महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर दीर्घ समुद्रकिनाऱ्यावर पापलेट, बांगडा, सुरमई, बळा, म्हाकूळ, कोळंबी अशा खास मासळीची पैदास होते. सागरी कोळंबी निर्यातक्षम आहे; मात्र गेल्या काही वर्षांत उत्पादन काहीसे स्थिरावले आहे. 1997 ते 2006 या दहा वर्षांत कोळंबीचे वार्षिक उत्पादन एक लाख टनांच्या आसपास झाले. काही वर्षी ते वार्षिक 94 हजार टनांपर्यंत घसरले आहे. फार मोठ्या प्रमाणावर कोळंबी पकडली जात असल्याने ही स्थिती अशीच राहिली, तर उत्पादनात आणखी घट होण्याचीच शक्यता आहे.
समुद्राकडून आपण केवळ "घेत' असतो, समुद्राला "देत' मात्र काहीही नाही. भरभरून देणाऱ्या समुद्राला आपणही काहीतरी दिले, तर त्या बदल्यात आपल्याला उदंड मत्स्यसंपत्ती मिळू शकते. त्यासाठीच रत्नागिरीच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राने स मुद्राला टायगर कोळंबीच्या बीजांचे "दान' करण्याचे निश्चित केले. कोकण कृषी विद्यापीठाच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातर्फे राष्ट्रीय केंद्रीय महाबीज प्रकल्पातून कोळंबीचे दर्जेदार बीज तयार होते. वाडीमिऱ्या येथे हे निर्मितीकेंद्र आहे. तेथे तयार झालेल्या मत्स्यबीजांचेच "रोपण' करण्यात आले.
मत्स्यबीजारोपणाचे तुरळक प्रयत्न जगात अनेक ठिकाणी झाले. 1870 पासून युरोपात सालमन मासळीचे बीजरोपण केले जाते. जपानमध्ये फार मोठ्या प्रमाणावर 1975 पासून, कुरुमा-कोळ ंबीचे बीजारोपण होते. सातत्याने दरवर्षी केलेल्या बीजारोपणामुळे जपानमधील कोळंबी उत्पादनात वाढ झाली.
भारतात सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मत्स्यमहर्षी डॉ. पी. व्ही. राव यांच्या मार्गदर्शनाखाली 1985 ते 1992 या काळात मंडपम (तमिळनाडू) येथे कोळंबीचे बीजारोपण झाले.
तमिळनाडूत मोत्याच्या शिंपल्यांचे, केरळमधील अष्टमुंडी झीलमध्ये मुळ्यांचे आणि केरळमध्ये टायगर कोळंबी बीजारोपणाचे प्रयत्न झाले आहेत.
बीजोत्पादन केंद्रात कोळंबीचे बीज उत्पादित करून ते खाड्यांमध्ये सोडणे यालाच रॅंचिंग किंवा मत्स्य बीजारोपण असे म्हणतात. जमिनीवर वृक्षांची संख्या वाढावी यासाठी जशी रोपे लावली जातात, त्याच पद्धतीने समुद्रातील मासळीची संख्या वाढावी, म्हणून मासळीचे बीजारोपण केले जाते.
सातत्याने व मोठ्या प्रमाणात बीजारोपण केल्यास कोळंबीची नैसर्गिक संख्या वाढल्यामुळे दर्जे दार कोळंबीचे उत्पादन वाढते. ही कोळंबी बीज निर्माण करण्याकरिता अतिशय आवश्यक आहे. खाऱ्या, निमखाऱ्या पाण्यात कोळंबी शेती केली जात असली, तरी त्याकरिता मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक, बीजखाद्य, मजुरी, वीज इत्यादी सर्व प्रचंड खर्च होतात. समुद्रात बीजारोपण केल्यास कोळंबी नैसर्गिक वातावरणात तेथील नैसर्गिक खाद्य खाऊन वाढते, त्यामुळे कोणताही खर्च येत नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसाया...
योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्ध...
मासा हा एक आहारातील प्रमुख घटक आहे. माशांच्या प्र...
उद्देश व स्वरुप : आदिवासी क्षेत्रात मोठे व मध्यम ...