लागवडीसाठी बेणे मळ्यातील 10 ते 11 महिन्यांचे रसरशीत व शुद्ध बेणे वापरावे. सर्वप्रथम अशा उसाच्या एक किंवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या खांडून घ्याव्यात. त्यानंतर 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मि.मी. मॅलॅथिऑन किंवा डायमेथोएट मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. उसाच्या एक किंवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या या द्रावणात 10 मिनिटे बुडवून काढाव्यात. या रासायनिक बेणे प्रक्रियेमुळे उसावर सुरवातीच्या काळात येणारे खवले कीड आणि पिठ्या ढेकूण या किडींपासून आणि जमिनीमधून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. बेण्याची उगवण चांगली होते, रोपांची सतेज - जोमदार वाढ होते आणि परिणामी उत्पादनात वाढ होते.
रासायनिक बेणे प्रक्रियेनंतर उसाच्या टिपऱ्यांना जैविक बेणे प्रक्रिया करावी. यासाठी प्रथम 100 लिटर पाण्यात 10 किलो ऍसेटोबॅक्टर जिवाणूसंवर्धक आणि 1.250 किलो स्फुरद विघटक जिवाणूसंवर्धक चांगल्या प्रकारे मिसळावे. त्यानंतर उसाच्या टिपऱ्या या द्रावणात 30 मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापराव्यात. उसाच्या टिपऱ्यांमध्ये ऍसेटोबॅक्टरचा शिरकाव होऊन सदर जिवाणू उगवणीनंतर उसामध्ये आंतरप्रवाही अवस्थेत राहून हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून हा नत्र उसाला उपलब्ध करून देतात. यामुळे उसाला वापरण्यात येणाऱ्या रासायनिक नत्र खतात (युरिया) 50 टक्के बचत करता येते. त्याचप्रमाणे सदर मिश्रणात वापरण्यात आलेले स्फुरद विघटक जिवाणू उसाखालील जमिनीतील अविद्राव्य स्फुरदाचे विघटन करून उसाला स्फुरद उपलब्ध करून देतात. स्फुरद विघटक जिवाणू संवर्धकाच्या वापरामुळे उसाला वापरण्यात येणाऱ्या रासायनिक स्फुरद खतात (सिंगल सुपर फॉस्फेट) 25 टक्के बचत करता येते.
वरीलप्रमाणे रासायनिक बेणे प्रक्रियेनंतर उसाच्या टिपऱ्यांना जैविक बेणे प्रक्रिया केल्यास रासायनिक नत्र खतात 50 टक्के व स्फुरद खतात 25 टक्के बचत करता येते. त्याचप्रमाणे नुसती रासायनिक खते वापरण्याच्या तुलनेत उसाचे उत्पादन जास्त मिळते आणि साखर उत्पादनातसुद्धा वाढ होते, असे दिसून आले आहे.
1. बेण्याची उगवण चांगली होते, रोपे सतेज व जोमदार दिसतात.
2. सुरवातीच्या काळात पिकास कीड व रोगांपासून संरक्षण मिळते.
3. उगवणीनंतर रोग-कीड नियंत्रणापेक्षा बेणे प्रक्रियेस कमी खर्च व कमी वेळ लागतो.
4. जैविक बेणे प्रक्रियेमुळे रासायनिक खतात बचत करता येते.
5. उत्पादनवाढीबरोबर जमिनीची सुपीकता टिकून राहते.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...