औषधी वनस्पतीच्या विविध भागांचा वापर विशिष्ट अशा रोगांवर उपचार करण्यासाठी होतो. आयुर्वेदिक आणि युनानी यांसारख्या भारतीय औषध प्रणालीचा वापर कित्येक देशांमध्ये वाढला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत औषधी वनस्पतींना मागणी वाढली आहे.
जैवविविधतेने नटलेल्या आपल्या राज्यात असंख्य वनस्पतींच्या प्रजाती आहेत. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग औषधी म्हणून होतो. आयुर्वेदाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याने औषधी वनस्पतींची मागणी वाढत आहे. हे लक्षात औषधीदृष्ट्या महत्त्व असलेल्या वृक्ष आणि वनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे.
1) औषधी वनस्पतीची व्यापारी तत्त्वावर शेतीत लागवड करताना उत्तम बियाणे, अनुकूल वातावरण व तांत्रिक माहितीची आवश्यकता आहे.
2) आयुर्वेधिक औषधी उत्पादनामध्ये उत्पादनापेक्षा वनस्पतीतील घटकाचा दर्जा आणि त्यातील रासायनिक घटकद्रव्यांच्या प्रमाणाला आर्थिक महत्त्व आहे.
3) औषधी वनस्पतींचा उत्तम वाणाचा वापर, त्या वाणाची अचूक वेळेत काढणी, लागवडीतील वनस्पतीची योग्य प्रकारे निगा व तांत्रिक माहिती समजावून घेतल्यास औषधी वनस्पतीची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते.
4)औषधी वनस्पतींची लागवड करणारे शेतकरी, आरोग्यतज्ज्ञ आणि विविध औषधी उत्पादक कंपन्यांमध्ये नियोजनबद्ध समन्वय असावा.
5) औषधी वनस्पतींची शास्त्रीय पद्धतीने शेतात लागवड करणे आवश्यक आहे. औषधी वनस्पतींची पाने, फुले, खोड, मूळ यावर मालावर प्रक्रिया करून बाजारामध्ये उपलब्ध करून दिल्यास जास्त नफा मिळू शकेल.
6) सर्वच वनस्पती औषधी असल्या तरी कायम मागणी असलेल्या वनस्पतींचाच उपयोग विविध रोग व व्याधींच्या उपचारासाठी केला गेला आहे.
औषधी तसेच सुगंधी वनस्पती बाजारामध्ये प्रक्रिया करून आणावी लागते. प्रक्रिया करण्याच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.
1) स्वच्छता करणे - सर्वसाधारणपणे ही प्रक्रिया कंद-मुळे प्रकारच्या पिकांमध्ये करावी लागते. उदा. अश्वगंधा, सर्पगंधा, शतावरी, सफेद मुसळी इत्यादी कंदमुळे जमिनीतून खणून हळुवारपणे त्यांना इजा न होता धुवून घ्यावी लागतात. नंतर ही मुळे, कंद सावलीत सुकवतात.
2) सुकवणे - ताज्या औषधी वनस्पतींचे भाग म्हणजे फुले, बिया, पाने, फळे, मुळ्या, ओला चिक इत्यादी जास्त काळ टिकत नाही. त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करून त्याचा टिकाऊपणा व आयुष्य वाढविण्यासाठी सावलीत सुकवणे ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या वनस्पतीत असणारी मूलद्रव्ये तसेच रंग कायम राखला जातो.
3) वर्गवारी करणे - मालाची स्वच्छता करून तो माल वाळवल्यानंतर त्या मालाची वर्गवारी करणे गरजेचे आहे. चांगल्या दर्जाच्या मालाला बाजारामध्ये चांगला भाव मिळतो. वर्गवारी करताना मालाचा आकार, रंग इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.
4) पावडर/ चूर्ण करणे - आयुर्वेदामध्ये एकाच वनस्पतीची नुसती पावडर अथवा अनेक वनस्पतींची मिश्र स्वरूपातील पावडरचा उपयोग केला जातो. माल चांगला वाळवून घेतल्यानंतर तो स्टेनलेस स्टील चक्कीमध्ये दळून घेतला जातो. वेगवेगळ्या मालासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चक्क्या उपलब्ध आहेत. माल दळून घेतल्यानंतर तो विविध आकाराच्या चाळणीतून चाळून घेतात. चांगली बारीक पावडर मिळविण्यासाठी 80 मेश चाळणीचा वापर करतात.
सुगंधी वनस्पतीमधील तेल काढण्यासाठी तेल निष्कर्षणाच्या विविध पद्धती वापरल्या जातात.
1) ऊर्ध्वपातन
अ) पाण्याद्वारे ऊर्ध्वपातन
ब) पाणी व वाफेद्वारे उर्ध्वपातन
क) वाफेद्वारे ऊर्ध्वपातन
अ) ऍबसोल्यूट व कॉन्सन्ट्रेट बनवणे
ब) वायुरूप द्रावके वापरून निष्कर्षण
सुगंधी वनस्पतीपासून विविध रसायने, तेले वेगळी करणे, विशेष प्रक्रियेद्वारे अल्कलॉइड्स, स्टिरॉइड्स, बाष्पनशील/व्होलाटाइल ऑइल्स अर्क वेगळे करून त्याची विक्री करणे या बाबींचा प्रक्रिया पद्धतीत समावेश होतो. अशी प्रक्रिया केंद्रे वैयक्तिक अथवा सामुदायिक पद्धतीने चालवणे शक्य आहे. शुद्ध स्वरूपातील द्रव्य निर्यात करून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळू शकते.
टीप - औषधी व सुगंधी वनस्पतीचे दर हे संदर्भासाठी आहेत. बाजारपेठेतील चढउतारानुसार त्यामध्ये बदल होऊ शकतात.
संपर्क - 02426- 243292
(लेखक औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
येत्या काळातील कडधान्यांची वाढती मागणी लक्षात घेता...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...
कडधान्य पिकांचे मानवी आह्यरात महत्वाचे स्थान आहे. ...