इस्लामपूर शहराच्या (जि. सांगली) पश्चिमेला अवघ्या दोन किलोमीटरवर कापूसखेडचे शिवार लागते. या भागात ऊस शेती प्रामुख्याने होते. मात्र इस्लामपूर शहर जवळ असल्याने अनेक शेतकरी भाजीपालाही पिकवतात. रघुनाथ पाटील आपले बंधू भास्कर व राजेंद्र यांच्यासह कापूसखेड येथे एकत्रित कुटुंब पद्धतीत राहतात. त्यांचे दोन बंधू साखर कारखान्यात नोकरी करतात. पैकी एक जण निवृत्त झाले आहेत. त्यांची वडिलोपार्जित तीन भावांत मिळून सव्वा एकर जमीन होती. कुटुंब सांभाळतच ती तीन एकरांपर्यंत वाढवली. दोघे बंधू नोकरी करीत, त्या वेळी रघुनाथ घरची शेती सांभाळत टीव्ही दुरुस्तीचे कामही करायचे. त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. शेतीतून उत्पन्न जेमतेमच निघायचे. एक हाती रक्कम येत नव्हती.
एका डॉक्टरांकडे टीव्ही दुरुस्तीचे काम चालले होते. त्या वेळी खत कंपनीचे प्रतिनिधी डॉक्टरांना जमिनीच्या आरोग्याविषयी, खतातील घटकांचे महत्त्व यांची माहिती देत होता. पाटील टीव्ही दुरुस्त करत असताना ही माहिती मन लावून ऐकत होते. आपणही शास्त्रीय पद्धतीने शेती केली, तर फायद्यात येऊ शकू असे त्यांना वाटू लागले. अर्थात, त्यासाठी सुयोग्य नियोजनाची गरज होती.
पाटील यांचे क्षेत्र अवघे तीन एकर, त्यातही आठ ठिकाणी त्याचे क्षेत्र विभागलेले. त्यामुळे कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करण्याचा पाटील यांनी निर्णय घेतला. त्यांचे चुलते रामचंद्र पाटील परदेशी भाज्यांची (एक्सॉटिक) लागवड करीत होते. त्यांच्याकडून या पिकांची प्रेरणा मिळाली.
पाटील यांनी प्रत्येकी दहा गुंठ्यावर आइसबर्ग व झुकिनीची लागवड केली होती. आइसबर्गचा प्लॉट जवळपास संपला आहे. सुमारे सातशे किलो उत्पादन हाती आले असून, अजून 50 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकेल. किलोला 40 रुपये दर अधिक काळ मिळाला. यापूर्वी झुकिनीचा पहिला प्लॉट दहा गुंठ्यांत स्वतंत्रपणे केला. तीन टन उत्पादन मिळाले. 50 ते 70 रुपये दर किलोला मिळाला. सुमारे 85 हजार रुपयांचे उत्पन्न मिळून खर्च 25 हजार रुपये झाला. दसऱ्यानंतर ब्रोकोली हे पीक उसात घेतले. त्यातून 48 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. किलोला 30 ते 60 रुपये दर मिळाला. आता हा ऊस आठ-दहा कांड्यांवर आहे. दरवर्षी उसाचे गुंठ्याला दोन टनांपर्यंत उत्पादन मिळते आहे. साडेचार बाय तीन फुटांवर उसाची लागवड होते. सध्याही अन्य क्षेत्रात उसात झुकिनी आहे. एक टनापर्यंत उत्पादन मिळाले आहे. 60 ते 80 रुपये किलोला दर मिळाला आहे.
यापूर्वी चेरी टोमॅटोचे पीकही सात ते दहा गुंठ्यांत दसऱ्याआधी घेतले होते. त्याला किलोला 10 ते 30 रुपये दर मिळाला. बऱ्यापैकी उत्पन्न हाती पडले. लागवड व्यवस्थापनात पाटील निंबोळी पेंड, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतात. कीडनाशकांमध्ये निंबोळी अर्काचा वापर केला. कृषी विभागाने दिलेल्या गंध सापळ्यांचा वापर केला. भांगलणी, पाणी व्यवस्थापन ही कामे कुटुंबातील सदस्यांकडून केली जातात. त्यामुळे मजुरीवरील खर्चात बचत झाली आहे.
