एकरी १०० टन ऊस उत्पादन मिळविण्यासाठी उसाच्या फुटव्यांची संख्या एकरी ४० ते ४५ हजार ठेवणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या लागण पद्धतीमध्ये फुटव्यांची संख्या कशी राखायची, हे आपण या लेखातून पाहू.
एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी अनेक शेतकरी अधिक बेणे वापरून दाट लागण करतात, भरमसाट रासायनिक खतांचा वापर करतानाच सऱ्या भरभरून पाणी पाजणे या गोष्टी करतात. मात्र याचा परिणाम नेमका उलटा होतो. उत्पादन खर्च वाढतानाच एकरी ३५ ते ४० टनांहून अधिक उत्पादन मिळत नाही. तसेच जमिनीची सुपीकताही खालावत आहे.
उसाच्या शरीरशास्त्रानुसार, एक परिपक्व ऊस तयार होण्याकरिता सर्वसाधारणपणे १ चौ. फूट जागा लागते. म्हणजेच एका एकरात (४३,५६० चौ. फूट) ४०,००० ते ४५,००० या दरम्यानच तोडणीयोग्य ऊस तयार होऊ शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये २ ते २.५ लाख फुटवे निर्माण होतात. त्यापैकी ४०,०० ते ४५,००० फुटवेच तोडणी योग्य उसात रूपांतरित होतात. उर्वरित जादा फुटव्यामुळे अनावश्यक दाटी होऊन अन्न, पाणी व सूर्यप्रकाशासाठी फुटव्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे ऊस बारीक राहतो. परिणामी, सरासरी ऊस उत्पादन एकरी ३०-४० टनांच्या वर मिळत नाही. दाट लागण करण्याऐवजी एकरी फुटव्यांची संख्या ४० हजार राखून उसाची जाडी आणि सरासरी वजन वाढविणे शक्य आहे.
आपणाकडे लागवड करताना बियाणे म्हणून उसाची ३ डोळे, २ डोळे आणि १ डोळा असणारी कांडी किंवा रोप वापरले जाते. लावलेल्या कांड्यांमध्ये उसाच्या बुडक्याकडील ३-४ पेरांचे डोळे जून झाल्याने उगवत नाहीत, तसेच डोळा बघून कांडी तोडली आणि लावली जात नाही. त्यामुळे १०० टक्के उगवण होत नाही.
- पट्टा पद्धतीने लागवड केल्यास एकूण सऱ्यांपैकी ६६ टक्के (दोन-तृतीयांश) सऱ्यांमध्ये लागवड होते व ३३ टक्के (एक-तृतीयांश) सऱ्या मोकळ्या राहतात.
- विद्यापीठाच्या शिफारशीनुसार सुरू उसाला एकरी १६ बैलगाड्या शेणखतासोबत साधारणतः २५० किलो युरिया, २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश असे ६०० किलो रासायनिक खत देण्याची शिफारस आहे.
फुटव्यांच्या संख्येचे नियोजन करताना सरी किती फुटांची आहे, किती डोळ्यांची कांडी बियाणे म्हणून वापरली आहे आणि दोन बियाण्यांच्या कांडीमध्ये किती अंतर ठेवले आहे यावर अवलंबून असते. याकरिता काही ठोकताळे लक्षात घेणे आवश्यक आहे. १ गुंठा म्हणजे १०८९ चौ. फूट. त्यावरून एक एकर (४० गुंठे म्हणजे ४३,५६० चौ. फूट) जर आपण या क्षेत्रात ३ फूट अंतरावर सरी सोडल्यास १४,५२० रनिंग फूट सरी लागवडीकरिता उपलब्ध होईल. समजा सऱ्यांची एकूण लांबी १५,००० रनिंग फूट आहे, एकरी चाळीस हजार फुटव्यांची संख्या ठेवण्यासाठी नियोजन खालील तक्त्यात पाहता येईल.
