मासा हा एक आहारातील प्रमुख घटक आहे. माशांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना खूप मागणी आहे. समुद्रातल्या मासालीपेक्षा गोड्या पाण्यातल्या मासळीला चव असते. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे.
त्यामुळे या गोड्या पाण्यातला मत्स्यशेतीकडं वळलं पाहिजे.खेड्याखेड्यांत पाझर तलाव, गावतळी, सामुदायिक शेततळी, वैयक्तिक विहिरी, नदीनाल्याचे डोहं, पात्र, लहान – मोठे जलाशय दगडाच्या खाणी – भातशेती इ. ठिकाणच्या पाण्यात माशांची शास्त्रोक्त पद्धतीनं पैदास करता येते. अनेक जण ही शेती सुरु करून चांगले पैसे मिळवतायत. उपलब्ध पाणीसाठ्यात योग्य जातीचे मासे योग्य प्रमाणात सोडून त्यांची जलद वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून कमी वेळात जास्त माशाची पैदास करणं याला गोड्या पाण्यातील मत्स्यशेती म्हणतात.
गोड्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनस या पाण्याचा तळ धरून वाढतात.
या जाती एकमेकाला त्रासदायक नाहीत. त्यामुळे या जातींची बोटुकलं एकाच पाणीसाठ्यात वाढवू शकतो.
शासनाच्या मत्स्यबीज विकास यंत्रणेकडून आपल्याला माशांच्या मत्स्यबीजांचा (२० मी. मी.) अगर मत्स्यबोटूकली (५० मी. मी.) यांचा पुरवठा होऊ शकतो. शक्यतो जून – जुलैमध्ये मत्स्यबीज पुरवली जातात.
पाझर तलाव, गावतळी भाडेतत्त्वावर घेऊन मत्स्यपालन करू शकतो. वैयक्तिक विहिरीत मासे पाळू नयेत असा गैरसमज पसरला आहे. ही पूर्णतः अंधश्रद्धा आहे. विहिरीतही मर्यादित स्वरुपात मासे पाळून कुटुंबाची गरज भागवावी. १०० – १५० मासे विहीरीतल्या पाण्यात पाळण्यास काहीच हरकत नाही. अलीकडं शेततळी मोठ्या प्रमाणात काढली जातात. अशा शेततळ्यात मत्स्यपालन जरूर करावं. भातशेतीत मत्स्य्पालनाला खूप वाव आहे. पाण्याची आम्लता निर्देशांक ६.५ ते ७.५ यादरम्यान असल्यास मासे चांगले वाढतात. यासाठी पानिसाठ्यानुसार चुना त्या पाण्यात टाकावा..
पाण्याची नैसर्गिक उत्पादकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खत म्हणून प्रमाणात ताजे शेण टाकावे. त्यानंतर अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट प्रमाणात टाकावे आणि मग त्यानंतर बोटुकली सोडावीत. त्यानंतर दर महिन्याला शेणखत, अमोनियम सल्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट प्रमाणात टाकीत राहावं. अर्थात या नैसर्गिक अन्नावर अवलंबून न राहता पूरक खाद्य द्यावं. शेंगदाणा पेंड, तांदळाची कणी, गव्हाचा कोंडा याचं मिश्रण पूरक खाद्य म्हणून वापरावे.
माशाच्या ३ जाती पाणीसाठ्यात सोडल्या असतील, तर पहिली तिमाही २ किलो, दुसरी ५ किलो, तिसरी ८ किलो आणि चौथ्या तिमाहीत १० किलो याप्रमाणे पूरक खाद्य द्यावे. हे पूरक खाद्य रोज एकाच ठिकाणी टाकावं, म्हणजे त्या ठिकाणी माशांना सवय लागते. या पूरक खाद्याचे गोळे करून टाकावेत. गडद हिरवे शेवाळे वाढले तर ते खाद्य म्हणून उपयोगी पडते.
पाणीसाठ्याची मर्यादा बघून बोटुकली सोडावीत. साधारणतः कटला, राहू आणि मृगळ या तीन जातींची बोटुकली ५ एकराच्या पाणीसाठ्यात ३८०० च्या दरम्यान टाकावीत. तर कटला, राहू, मृगळ आणि सायप्रिनस या चार जातींची मिळून ४००० बोटुकली (आरोग्यदायी) सोडावीत. जास्त बोटुकली सोडली तर अन्नासाठी आणि प्राणवायूसाठी स्पर्धा होऊन वाढ खुंटते अगर मरतूक होते म्हणून प्रमाणात बोटुकली सोडावीत.
चांगलं व्यवस्थापन ठेवल्यास १२ महिन्यांत १ किलो वजनाचे मासे तयार होतात. १ किलोचे मासे पकडून विक्रीसाठी पाठवावेत.
साधारणतः ५ एकर पाणीसाठ्यात वर्षाकाठी ३००० किलो अगर त्याहूनही जास्त मासे मिळू शकतात. दरभाव चांगला असल्याने पैसेही चांगले मिळतात.
कोणत्याही पाणीसाठ्याचा वापर पीक उत्पादनासाठी केला जातो. त्याचबरोबर त्यात मत्स्यपालन म्हणजेच मत्स्यशेती केल्यास बोनस उत्पादन मिळू शकतं. म्हणून प्रत्येकानं आपल्या विहिरीत, शेततळ्यात अगर ठिकाणच्या पाणीसाठ्यात मत्स्यशेती करावी.
खाण्यासाठी मासे पाळावेत तसेच पैसे मिळवण्यासाठी मासे पाळावेत.
स्त्रोत - कृषी प्रवचने
अंतिम सुधारित : 6/5/2020
उद्देश व स्वरुप : आदिवासी क्षेत्रात मोठे व मध्यम ...
ज्या समुद्राकडून सतत काहीतरी घेतले जाते, त्या समुद...
माशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील मा...
मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसाया...