शास्त्रीय नाव - Achyranthes aspera ॲचरॅन्थस ॲस्पेरा
कुळ - Amaranthaceae ॲमरान्थेसी
इंग्रजी नाव - प्रिकली चॅफ फ्लॉवर
संस्कृत नाव - अपामार्ग
आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते. ही वनस्पती भारत, बलुचिस्तान, श्रीलंका, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे आढळते. प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते.
खोड- साधारण मीटरभर उंच, ताठ वाढणारे.
फांद्या - चौकोनी, रेषांकित.
पाने - साधी, एकासमोर एक, ३.५ - ६.८ सें. मी. x २.५ - ४.५ सें. मी., व्यस्त अंडाकृती किंवा लंबगोलाकार, मृदू केसाळ, फिकट हिरव्या रंगाची, पानांना राखाडी रंगाची झाक, मागील बाजू पांढरट - राखाडी, देठ लहान, लवयुक्त.
फुले - लहान, द्विलिंगी, नियमित, हिरवट रंगाची, फुलांचे दांडे फांद्यांच्या टोकांवर येतात. फुलांचे दांडे ४० ते ५० सें. मी. लांब, टोकांजवळ साधारण खाली झुकलेले, पाकळ्या पाच, हिरवट - पांढऱ्या, पुंकेसर ५, बीजांडकोष एककप्पी.
फळे - लहान, आयताकृती, दंडगोलाकार, परिदल मंडलात झाकलेली, फळांवर लहान टोकदार काटे असल्याने अंगाला, कपड्यांना चिकटतात. आघाड्याला ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात फुले-फळे येतात. आघाडा गणपतीला वाहण्याची प्रथा असल्याने ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे.
आघाडा या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे (पंचांग) औषधात वापरतात.
आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी पाचक असून, लघवीस साफ होण्यासाठी उपयोग होतो. या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शरीरातील मेद कमी करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी उपयुक्त आहे. या भाजीने मूळव्याधीच्या तक्रारी, गुदभागी वेदना, खाज इत्यादी कमी होण्यास मदत होते.
पाककृती १ -
साहित्य -आघाड्याची कोवळी पाने, कांदा, लसूण, मीठ, हिरव्या मिरच्या, तेल, जिरे इत्यादी.
कृती - आघाड्याची कोवळी पाने निवडून घ्यावीत. पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. कढईत तेल घालून तेलात जिरे, चिरलेला कांदा, चिरलेली मिरची घालावी. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर त्यामध्ये लसूण, चिरलेली भाजी, मीठ घालून नीट परतावे. झाकण ठेवून भाजी शिजवावी.
साहित्य - आघाड्याची कोवळी पाने, लसूण, कांदा, डाळीचे पीठ, तेल, तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य इत्यादी
कृती - आघाड्याची पाने धुऊन, चिरून घ्यावीत. कढईत तेल घेऊन त्यात फोडणी करून घ्यावी. लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. नंतर चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगली वाफ येऊ द्यावी. भाजी अर्धवट शिजल्यावर डाळीचे पीठ हळूहळू भुरभुरत टाकावे. सतत भाजी हलवावी. एकसारखे हलवत राहिल्याने भाजी मोकळी होईल. भाजी मंद गॅसवर शिजवून घ्यावी.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आ...
पावसाळ्यात पडीक- ओसाड जमिनीवर, रस्त्यांच्या कडेस, ...
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही...
रानभाज्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभ...