अलीकडच्या काळात केवळ पीक उत्पादनवाढ महत्त्वाची राहिलेली नाही, तर शेतमालाची विक्री, त्याची बाजारपेठ सक्षम करणे तितकेच महत्त्वाचे झाले आहे. आपल्या शेतमालाला दरही तितकेच चांगले मिळायला हवेत, याबाबत शेतकरी अधिक जागरूक झाला आहे. त्या दृष्टीने सामूहिक पद्धतीने शेती करणे, आपल्या मालाचे विक्री व्यवस्थापन करणे, या गोष्टींवर शेतकरी भर देऊ लागला आहे. विशेषतः दुर्गम भागांतील किंवा अडवळणाला असलेल्या गावांत ही गरज अधिक प्रमाणात निर्माण झाली आहे.
जालना जिल्ह्यात बोररांजणी (ता. घनसावंगी) हे सुमारे एक हजार लोकसंख्येचे गाव. गावात पूर्वीपासून पारंपरिक शेती करण्याकडेच येथील शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. येथून जवळच येवला येथे लघू सिंचन तलाव आहे. त्यामुळे गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी चांगली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार येणारी संकटे, अवर्षण आदी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी पीक नियोजन करणे अनेक वेळा अडचणीचे ठरते.
तरीही दर वर्षी आपल्याला शक्य त्या पद्धतीने शेती करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न बोररांजणीचे शेतकरी करतात. कापूस हे गावातील मुख्य पीक. एकरी सुमारे सहा ते सात क्विंटल उत्पादन येथील शेतकरी घेतात.
मात्र अलीकडील काळात पीकबदल करून त्यात सामूहिक विक्री करता आली तर शेती किफायतशीर होऊ शकते, या हेतूने गावातील काही शेतकरी एकत्र आले. त्यात एकनाथ यादव, संतोष जाधव, संजय यादव, गणेश गवंदे, कल्याण तौर, महेश तांगडे, नाथा यादव, दत्तात्रेय यादव, सोमेश्वर जाधव, विष्णू जाधव यांचा समावेश होता.
आशामती यादव या गावातील महिला शेतकरी आहेत. आपल्या वडिलोपार्जित जमिनीतून पारंपरिक पिकांच्या शेतीतून हाती काही लागत नाही, हा त्यांचाही अनुभव असल्याने त्यांनी या तरुण गटात सहभागी होण्याचे ठरवले. या युवकांनी बचत गटाची स्थापना केली आहे.
पारंपरिक शेती करताना शेतीची मशागत, वाढती महागाई, खते व कीडनाशकांचा वाढता खर्च यांचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक व मानसिक नुकसानीत होतो. सतत हवामान बदलाला तोंड देणाऱ्या बाबींमुळे शेतकरी हैराण होतो. त्यामुळे समाधानकारक उत्पादन व उत्पन्न न मिळाल्याने बोररांजणीच्या शेतकऱ्यांनी सामूहिक शेतमाल विक्रीचा पर्याय निवडला.
या संदर्भात बोलताना गटाचे अध्यक्ष एकनाथ यादव म्हणाले, की पूर्वी 2002 च्या सुमारास मी टोमॅटो घेतला होता, पण त्या वेळी दर इतके घसरले होते, की मालवाहतुकीचा खर्चदेखील त्यातून भरून काढणे शक्य नव्हते.
त्यामुळे एखाद्या पिकाची एकट्यादुकट्याने विक्री करणे शक्य होत नाही. सुरवातीला टोमॅटो व सिमला मिरचीचे बियाणे बाजारातून आणून गादी वाफा पद्धतीने त्यांची लागवड केली. शेणखताचा वापर करून रोपे तयार केली, मात्र अति पावसामुळे मिरचीची रोपे उगवली नाहीत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती करण्यावरच लक्ष केंद्रित केले.
साधारणतः कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादनासाठी सुधारित व संकरित जातीचा वापर करण्याचे ठरवले. सुरवातीला गटात 20 शेतकरी होते. आता हळूहळू त्यांची संख्या 80 ते 90 पर्यंत गेली आहे. प्रत्येकाने टोमॅटोचे सरासरी दहा गुंठे क्षेत्रच निवडले आहे. कारण मोठ्या प्रमाणात लागवडीची जोखीम घेणे शक्य नव्हते.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवडीयोग्य पाऊस झाल्यानंतर चार बाय दीड फूट अंतरावर लागवड केली. काहींनी मका, झेंडू आदी पिकेही घेतली. एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला.
यंदा तालुक्यात पावसाची परिस्थिती समाधानकारक असल्याने पाणी देण्याची फारशी गरज पडली नाही. मात्र पावसाच्या उघडिपीत तिसऱ्या व चौथ्या दिवशी ठिबकद्वारा पाणी देण्याचा प्रयत्न केला.
योग्य व्यवस्थापनानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुमारास टोमॅटो काढणीस सुरवात झाली. सुरवातीला 20 क्रेटने माल निघण्यास सुरवात झाली. त्या वेळी 200 ते 250 रुपये प्रति क्रेट दर मिळाला.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने 200, 300, 400 ते काही प्रसंगी हा दर 850 रुपयांपर्यंत गेला.
गटाचे अध्यक्ष यादव यांचे प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे तर दहा गुंठ्यांत त्यांचा आतापर्यंत 270 क्रेट एवढा माल बाजारपेठेत गेला आहे. त्यांना आतापर्यंत सुमारे 55 ते 60 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
आम्ही गटातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत चर्चा करतो. त्यामुळे खते, पीक संरक्षण, पिकाची वाढ, त्यानुसार करावयाचे नियोजन, बाजारपेठ या गोष्टींचे नियोजन करणे सोपे जाते. विशेषतः विक्रीसाठी आम्हाला सामूहिक शेती फायदेशीर ठरली आहे. गटातील काही शेतकऱ्यांनी टोमॅटो व जोडीला अन्य एखादा भाजीपाला घ्यायचा, असे नियोजन केले. त्यामुळे एखाद्या पिकात काहीसा तोटा झाला, तर दुसऱ्या पिकातून तो भरून काढायचा, असा हेतू होता.
एकनाथ यादव
आतापर्यंत माझ्या दहा एकर क्षेत्रात जे समाधानकारक उत्पन्न मला मिळाले नसेल त्या तुलनेत उत्पादन व उत्पन्न मला टोमॅटो पिकातून कमी कालावधीत मिळाले आहे, याचा आनंद वेगळाच आहे.
आशामती यादव, महिला शेतकरी
संपर्क - एकनाथ यादव - 9423729977