्य केंद्र मेंदू हे होय. मेंदूच्या पश्चभागापासून पुच्छभागापर्यंत जाणाऱ्या रज्जूस मेरुरज्जू या दोहोंचे मिलून केंद्रिय तंत्रिका तंत्र बनते. मेंदूपासून निघणाऱ्या तंत्रिका व मेरुरज्जूपासून निघणाऱ्या तंत्रिकांचे मिळून परिसरीय तंत्रिका तंत्र बनते. स्वायत्त तंत्रिका तंत्रात अनुकंपी व परानुकंपी तंत्रिकांचा समावेश होते [⟶ तंत्रिका तंत्र]. आजूबाजूच्या वातावरणातील उद्दीपनांचे आकलन होण्याकरिता इतर पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे माशासही ज्ञानेंद्रिये असतात व ही तंत्रिकांशी संलग्न असतात. डोळे, कान, नाक, मुखगुहा (तोंडाची पोकळी) व त्वचा ही मुख्य ज्ञानेंद्रिये होत. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या तंत्रिका तंत्रात आढळणारा आकृतिबंध (आराखडा) स्थूलमानाने माशांतही आढळतो.
स्पर्श,तापमान व वेदना : स्पर्शाची जाणीव करून देणारे तंत्रिकातंतू माशाच्या पृष्ठभागावर त्वचेखाली सर्व शरीरावर पसरलेल असतात.तापमानाचे तंत्रिकातंतूही असेच सर्व शरीराच्या पृष्ठभागावर असतात व ते ०.०३० से. इतका उष्णतेतील अतिसूक्ष्म फरकही जाणू शकतात. माशाच वेदनेची कितपत जाणीव होते, याबाबतीत विशेष निर्णायक माहिती उपलब्ध नाही; पण त्यांना जखम केली असता तीव्र प्रतिक्रिया आढळून येतात.
थोडे उभयचर वर्गातील प्राणी सोडल्यास ही रेखा फक्त मत्स्य वर्गातील प्राण्यांतच आढळते. त्वचेखाली असलेल्या काही संवेदनक्षम कोशिका असलेल्या नलिकांची ही रेखा बनलेली असते. या नलिका डोळ्यांच्या हाडाभोवताली जबड्याखालून डोक्याच्या हाडावरून शरीराच्या दोन्ही बाजूंनी थेट शवटापर्यंत जाते. शरीराच्या बाजूवरून जाताना त्या खवल्यांच्या मध्यरांगेशी जोडलेल्या असतात. त्यांच्यावर मधूनमधून संवेदनक्षम अशी रंध्रे असतात. या सर्व तंत्रामुळे माशांना पाण्याच्या दाबाची व त्यातील निरनिराळ्या प्रवाहांची कल्पना येते. या इंद्रियामुळेच माशांचा थवा एकाच वेळी आपली स्थलांतराची दिशा बदलतो. सर्व मासे शिस्तीने जातात. उपास्थिमिनांत लोरेझीनी कुंभिका, पुटिका इ. आणखी काही संवेदनक्षम कोशिका-पुंज असतात. [⟶ पार्श्विक रेखा].
इलेक्ट्रोफोरस, टॉर्पेडो, मलाप्टेरस यांसारख्या माशांत कमी दाबाचा विद्युत् प्रवाह उत्पन्न करण्याची शक्ती असते. त्यांच्या विद्युत् आकलकामुळे त्यांना शत्रूची चाहूल किंवा अन्नाची संभवता याचे आकलन होते. [⟶विद्युत् अंगे].
सर्वसाधारणपणे मासे अंडी घालतात व या अंड्यांपासून निषेचनानंतर नवीन माशांची उत्पत्ती होते. यावरून मासे हे अंडज प्राणी आहेत हे स्पष्ट होते; पण या सर्वसाधारण लक्षणा त काही जातींचे मासे अपवाद आहेत. पिसीलिडी कुलातील गँब्यूझ, गपी वगैरे, बाघवीरसारख्या मुश्यांच्या जाती, ईल, पाऊट यांसारखे व्लेनी मासे व हिस्टेरोकार्पस यांसारखे पर्च मासे हे अंडी न घालता पिलांना जन्म देतात. यांना जरायुज प्राणी म्हणतात. अंडी पाण्यातच सोडली जातात. पुष्कळदा ती असहाय्यपणे पाण्यात तरंगतात.काही जातींत अंडी पाण्याच्या तळास किंवा शेवाळास चिकटविली जातात. या सर्वसाधारण अंडी घालण्याच्या प्रकारात नर अगर मादी अंड्याचे रक्षण करण्यास थांबत नाहीत. या प्रकारात नैसर्गिक आपत्तीमुळे बरीच अंडी नाश पावतात. यावर उपाय म्हणून की काय निसर्गाने मादीस खूप अंडी घालण्याची क्षमता दिली आहे. परिणामतः पुढील पिढीस जरूर तेवढी अंडी शिल्लक राहतात. भारतातील पाला ह्या माशाची मादी एका वेळी २० लाख अंडी घालू शकते. अटलांटिक महासागरातील लिंग (मोलवा) हा मासा सु. १५५ सेंमी. लांबीचा असताना २.८ कोटी, तर ९.५० किग्रॅ. वजनाचा कॉड मासा ६६.५ लक्ष अंडी घालतो. इतक्या मोठ्या प्रजननक्षमतेमुळे या माशांची कितीही प्रमाणात मासेमारीत हानी झाली, तरी त्यांची संख्या घटत नाही. जरायुज माशात मात्र प्रजननास मर्यादा असते. अंड्याची वाढ मादीच्या शरीरात होत असल्यामुळे त्यांची संख्या शरीरात मावू शकेल इतकीच मर्यादित असते. पिले शरीरात वाढत असल्यामुळे शत्रूपासून व नैसर्गिक आपत्तीपासून त्यांचे संरक्षण होते. पिलांची संख्या कमी असली, तरी उपजताच ती हालचाल करू लागतात व थोड्या काळात स्वतंत्र जीवन जगू लागतात व नवी पिढी निर्माण होते.
