शास्त्रीय नाव - कार्डिओस्पर्मम हेलिकॅबम (Cardiospermum helicabum)
कूळ - सॅपीनडिएसी (sapindaceae)
स्थानिक नावे - कपाळफोडी या वनस्पतीस कानफुटी, कर्णस्फोटा अशीही स्थानिक नावे आहेत. भारतात काही ठिकाणी तिला "तेजोवती' या नावाने ओळखले जाते.
इंग्रजी नाव - बियांचा आकार हृदयासारखा असल्याने इंग्रजीमध्ये "हार्ट पी' असे म्हणतात. फळे फुग्यांसारखी दिसत असल्याने त्याला "बलून वाईन' असेही म्हणतात.
कानफुटी ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे वेल महाराष्ट्रातील जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. ही वर्षायू वेल आहे.
खोड - नाजूक, आधारास गुंडाळत वर चढणारे.
पाने - संयुक्त, एकाआड एक, कडूलिंबाच्या पानासारखी दिसतात. पानांचा देठ 2.2 ते 3.8 सें. मी. लांब, पर्णिका लांबट त्रिकोणी आकाराच्या, तळाशी निमुळत्या तर वरील बाजूस साधारण टोकदार, पर्णिकांच्या कडा कातरलेल्या, दंतूर.
फुले - लहान, पांढरी, द्विलिंगी, अनियमित, पानांच्या बेचक्यातून येणाऱ्या नाजूक छत्राकार पुष्पमंजिरीत येतात. पुष्पमंजिऱ्यांच्या टोकापासून प्रताने तायर होतात. प्रताने आधारास गुंडाळतात व वेलीला वर चढण्यास मदत करतात. पुष्पमंजिऱ्या 3.8 ते 10 सें. मी. लांब असतात. पुष्पमुकुट चार दलांचा, दोन दले लहान, तर दोन मोठी. पाकळ्या चार, दोन लहान, दोन मोठ्या आकाराच्या असतात. पाकळ्यांची टोके गोलाकार. पुंकेसर आठ, पाकळ्यांपेक्षा लांब. बीजांडकोश तीन कप्पी. फळे त्रिकोणी, फुंग्याप्रमाणे हवेने भरलेली.
बिया - तीन, काळसर रंगाच्या. बियांच्यावर पांढरा ठिपका असतो. या वनस्पतीला ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत फूल व फळे येतात.
मूळ - कपाळफोडीचे मूळ पांढरे, जाड दोऱ्यासारखे असते. मुळांची रुची तिखट व कडवट तर वास किळसवाणा असतो.
कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. जीर्ण आमवातामध्ये पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे. ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलाविरोध यामुळे अंग जखडल्यासारखे वाटणे अशा विकारात कपाळफोडीच्या भाजीने चांगला गुण येतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल, अंगावरून कमी प्रमाणात जात असेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो. परमा तसेच गुप्तरोगामध्ये या भाजीचा उपयोग होतो.
आधुनिक शास्त्रानुसार कपाळफोडीच्या पानात अँटिबायोटिक व अँटिपॅरासायटिक तत्त्वे असल्याने जुनाट खोकला (chronic bronchitis) यावर तसेच छाती भरणे या विकारातही कपाळफोडीची भाजी उपयुक्त आहे.
कपाळफोडीची भाजी 1
साहित्य - कानफुटीची पाने, लसूण, जिरे, तेल, मीठ, हिरवी मिरची इ.
कृती - कानफुटीची पान स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. कढईत तेल, जिरे, लसूण यांची फोडणी द्यावी, हिरवी मिरची चिरून फोडणीत घालावी. नंतर चिरलेली भाजी घालून भाजीत मीठ घालून परतून घ्यावी. झाकण ठेवून भाजी मंद गॅसवर शिजवावी.
कपाळफोडीची भाजी 2
साहित्य - पाने, मूगडाळ, तेल, लसूण व ओली मिरची पेस्ट, मोहरी, मीठ इ.
कृती - कढईत तेल, मोहरी, लसूण- मिरची पेस्ट घालून फोडणी द्यावी. नंतर चिरलेली भाजी भिजवलेली मूगडाळ व मीठ घालून भाजी परतून घ्यावी. मंद आचेवर झाकून भाजी शिजवून घ्यावी.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करमळ किंवा करंबेळचे मध्यम आकाराचे देखणे वृक्ष भारत...
बिया असणाऱ्या फुलांच्या फुगीर भागास मराठीत कमळकाकड...
आंबुशी या वनस्पतीला ‘आंबुटी’, ‘आंबोती’, ‘चांगेरी’ ...
करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आ...