शास्त्रीय नाव ः तमिलनाडिया युलिजिनोसा (Tamilnadia uliginosa)
कुळ ः रुबिएसी (Rubiaceae)
संस्कृत नाव ः गांगेरुक
हिंदी नाव ः पेडालू, पिंडालू
गुजराती नाव ः गंगेडा, गांगड
स्थानिक मराठी नावे ः पेंढारी, पेंढू, पेंढूर
पेंढर ही वनस्पती श्रीलंका, भारत, पाकिस्तान, म्यानमार या देशांतील जंगलात आढळते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आसाम येथील जंगलांमध्ये प्रामुख्याने आढळते. महाराष्ट्रात पश्चिम घाट परिसरात, तसेच कोकण, नांदेड या भागांत पेंढरीची लहान झाडे आढळतात.
ओळख ः
पेंढरचा लहानसा वृक्ष सुमारे 20 फूट उंचीपर्यंत वाढतो.
खोड ः खोडाचा घेर लहान असतो. साल तांबूस-तपकिरी रंगाची, साधारण खडबडीत
फांद्या ः फांद्या अनेक, कठीण, चार कोनी, फांद्यांच्या पेरांपासून 2 ते 4 टोकदार 1.4 सें.मी. लांब तीक्ष्ण काटे तयार होतात.
पाने ः साधी 10 ते 12 सें.मी. लांब व 6 ते 7 सें.मी. रुंद. प्रत्येक पेरापासून तीन पाने तयार होतात. पाने गुळगुळीत, चकाकणारी, लंबगोल परंतु देठाकडे निमुळती. पानांवर 6 ते 8 शिरांच्या जोड्या, पानांचे देठ आखूड.
फुले ः फुले पांढरी, आकर्षक, द्विलिंगी, नियमित, 3 ते 4 सें.मी. व्यासाची, सुवासिक, एकांडी, पानांच्या बेचक्यातून येतात.
फुलांचे देठ अगदी आखूड, पुष्पमुकुट पाच दलांचा, हिरवा, साधारण जाडसर. पाकळ्या 5 ते 7, एकमेकांस चिकटलेल्या, पुष्पनळी आखूड, पुष्पनळीच्या मुखावर केसांचे वलय. पाकळ्या गोलाकार, जाड, बाहेरून गुळगुळीत, आतील बाजू लोमश. पुंकेसर 5 ते 7 केसरतंतूरहित. बीजांडकोश दोन कप्पी, परागवाहिनी आखूड, टोकाकडे मोठी व जाड.
फळे ः फळे गोलाकार - अंडाकृती, लंबगोलाकार, लहान लिंबाएवढी, पेरूसारखी दिसतात. फळे पिकल्यावर पिवळी. बिया अनेक, गरात लगडलेल्या. फळे खातात.
या वनस्पतीला मे-जून महिन्यात फुले येतात. त्यानंतर फळे तयार होतात.
पेंढरच्या कच्च्या फळांची भाजी बिया न घेता करतात. फळांच्या टरफलाची व गराची भाजी करतात.
साहित्य ः पेंढरीची कच्ची फळे, तिखट, मीठ, हळद, तेल, जिरे, मोहरी, साखर, काळ्या तिळाचे कूट इत्यादी.
कृती ः पेंढरीची कच्ची फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत व कुकरमध्ये वाफवून घ्यावीत. नंतर उकडलेल्या बटाट्याप्रमाणे फोडी कराव्यात व त्यातील बिया काढून टाकाव्यात. कढईत तेल तापवून जिरे-मोहरीची फोडणी करावी. मग त्यावर उकडून घेतलेल्या पेंढरीच्या फळांच्या फोडी फोडणीत घालाव्यात. नंतर तिखट, मीठ, हळद, थोडी साखर व काळ्या तिळाचे कूट घालून भाजी वाफवून घ्यावी.
डॉ. मधुकर बाचूळकर ः 9730399668
(लेखक श्री. विजयसिंग यादव कला आणि शास्त्र महाविद्यालय, पेठ वडगाव (जि. कोल्हापूर) येथे प्राचार्य आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करमळ किंवा करंबेळचे मध्यम आकाराचे देखणे वृक्ष भारत...
कानफुटी ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्...
आंबुशी या वनस्पतीला ‘आंबुटी’, ‘आंबोती’, ‘चांगेरी’ ...
रानभाज्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभ...