खुलताबाद तालुक्यातील मौजे दरेगाव (जि. औरंगाबाद) हे डोंगराच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. भद्रा मारुती मंदिरासाठी (मारुतीची निद्रा घेत असलेल्या अवस्थेतील एकमेव प्रतिमा) हे गाव प्रसिद्ध आहे. गावाच्या दोन्ही बाजूंना डोंगर असून, जमीन काहीशी मध्यम स्वरूपाची आहे. पाणी मुबलक असल्याने ऊस शेती मोठ्या प्रमाणात होते. अलीकडील काळात पाऊस कमी झाला. मजुरांची टंचाई भासू लागली तसतसे शेतकरी पीक बदल करू लागले. गावातील तुकाराम दादाराव गायकवाड यांनीही उसाचे क्षेत्र कमी करून आले पीक घेणे सुरू केले. लक्ष्मण या चुलत बंधूंसह त्यांची एकूण 70 एकर जमीन असून, 35 एकर तुकाराम यांच्या वाट्याची आहे.
तुकाराम यांचे एम.ए. (पॉलिटिकल सायन्स)पर्यंत शिक्षण झाले आहे. काही काळ त्यांनी नोकरी केली. पण ती न परवडल्याने पूर्णवेळ शेतीतच लक्ष घातले. आले हे तसे त्यांचे पारंपरिक पीक. पण पूर्वीच्या काळात एकरी 25 ते 30 क्विंटलच्यावर उत्पादन जात नव्हते. आता मात्र सुधारित तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी सुरू केला आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात त्यांना आले पिकात एकरी 175 क्विंटल उत्पादनापर्यंत पोचण्यात यश मिळाले. त्याचे नियोजन असे. मागील वर्षी उन्हाळ्यात शेताची उभी-आडवी नांगरट केली. रोटाव्हेटर वापरला. लहान गादी वाफे तयार करून त्यावर प्रति एकरी सात ट्रॉली शेणखत, दोन बॅगा डीएपी तर एक बॅग पोटॅश, 125 किल निंबोळी पेंड, 10 झिंक सल्फेट टाकले. कीड नियंत्रणासाठी फोरेट पाच किलो वापरले. पुन्हा रोटाव्हेटरच्या साह्याने सर्व चांगले मिसळले. पुन्हा पाच फूट रुंदीचे व दीड फूट उंचीचे बेड तयार केले. बेडवर ठिबक पसरवले व लागवड केली.
वडिलोपार्जित वापरात असलेल्या घरच्याच आले बेण्याचा (त्याचे वाण त्यांना ठाऊक नाही) वापर तुकाराम करतात. साहजिकच त्यावरील मोठा खर्च त्यांनी कमी केला आहे. लागवडीसाठी डोळे चांगले फुगलेले व 30 ते 40 ग्रॅम वजनाचे बेणे वापरले. क्लोरपायरिफॉसच्या द्रावणाची बेणेप्रक्रिया केली. त्यामुळे पिकाची जोमदार व निरोगी वाढ झाली. बेडवर ट्रायकोडर्माचा वापर केल्याने जमिनीतील रोगांपासून पिकाचे संरक्षण झाले. एकरी आठ ते नऊ क्विंटल बेणे लागते. लागवडीनंतर विद्राव्य खते ठिबकद्वारे दिली. ती मुळांपर्यंत पोचतात, वेळ, मजुरीही वाचते. लागवडीनंतर लगेच ठिबकद्वारे पाणी दिले.
गायकवाड बंधूंच्या मिळून 11 म्हशी आहेत. एकरी 25 ते 30 लिटर प्रमाणात त्यांचे मूत्र प्रत्येक आठवड्याला ठिबकद्वारे सोडले जाते. मात्र सुरवातीच्या चार महिन्यांपर्यंत गोमूत्र दिले जाते. ते बाहेरून विकत आणले जाते.