अ.क्र. ---- बियाणे/ कांडी प्रकार ---- ३ डोळे (टक्कर पद्धतीने) ---- २ डोळा ---- १ डोळा ---- १ डोळा (पट्टा पद्धतीने)
१ ---- दोन बियाणे/ कांडीमधील अंतर ---- ० ---- ६ ते ९ इंच ---- १ फूट ---- १ फूट
२ ---- एकरी लागणारे एकूण टिपरे ---- १५,००० ---- १२,००० ---- १५,००० ---- १०,०००
३ ---- एकूण डोळे संख्या (कांडीवरील डोळे संख्या x एकूण वापरलेल्या कांड्या) ---- ४५,००० ---- २४,००० ---- १५,००० ---- १०,०००
४ ---- खराब/ उगवण न होणारे डोळे ---- ५००० ---- ४००० ---- ० ---- ०
५ ---- एकूण शिल्लक डोळे (अ.क्र. ३ वजा अ. क्र. ४) ---- ४०,००० ---- २०,००० ---- १५,००० ---- १०,०००
६ ---- एकूण फुटवे (प्रत्येक डोळ्यातून सरासरी ६ फुटवेप्रमाणे) अ.क्र. ५ x अ.क्र. ६ ---- २,४०,००० ---- १,२०,००० ---- ९०,००० ---- ६०,०००
७ ---- ऊस तुटताना जगणारे पक्व ऊस ---- ४०,००० ---- ४०,००० ---- ४०,००० ---- ४०,०००
८ ---- अन्न खाऊन मरणारे फुटवे (अ.क्र. ६ वजा अ. क्र. ७) २०,००,०० ---- ८०,००० ---- ५०,००० ---- २०,०००
९ ---- जगणारे आणि मरणारे फुटवे यांचे गुणोत्तर (अ.क्र. ६ व अ.क्र. ७) ---- १ः५ ---- १ः२ ---- १ः १.२५ ---- २ः१
१० ---- ६०० किलो अन्न दिले असता जगणारे आणि मरणारे फुटवे यांना मिळालेल्या रासायनिक खतांचे गुणोत्तर किलोमध्ये ---- १००ः५०० ---- २००ः४०० ---- २६७ः३३३ ---- ४००ः२००
११ ---- एका उसाचे सरासरी वजन ---- ७५० ग्रॅम ते १ किलो ---- १.७५ ते २ किलो ---- २ ते २.५ किलो ---- २.५ किलोपेक्षा जास्त
१२ ---- अपेक्षित उत्पादन (मे. टन) ---- ३५-४० ---- ७५ ते ८० ---- ८० ते १०० ---- १०० पेक्षा जास्त
पारंपरिक पद्धतीने लागण केल्यास एका डोळ्यास येणाऱ्या ६ फुटव्यांमधून एकच ऊस तयार होतो. उरलेले ५ फुटवे खाऊन-पिऊन मरतात. म्हणजेच तीन डोळे पद्धतीमध्ये जगणाऱ्या फुटव्यांना ६०० किलोंपैकी फक्त १०० किलो रासायनिक खत मिळते.
पट्टा पद्धतीने लागण केल्यास ३ फुटव्यांपैकी २ ऊस तयार होतात व एकच फुटवा मरतो. पट्टा पद्धतीमध्ये जगणाऱ्या फुटव्यांना ४०० किलो खत मिळते.
एकरी १०० टन उत्पादनासाठी फुटव्यांची संख्या ४० ते ४५ हजार राखून उसाची जाडी, उंची आणि सरासरी वजन वाढविणे गरजेचे आहे.
एकरी उसांची संख्या, उसाचे सरासरी वजन आणि येणारे उत्पादन याचा परस्परसंबंध खालील तक्त्यात दाखविला आहे ः
एकरी ऊस संख्या ---- सरासरी वजन (किलो)---- एकरी येणारे उत्पन्न (टन)
४०,००० ---- १ ---- ४०
४०,००० ---- १.५ ---- ६०
४०,००० ---- २ ---- ८०
४०,००० ---- २.५ ---- १००
लागवडीनुसार फुटवा व्यवस्थापनाकरिता खालील सूत्राचा वापर करा.
सूत्र ः
एका कांडी/ रोपापासून तयार होणाऱ्या बेटात ठेवावयाची फुटवे संख्या किंवा
तयार होणाऱ्या उसांची संख्या = सरीतील अंतर (फूट) x दोन कांड्यांमधील लागवड करतानाचे अंतर (फूट)
उदा. ४ फुटांची सरी सोडून दोन कांडी/ रोपांमध्ये लागण करताना २ फूट अंतर ठेवल्यास त्या कांडी/ रोपांपासून आठच ऊस तोडणीयोग्य तयार होतील. त्यामुळे सुरवातीपासूनच या बेटामध्ये ८ ते १० फुटवे ठेवणे आवश्यक आहे.
या सूत्रानुसार आवश्यक फुटव्यांची संख्या ठरवून आणि आवश्यक फुटवे आले, की बाळभरणी करून घ्या, अथवा मोठ्या बांधणीअगोदर जादाचे फुटवे काढून भरणी करा.
रोप अथवा एक डोळा पद्धतीने लागण करताना सरी व रोपांतील अंतर, त्याला ठेवावयाचे फुटवे यातून एकरी १०० टनांपेक्षा अधिक उत्पादन कसे मिळविता येईल, ते खालील तक्त्यातून स्पष्ट होते.
----------------
सरीतील अंतर फूट ---- रोपातील अंतर फूट ---- एकरी लागणारी रोपे संख्या ---- वरील सूत्राप्रमाणे प्रतिरोप ठेवावयाचे फुटवे ---- एकरी तयार होणारी ऊस संख्या ---- एका उसाचे सरासरी वजन किलो ---- एकूण उत्पन्न टन
४ ---- २ ---- ५४४५ ---- ८ ---- ४३,५६० ---- २.५ ---- १०९
५ ---- २ ---- ४३५६ ---- १० ---- ४३,५६० ---- २.५ ---- १०९
६ ---- २ ---- ३६३० ---- १२ ---- ४३,५६० ---- २.५ ---- १०९
---------------
याशिवाय सरीच्या अंतरावरूनही एकरी उसांची संख्या ४३,५६० इतकी मर्यादित ठेवता येते. त्याकरिता प्रति १० रनिंग फूट सरीस खालीलप्रमाणे फुटवे ठेवणे आवश्यक आहे. अपेक्षित फुटवे संख्या झाली, की बाळबांधणी करणे आवश्यक आहे. गरजेपेक्षा जादाचे फुटवे काढल्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही.
--------------
सरीतील अंतर ---- एकरात निघणाऱ्या सऱ्याची एकूण लांबी (४३,५६० भागिले दोन सरीतील अंतर फूट) ---- प्रति १० रनिंग फूट सरीत ठेवायची फुटवे संख्या
३ फूट ---- १४,५२० ---- ३०
३.५ फूट ---- १२,४४६ ---- ३५
४ फूट ---- १०,८९० ---- ४०
४.५ फूट ---- ९६८० ---- ४५
५ फूट ---- ८७१२ ---- ५०
१) एक किंवा दोन डोळ्यांची कांडी आणि रोपाद्वारेच उसाची लागवड करा.
२) दोन कांड्यांमध्ये/ रोपांमध्ये योग्य अंतर ठेवूनच लागवड करा.
३) शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत यांसारख्या सेंद्रिय खतांचा प्रामुख्याने वापर करा.
४) फुटवे व्यवस्थापन सूत्राचा वापर करून जादाचे फुटवे काढून टाका.
५) रासायनिक खते सुधारित खत घालण्याच्या पहारीचा वापर करूनच द्या.
६) पट्टा पद्धतीने किंवा ३.५ फुटांपेक्षा जास्त अंतरावर सऱ्या सोडून लागवड करा.
१) तीन डोळ्यांची कांडी तसेच खोडवा ऊस लागवडीसाठी वापरू नका.
२) टक्कर पद्धतीने लागवड करू नका.
३) उसाचा पाला जनावरांकरिता कोणत्याही परिस्थितीत काढू नका.
४) केवळ युरिया खताचा वापर करू नका.
५) मोकाट पद्धतीने सऱ्या भरून पाणी देऊ नका.
संपर्क - अमोल दशरथ क्षीरसागर, ९४०४९९०७०१
(लेखक बांबवडे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथे कृषी विभागात मंडळ कृषी अधिकारी आहेत.)
-----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...