অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रानभाजी - भुईआवळी

प्रस्तावना

शास्त्रीय नाव : Phyllanthus amarus (फायलॅन्थस ऍमरस)
कुळ : Euphorbiaceae (इफोरबिऐसी)

भुईआवळी ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, 20 ते 50 सें.मी.पर्यंत उंच वाढते. भुईआवळी ही वनस्पती "इफोरबिऐसी' कुळातील म्हणजेच एरंडाच्या कुळातील आहे.

ओळख

  • खोड व फांद्या गोलाकार. खोडाला बुंध्यापासूनच फांद्या फुटतात.
  • पाने : साधी, 0.5 ते 1.5 सें.मी. लांब, एक आड एक, लांबटगोल, दोन्ही टोकांकडे गोलाकार, फांदीवर दोन समोरासमोरील रांगांनी मांडलेली. पाने 0.3 ते 0.6 सें.मी. रुंद, देठ लहान.
  • फुले : लहान, पिवळसर हिरवी, पानांच्या बेचक्‍यात मागील बाजूस वळलेली. फुले एकलिंगी, नर व मादी फुले एकाच फांदीवर. नरफुले 1 ते 3 एकत्र. मादी फुले एकाकी. पाकळ्या 4 ते 6, तळाकडील भागात साधारणतः एकमेकास चिकटलेल्या. नरफुलांत 3 पुंकेसर. मादी फुलातील बीजांडकोश तीन कप्पी. बीजांडकोशाखाली वलयाकृती प्रपिंड.
  • फळे : आवळ्यासारखी गोलाकार, पण आकाराने लहान. फळे बोंडवर्गीय, पिकल्यानंतर तीन भागांत फुटणारी. 1.5 ते 2.0 मि.मी. व्यासांची. फळांना आवळ्यासारखी रुची. बिया लहान, त्रिकोनी, पाठीवर आडव्या सुरकुत्या.
  • आढळ : भुईआवळी पावसाळ्यात सर्वत्र वाढलेली आढळते. शेतात, बागेत, पडीक जमिनीवर सर्व प्रकारच्या हवामानात सर्व ठिकाणी वाढते. जुलै ते ऑक्‍टोबर महिन्यात भुईआवळीस फुले, फळे येतात. नोव्हेंबर, डिसेंबरनंतर ती वाळून जाते. बियांपासून भुईआवळीची लागवड करणे शक्‍य आहे.

औषधी उपयोग

  • या वनस्पतीत "फायलेनथीन' नावाचे द्रव्य आहे. कावीळ झाल्यास भुईआवळी वाटून दुधाबरोबर सकाळ-संध्याकाळ देतात.
  • भुईआवळीचा वापर यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी कमी करण्यास करतात.
  • भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते व दाह कमी होतो. लघवी कमी होणे, मूतखडा, जंतुसंसर्ग होणे आदी विकारांतही या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो.
  • भुईआवळीची भाजी आंबट असून, आधुनिक शास्त्रानुसार या वनस्पतीचा उपयोग विषाणूजन्य तापात केला जातो. यकृतातील पाचक स्रावामध्ये बिघाड झाल्यास हिपॅटायटिस - ब (B), तसेच काविळीमध्ये या भाजीचा चांगला उपयोग असल्याचे दिसून आले आहे.
  • रक्तदाबवृद्धी, चक्कर येणे, या आजारात ही भाजी खाल्ल्याने सुधारणा आढळून येते.
  • फ्ल्यूसारख्या थंडी-तापाच्या आजारात, तसेच वरचेवर सर्दी-खोकला, ताप येणे अशा लक्षणांत ही भाजी नियमितपणे खावी.

असा करता येईल वापर

भुईआवळीची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात.

भुईआवळीची भाजी

कृती क्र. 1 -

साहित्य : दोन वाट्या निवडून स्वच्छ केलेली भाजी, अर्धी वाटी तूर, मसूर किंवा मूगडाळ, दाण्याचे कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट, तेल, डाळीचे पीठ, 8 ते 10 लसूण पाकळ्या, मोहरी, हिंग व गूळ.

कृती : तेलाच्या फोडणीत लसूण परतावा. भाजी व डाळ कुकरमध्ये शिजवून घोटून त्यात डाळीचे पीठ लावावे. नंतर फोडणीत भाजी घालावी. मिरची पेस्ट, मीठ, दाणेकूट व थोडासा गूळ घालून भाजी शिजवावी.

कृती क्र. 2 -

साहित्य : निवडून स्वच्छ केलेली भाजी, कांदा, मिरची, लसूण, तेल, मीठ इ.
कृती : भाजी बारीक चिरून घेणे. तेलात कांदा, लसूण, मिरची परतून घेणे आणि भाजी घालून चांगली परतून घेणे.


ओळख रानभाज्यांची - भुईआवळी

डॉ. मधुकर बाचूळकर

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate