सर्व प्रकारच्या लागणी उसाच्या जोमदार वाढीच्या काही अवस्था पावसाळी हंगामामध्ये येतात. मात्र, या काळातील वातावरण जोमदार वाढीसाठी अनुकूल नसते. तेव्हा अधिक काळजीपूर्वक व्यवस्थापन केल्यास वाढ चांगली मिळवता येईल. ऊस पिकास जोमदार वाढीची अवस्था ही लागणीपासून १२० ते २४० दिवसांपर्यंत पूर्वहंगामी व सुरू उसाची असते, तर आडसाली उसात ही अवस्था १२० ते २८० दिवसांपर्यंत असते. या कालावधीत उसाची झपाट्याने वाढ होत असते. या जोमदार वाढीच्या संपूर्ण काळात ऊस हे कार्बन - ४ गटांत मोडत असल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश, निरभ्र आकाश, तापमान २८ ते ३५ अंश सें.ग्रे., आर्द्रता ६५ ते ८०% असे वातावरणात त्याची आदर्श वाढ होत असते.
सर्वसाधारणपणे ऊस पिकाची ८ ते १० पाने उभट, रुंद आणि गर्द हिरव्या रंगाची असणे वाढीसाठी पोषक असते. तसेच जोमदार वाढीच्या कालावधीत प्रत्येक महिन्याला दीड ते दोन कांडीची वाढ आवश्यक असते. परंतु, या जोमदार वाढीचा काही कालावधी हा पावसाळी हंगामात येतो. या काळात ढगाळ हवामान, अंधूक सूर्यप्रकाश, तापमान २५ ते ३२ अंश सेल्सिअस, आर्द्रता ८० टक्के पेक्षा जास्त असते. या वातावरणात उसाची वाढ मंदावते. त्यामुळे पावसाळी हंगामात ऊस पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते.लावणी हंगामानुसार सध्या शेतामध्ये ऊसवाढीच्या कालावधीनुसार जोमदार वाढीच्या अवस्थेत असेल. हंगाम---- पूर्वहंगामी ---- सुरू ---- आडसाली ---- खोडवा लागवड काळ ---- ऑक्टोबर ते नोव्हेंबर ---- जानेवारी ते फेब्रुवारी ---- जुलै ते ऑगस्ट ---- लागण तोडणी नोव्हेंबर ते एप्रिल पीक कालावधी ---- ८-९ महिने ---- ६-७ महिने ---- ११ ते १२ महिने ---- ४ ते ८ महिने
१) पावसाळी हंगामास सुरवात होण्यापूर्वी पिकास रासायनिक खतांचा नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये खताचा शिफारशीत मात्रा देऊन ऊसपिकाची बांधणी/भरणी करून घ्यावी.
२) महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण भागात उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता असते, अशा ठिकाणी उपलब्ध पाण्यानुसार बांधणीच्या वेळी द्यावयाची खत मात्रा २० ते ५० टक्के कमी करावी. पावसास सुरवात झाल्यावर उर्वरित रासायनिक खतमात्रा पहारीच्या साह्याने द्यावी.
३) उसाची खालच्या भागातील वाळलेली/पिवळी पडलेली अकार्यक्षम पाने/ पाला काढून तो सरीमध्ये टाकावा. हा पाला जमिनीवर आच्छादन म्हणून काम करतो. तण नियंत्रणास मदत होते. तसेच उसामधील तणेही बी येण्यापूर्वी कापून सरीमध्येच टाकावे.
४) पाचट आच्छादन केलेल्या उसामध्ये पावसात खंड पडल्यास किंवा उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याकरीत एक आड एक सरी पद्धतीने पाणी द्यावे.
५) पश्चिम महाराष्ट्रातील अतिपर्जन्यमान असलेल्या भागात पिकात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा लवकर करावा. त्यामुळे मुळे कार्यक्षम राहतात.
६) मोठ्या उसामध्ये सलग सरी पद्धतीत ४ ते ५ सरीनंतर ऊस दाबून घेऊन भांगा पाडाव्यात. त्यामुळे ऊस पिकात हवा खेळती राहून आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. पानावरील तांबेरा, तपकिरी ठिपके इ. रोग तसेच लोकरी मावा, पिठ्या ढेकूण इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते.
७) जमिनीची खोली कमी असलेल्या ठिकाणी अतिपावसाने ऊसपीक लोळण्याचा संभव असतो. अशा ठिकाणी शेजारची ४ ते ५ ऊस बेटे पात्याने एकत्र बांधावीत.
८) पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी नदीलगतच्या क्षेत्रात पूर येऊन ऊस पीक बुडते. अशा ठिकाणी पूर ओसरल्यावर पाण्याचा निचरा त्वरित करून घ्यावा.
९) पावसाळी हंगामात ढगाळ हवामान, जास्त आर्द्रता आणि रिमझिम पाऊस यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यासाठी वेळेवर योग्य उपाययोजना कराव्यात.
१०) बरेचसे शेतकरी ऊस पीक हे ठिबक सिंचनावर घेतात, त्यांनी रासायनिक खतमात्रा ठिबक संचातून खत संयत्रातून (व्हेंचुरी) खाली दिलेल्या तक्त्यानुसार वापरावी.
(१०२-५१-५१ किलो नत्र - स्फुरद - पालाश प्रतिएकर)
खत देण्याचा कालावधी ---- खत प्रकार ---- विद्राव्य खत मात्रा (किलो/ एकर) प्रतिदिन खत वापर (किलो/ एकरी)
१ ते ३० दिवस ---- युरिया ---- ४५ ---- १.५००
३१ ते ८० दिवस ---- युरिया + १२-६१-०० ---- ६५ + २५ ---- १.३०० + ०.५००
८१ ते ११० दिवस ---- युरिया + १२-६१-०० ---- ४७ + ३९ ---- १.५७० + १.३००
१११ ते १५० दिवस ---- युरिया + १२-६१-०० + १३-००-४५ ---- ३० + २० + ४४ ---- ०.७५० + ०.५०० + १.१००
१५१ ते १९० दिवस ---- ००-०-५० ---- ६३ ---- १.५८०
(७५-३५-३५ किलो नत्र -स्फुरद - पालाश प्रतिएकर)
खत देण्याचा कालावधी ---- खत प्रकार ---- विद्राव्य खत मात्रा (किलो/ एकर) ---- खत वापर प्रतिदिन (किलो/ एकरी)
१ ते ३० दिवस ---- युरिया ---- ३० ---- १.००
३१ ते ८० दिवस ---- युरिया + १२-६१-०० ---- ५० + १५ ---- १.००० + ०.३००
८१ ते १२० दिवस ---- युरिया + १२-६१-०० ---- ४० + ३३ ---- १.००० + ०.८३०
१२१ ते १५० दिवस ---- युरिया + १२-६१-०० + १३-००-४५ ---- २१ + १० + २५ ---- ०.७०० + ०.३३० + ०.८३०
१५१ ते २१५ दिवस ---- ००-००-५० ---- ४८ ---- ०.७४०
- डॉ. अशोक पिसाळ, ९९२१२२८००७,
फोन - (०२३१) २६०५८५३, २६०६६२८, विस्तारित क्र. ४२३
(लेखक कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे विभागीय विस्तार केंद्रामध्ये विस्तार कृषिविद्यावेत्ता आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...