साडेतीन एकर आलेक्षेत्रापैकी तुकाराम यांचे दीड एकर, तर लक्ष्मण यांचे दोन एकर क्षेत्र होते. जून 2012 च्या सुमारास लागवड केलेल्या आल्याची काढणी मार्चअखेर व एप्रिलमध्ये केली. एकरी सुमारे 175 क्विंटल उत्पादन मिळाले. एकरी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला. यंदाच्या लागवडीसाठी त्यातील बेणे वेगळे काढण्यात आले. उर्वरित आले जागेवरच व्यापाऱ्याला बोलावून, वजन करून क्विंटलला साडेसहा हजार रुपये दराने विकले. आले काढणी, स्वच्छ करणे, पोत्यात भरणे, वाहतूक ही कामे व्यापाऱ्याकडूनच झाली. त्यामुळे त्यावरील मोठा खर्च वाचला. औरंगाबाद येथे बांधलेल्या घराचे कर्जही फेडणे शक्य झाले. कृषी विभागाचे मार्गदर्शन गायकवाड बंधूंना मिळाले.
आले पिकाची काढणी एप्रिलमध्ये संपली की पुढील हंगामासाठी बेणे राखून ठेवण्यासाठी 10 फूट लांबी-रुंदी व चार फूट खोलीचा खड्डा झाडाखाली खोदला जातो. यात सुमारे 40 क्विंटल बेणे ठेवले जाते. त्यात अर्धा फुटापर्यंत वाळू भरली जाते. त्यावर ट्रायकोडर्माची प्रक्रिया केलेले बियाणे पसरविले जाते. त्यावर ओले गोणपाट टाकले जाते. दर दोन ते तीन दिवसांनी गोणपाट ओले होईल एवढेच पाणी शिंपडले जाते. या खड्ड्यावर दाट सावली व्हावी यासाठी छप्पर बांधले जाते. या बेणेगृहात सुमारे दोन ते अडीच महिने बेणे ठेवले जाते. अशा पद्धतीने बेणे साठविल्यामुळे त्यास शीतगृहासारखा परिणाम साधला जातो. बेणे खराब होत नाही.
दोन भावांच्या मिळून सहा विहिरी आहेत. सर्व विहिरींचे पाणी एकाच विहिरीत घेतले असून, तेथूनच ठिबकद्वारे पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. सर्व विहिरी एकमेकांना अशा जोडल्या आहेत, की कोणत्याही विहिरीचे पाणी शेताच्या कोणत्याही भागात सहज फिरविणे शक्य व्हावे. भुतखोरा धरणापासून सुमारे सहा हजार फूट, तर बेंडखारा धरणापासून एक हजार फूट पाइपलाइन करून पाणी विहिरीत सोडले आहे. 70 एकरांपैकी सुमारे 30 एकर क्षेत्रावर ठिबकद्वारेच सिंचन केले जाते. उर्वरित क्षेत्रावरही येत्या काळात ठिबक केले जाणार आहे. दोघेही बंधू समन्वयाने पाण्याचा वापर करतात. आले पिकाव्यतिरिक्त कापूस, मका, बाजरी, तूर व ऊस ही पिके घेतली आहेत.
शेतात एकाच ठिकाणी गायकवाड बंधूंची वस्ती आहे. वस्तीपासून शेताचे शेवटचे टोक सुमारे सातशे मीटर अंतरावर आहे. वस्तीवरून काही निविष्ठा घेऊन जायच्या असल्यास त्या डोक्यावरून वाहून न्याव्या लागत असत. हा त्रास वाचविण्यासाठी या बंधूंनी व अन्य काही शेतकऱ्यांनी मिळून एक ते सव्वा किलोमीटरचा रस्ता मुरूम टाकून तयार केला. त्याला एक लाख रुपये खर्च आला. त्यासाठी सर्वांनी वर्गणी गोळा केली. आता त्या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सोय झाली आहे. विशेष म्हणजे शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत कोणतेही वाहन नेता येऊ शकते.
1) दोन्ही भावांत शेतीत सुरेख समन्वय
2) गादीवाफा, ठिबक सिंचनाचा वापर
3) बेणे घरचेच, बेणेगृहाची सुविधा
4) शेणखत, गोमूत्राचा वापर
5) ऍग्रोवनसह कृषी साहित्य, चर्चासत्रातून ज्ञान वाढवले
6) मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला.
7) व्यापाऱ्यांना जागेवरच आले विक्री
(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)
संपर्क - तुकाराम गायकवाड, ९४०४६७८९२९
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
औरंगाबाद शहरातील नागसेनवन परिसराला लागून मराठवाडा ...
औरंगाबाद शहरातील नागसेनवन परिसराला लागून मराठवाडा ...
औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेले पोखरी हे छोट...
गावाचा विकास करायचा या एकाच ध्येयाने झपाटलेल्या गा...