काही अपवाद सोडल्यास मासा हा एकलिंगी प्राणी आहे. बहुतांश माशांत नर व मादी यांच्या शरीररचनेत फारसा फरक दिसत नाही. ह्यांना बाह्य जननेंद्रिये नसतात. प्रजननाच्या वेळी मादीच्या पोटाचे आकारमान मोठे होते. पिसी लिडी कुलातील माशांत नर मादीपेक्षा आकारमानाने लहान असतो व त्याला जननभुजा असते. ही जननभुजा गुदपक्षाच्या दोन-तीन अरांपासून झालेली असते. होराइक्थीस माशातही नर या प्रकारचा असतो. कटला, रोहू इ. कार्प जातीच्या माशांत नर व मादीत बाह्यात्कारी विशेष फरक नसला, तरी नराचा अंसपक्ष थोडा जास्त लांब असतो व प्रजननाच्या काळात या असंपक्षावर व गालफटावर खरखरीतपणा येतो. इंडियन ट्राउट [बॅरिलियस बोला (धगार)] याच्या पश्च शरीराच्या दोन्ही बाजूंच्या खवल्यांवर टोकदार मुखरी असते. तीमुळे या पृष्टभागास खरखरीतपणा येतो. कोळशी (पुंटीयस कोला) या माशातील नराच्या गालफटावर असलेल्या मुखऱ्यांचा पुंजका इतका धारदार असतो की, त्यावरून हात फिरविल्यास तो कापण्याचा संभव असतो. मुशी, पाकट वगैरेंसारख्या उपास्थिमिनांत नराला आलिंगक (श्रोणिपक्षाच्या रूपांतरणाने तयार झालेली व मैथुनाच्या वेळी उपयोगी पडणारी दंडासारखी उपांगे) असतात. प्लोस्टेथिडी कुलातील प्रियापियम माशात नराच्या स्कंधाच्या अस्थिमेखलेचा एक भाग वा श्रोणिपक्ष यांच्या संयोगाने गळ्याखालीच एक जटिल बाह्य आलिंगकासारखा नवीनच अवयव पहावयास मिळतो. जलजीवालयात वापरण्यात येणाऱ्या एंजल, सयामी फायटर वगैरे जातींतील नर त्यांच्या लांब व विशिष्ट तऱ्हेच्या पक्षांवरून ओळखले जातात.
नराच्या देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस लांबटगोल असे दोन वृषण (पुं-जनन ग्रंथी) असतात. यांत शुक्राणू तयार होतात.प्रत्येक वृषणास नलिका असतात. यांतून शुक्राणूंचे वहन होते. दोन्ही बाजूंच्या शुक्रनलिका एकत्र येऊन त्यातील रेत एकाच छिद्राद्वारे बाहेर फेकले जाते. जरायुज माशांत हे रेत आलिंगक, जननभुजा अशा विशिष्ट अवयवांच्या मदतीने मादीच्या योनिमार्गात सोडले जाते. आलिंगकांची जोडी असून प्रत्येक आलिंगक श्रोणिपक्षाच्या रचनेचे रूपांतर झाल्यामुळे तयार होतो. त्याचा आकार वर्तुळाकार छेदाचा, बोरूसारखा असतो. जननभुजा गुदपक्षाच्या पहिल्या तीन किंवा चार अरांपासून बनलेली असते. गँब्यूझमध्ये पहिले तीन अर जाड व लांब होऊन जननभुजा बनते [आ. ४ (आ)]. होराइक्थीसमध्ये अरांत खूपच रूपांतर होऊन जटिल स्वरूपाची जननभुजा तयार होते. या माशांत शुक्राणूंचे पुंजके तयार होतात व मीलनाच्या वेळी हे पुंजके मादीच्या जननेंद्रियावर फेकले जातात. तेथे ते चिकटतात व यथाकाल त्यांतून शुक्राणू बाहेर पडून मादीच्या अंडनलिकेत शिरतात.
----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
खाण्याकरिताही त्याचा उपयोग करतात
मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील...
डिप्नोई गणातील माशांना फुप्फुसमीन म्हणतात.
अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या...