बाजारपेठ म्हटले की, आपल्या समोर उभ्या राहतात त्या शहरातील कपडा, सराफ, घाऊक, भाजीपाला आदी बाजारपेठा अथवा मोठमोठ्या शहरामधील टोलेजंग प्रशस्त मॉल! परंतु हिंगोली शहरातील एक बाजारपेठ त्या तुलनेत फारशी विशेष नाही… परंतु अनोखी मात्र आहे. उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्हा परिषदेच्या बाजूला सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्र निर्माण करून सेंद्रिय भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे.सेंद्रिय भाजीपाला हे या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे… या बाजारपेठेला पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी नुकतीच भेट देऊन तेथील शेतकरी, बचत गटातील महिला सदस्य आदिंशी संवाद साधला.
भाजीपाला विकणारे शेतकरी व कापडी/ कागदी पिशव्या विकणाऱ्या बचत गटांच्या सदस्य यांना झालेला आनंद त्यांच्या पालकमंत्री यांच्या भेटीमुळे चेहऱ्यावरील भावमुद्रेवर ओसंडून वाहत होता, असे मला प्रतीत झाले.या भाजीपाला केंद्रात उगम विकास संस्थेशी संबंधीत सेंद्रिय शेती करणारे शेतकरी त्यांनी पिकवलेली सेंद्रिय भाजी, डाळी, ज्वारी, गहू, कांदे, बटाटे, पालेभाज्या विक्रीस आणतात.
हा भाजीपाला व येथील अन्नधान्य पौष्टीक असून ते कोणत्याही किटकनाशक व रासायनिक खतांचा वापर न करता पिकवलेले असते. त्यामुळे हिंगोली शहरातील बहुतांश नागरिक येथील शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करत असतात.पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी बाजारपेठेची पाहणी केली असता जागा अपुरी पडत असल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. त्यामुळे श्री. कांबळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सेंद्रिय भाजीपाला केंद्राला जास्तीची जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यावेळी बाजारपेठेतील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून आपला आनंद व्यक्त केला.तसेच उगम ग्रामीण विकास संस्थेच्या सुमारे अडीचशे बचत गटातील महिलांनी हिंगोली जिल्ह्याला प्लॅस्टीकमुक्त करून पर्यावरणास पुरक कापडी व कागदी पिशव्यांची निर्मिती सुरू केलेली आहे.
त्याकरिता ही ह्या बाजारपेठेत बचत गटांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच सेंद्रिय भाजी पाल्याबरोबरच पर्यावरणपूरक कापडी व कागदी पिशव्याला एकाच ठिकाणी बाजारपेठ देऊन पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असा संदेश पालकमंत्री यांनी वाढीव जागा देऊन दिला आहे.
यावेळी महिला बचत गटातील सदस्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व उपस्थित सर्व मान्यवरांना कागदी व कापडी पिशव्या भेट म्हणून दिल्या. म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी भाजीपाला व इतर वस्तूंची खरेदी केल्यानंतर त्या पर्यावरणपूरक कापडी अथवा कागदी पिशव्यांमधून घरी घेऊन जाण्याचा मौलीक सल्ला बचत गटाच्या माध्यमातून प्रतिनिधीक स्वरूपात देण्यात आला आहे, असे मला वाटले.
हिंगोली शहरवासियांनी यापुढे कापडी अथवा कागदी पिशव्याच वापरण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.सर्व हिंगोली वासिय नागरिक सेंद्रिय बाजारपेठेला भेट देऊन उत्तम दर्जाचा भाजीपाला खरेदी करून आपली आरोग्य संपदा चांगली ठेवण्याबरोबरच कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्यास सुरूवात करून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची दक्षता घेतील, याबाबत माझे मन आशावादी आहे.
उगम संस्थेचे प्रमुख जयाजी पाईकराव पालकमंत्र्यांना माहिती देत होते की, बचत गटांकडून सुमारे 20 ते 25 हजार कागदी व कापडी पिशव्यांची महिन्याला निर्मिती शक्य असून संपूर्ण हिंगोली जिल्हा प्लॅस्टीकमुक्त करण्याचे नियोजन आहे. पालकमंत्री कांबळे यांनी जिल्हावासियांनी कागदी व प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा दैनंदिन वापरात उपयोग करण्याचे आवाहन करून बचत गटांना रोजगार उपलब्धता ही करून दिली जाईल, असे सांगितले.
हिंगोली शहरातील या अनोख्या सेंद्रिय भाजीपाला बाजारपेठेला भेट देऊन व तेथील शेतकरी, विक्रेते व महिला बचत गटांतील सदस्यांशी पालकमंत्री कांबळे यांनी चर्चा करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे मान्य केले व बाजारपेठेला वाढीव जागा देण्याची सूचना म्हणजेच सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या शेती मालाला एक हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न नक्कीच शेतकऱ्यांसाठी आशादायी असल्याचे मला वाटत आहे.
- सुनील सोनटक्के जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली.
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/26/2020
कडधान्य पिकांचे मानवी आह्यरात महत्वाचे स्थान आहे. ...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीत...
सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आ...