भारतीय भाज्यांच्या तुलनेत परदेशी भाज्यांना स्थानिक बाजारपेठेत अधिक मागणी नाही. त्यामुळे रघुनाथ यांनी मुंबई बाजारपेठ निवडली. येथील हॉटेलमधून परदेशी भाज्यांना मागणी असते. मुंबईच्या दादर परिसरात या भाज्यांच्या खरेदीचे मोठे मार्केट आहे. पाटील तेथील व्यापाऱ्यांना माल पाठवतात. प्रत्येकी तीस किलोचे बॉक्स भरले जातात. प्रवासी बसमधून (ट्रॅव्हल्स) हे बॉक्स पाठवले जातात. विक्रीवेळी काय दर सुरू आहेत, त्याबाबत तेथील व्यापाऱ्यांकडून माहिती घेतली जाते. त्यानुसार माल पाठवला जातो. रक्कम पाटील यांच्या बॅंकेच्या खात्यात जमा केली जाते. हा सर्व व्यवहार विश्वासावर चालतो.
पाटील परदेशी भाजीपाला शेतीच्या अर्थशास्त्राविषयी सांगताना म्हणाले, की या पीक पद्धतीतून रोख पैसे हाती पडतात. तेही सुमारे सव्वा ते अडीच महिन्यांच्या कालावधीत. उसाचे 20 गुंठ्यांत 40 टन उत्पादन मिळाले तरी टनाला 2500 रुपये दराने एक लाख रुपयांचे उत्पन्न हाती पडते. त्यातून खर्च वजा जाऊन समाधानकारक रक्कम काही मिळत नाही. त्या तुलनेत झुकिनी, ब्रोकोली आदी पिकांपासून एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न कमी कालावधीत हाती येते. आमचे क्षेत्र अत्यंत कमी, त्यातही आठ ठिकाणी विभागलेले, कुटुंब मोठे त्यामुळे विविध पिके कमी क्षेत्रात घेऊन उत्पन्नस्रोत वाढवावा लागतो. अजून ठिबक सिंचन करणे शक्य झालेले नाही. मात्र भविष्यात विविध तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार आहे. सध्या प्रत्येकी दहा गुंठ्यांत चेरी टोमॅटो व ढोबळी मिरची घेण्याचे नियोजन केले आहे. लागवडीची तयारी झाली आहे. मल्चिंग व शेडनेटचा वापर करण्यात येणार आहे. पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन गावातील पाच ते सात शेतकऱ्यांनी परदेशी भाजीपाला लागवडीस सुरवात केली आहे. सध्याच्या उन्हाळ्यात उसात आंतरपीक असल्याने परदेशी भाजीपाल्याची परिस्थिती चांगली असल्याचे पाटील म्हणाले.
मध्यंतरी उत्तराखंड येथे महाप्रलय झाला त्या वेळी त्या भागातील भाजीपाल्यांवर परिणाम झाला होता. माझ्याकडील झुकिनीदेखील मुंबईच्या व्यापाऱ्याने किलोला 70 रुपये दराने घेतली होती. मात्र बॉक्सवरील माझे नाव व संपर्क क्रमांक पाहून दुसऱ्या व्यापाऱ्याने माझी झुकिनी 125 रुपये किलो दराने विकली जात असल्याचे पाटील यांना सांगितले. दूरध्वनी केलेल्या व्यापाऱ्यानेही याच किमतीला आपली झुकिनी मागितली, मात्र पेमेंटबाबत फसवणूक होण्याचा धोका लक्षात घेऊन आपण माल दिला नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत किमान पाच ते सहा व्यापाऱ्यांना ते माल देतात.
संपर्क - रघुनाथ पाटील, 8007421907
-------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...